► वृत्तसंस्था नवी दिल्ली
केंद्र सरकारने नीट प्रश्नपत्रिकाफुटीप्रश्नी जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) या संघटनेच्या प्रतिनिधींनी चर्चा केली आहे. ही चर्चा दिल्लीतील ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’ येथे साधारणत: 2 तास झाली.
केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जगतप्रकाश नड्डा आणि केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी चर्चेत भाग घेतला. तर संघटनेच्या वतीने तिचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांनी भाग घेतला. चर्चा अनिर्णित राहिल्याचे दिसून आले.
केंद्र सरकार आणि संघटना यांच्यातील चर्चेची ही दुसरी फेरी आहे. पहिली फेरी तीन दिवसांपूर्वी झाली आहे. आंदोलनातील कार्यकर्त्यांवर कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाऊ नये. नीट परीक्षा प्रकरणात आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येक विद्यार्थ्यामागे 1 कोटी रुपये हानीभरपाई दिली जावी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, अशा संघटनेच्या तीन अटी आहेत.
यांच्यापैकी पहिल्या दोन अटी केंद्र सरकारने तत्वत: मान्य केल्या आहेत. मात्र, आम्ही तिसऱ्या अटीवरही ठाम आहोत, अशी माहिती चर्चेनतंर संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली. तथापि, केंद्र सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे चर्चा आज पुन्हा होणार आहे.
केंद्र सरकारने मागितला वेळ ?
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर संघटना ठाम आहे, असे या संघटनेच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्यासाठी एक दिवसाचा वेळ मागितला आहे, असा दावा या प्रतिनिधींनी केला आहे. केंद्र सरकारने अधिकृतरित्या कोणतेही विधान केलेले नाही. तथापि संघटनेची कोणतीही मागणी अद्याप मान्य करण्यात आलेली नाही, असे दिसून येत आहे.
केंद्र सरकारकडून अनेक फेरबदल
केंद्र सरकारने शिक्षण विभागाचे मुख्य सचिव विनीत जोशी यांची पंचायती राज विभागाच्या मुख्य सचिवपदी बदली केली आहे. त्यांच्या स्थानी नरेश पाल गंगवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे नीट प्रवेश परीक्षा घेणारे प्राधिकरण ‘राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणा’च्या (एनटीए) 47 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणात एनटीएवरही कर्तव्यात त्रुटी दाखविल्याचे आरोप करण्यात आले होते. बदली करण्यात आलेल्या 47 अधिकाऱ्यांपैकी काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, अशी महत्वपूर्ण माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
बॉक्स
नाही देणार प्रधान त्यागपत्र…
कोणत्याही परिस्थितीत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पद सोडण्यास भाग न पाडण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. प्रधान यांच्या राजीनाम्याचा विषय चर्चेसाठी समोर आलेलाच नाही, असे केंद्र सरकारच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्याने केंद्र सरकारवरचे सर्वात मोठे दडपण दूर झाले आहे. आंदोलकांच्या इतर मागण्यांवर विचार केला जाऊ शकतो. तथापि, पदत्यागाचा प्रश्नावर कदाचित केंद्र सरकारही मागे हटणार नाही, अशी शक्यता आहे. तथापि, या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे अद्यापही स्थिती दोलायमान असल्याचे दिसून येत आहे.
