Chikoo Seed Stuck in Navi Mumbai Man Lungs removed by Doctors after 3 months; श्वासात अडथळे, छातीत घरघर; नवी मुंबईतील तरुणाच्या त्रासामागे 3 महिने जुनं अनपेक्षित कारण, फुप्फुसरोग तज्ज्ञांमुळे दिलासा
Chikoo Seed Stuck in Navi Mumbai Man Lungs removed by Doctors after 3 months; श्वासात अडथळे, छातीत घरघर; नवी मुंबईतील तरुणाच्या त्रासामागे 3 महिने जुनं अनपेक्षित कारण, फुप्फुसरोग तज्ज्ञांमुळे दिलासा
Navi Mumbai News : रुग्णाला भूल देऊन जाळीसारख्या विशेष उपकरणाच्या साहाय्याने चिकूची बी अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली. बी बाहेर काढताच श्वासनलिका खुली झाली आणि तरुणाला तत्काळ मोकळा श्वास घेता आला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी मुंबई : मागील दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास आणि छातीत घरघर जाणवत असल्याने विविध ठिकाणी उपचार घेऊनही दिलासा न मिळालेल्या ३८ वर्षीय रुग्णाच्या त्रासाचे अनपेक्षित कारण अखेर समोर आले. रुग्णाच्या डाव्या मुख्य श्वासनलिकेत तब्बल तीन महिन्यांपासून चिकूची बी अडकून राहिली होती. फुप्फुसरोगतज्ज्ञांनी ब्रॉन्कोस्कोपीच्या माध्यमातून ही बी यशस्वीरीत्या बाहेर काढत रुग्णाला मोकळा श्वास घेण्यास मदत केली.
दोन-तीन महिन्यांचा त्रास
उलवे येथील मनोज (नाव बदलले आहे) यांना गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. सुरुवातीला त्यांनी विविध डॉक्टरांकडून उपचार घेतले. औषधांमुळे काही काळ आराम मिळत होता; मात्र त्रास पूर्णपणे कमी होत नव्हता. अखेर एका डॉक्टरांनी ब्रॉन्कोस्कोपी करण्याचा सल्ला दिल्यानंतर पुढील तपासणीत आजाराचे खरे कारण स्पष्ट झाले.
तात्काळ मोकळा श्वास
फुप्फुसरोगतज्ज्ञ डॉ. शाहिद पटेल आणि डॉ. तनय सिन्हा, तसेच भूलतज्ज्ञ डॉ. शहाबुद्दीन यांच्या पथकाने रुग्णाची तपासणी केली. एचआरसीटी स्कॅनमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत अरुंदपणा आढळून आला. मात्र हा अरुंदपणा कोणत्या कारणामुळे झाला, हे स्पष्ट होत नव्हते. ब्रॉन्कोस्कोपीमध्ये डाव्या मुख्य श्वासनलिकेत चिकूची बी अडकली असल्याचे निदान झाले. या बीमुळे श्वासनलिका जवळपास पूर्णपणे बंद झाली होती. संबंधित भागात सूज आली होती, तसेच स्रावही साचला होता. रुग्णाला भूल देऊन जाळीसारख्या विशेष उपकरणाच्या (मेश स्नेअर) साहाय्याने ही बी अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढण्यात आली. बी बाहेर काढताच श्वासनलिका खुली झाली आणि रुग्णाला तत्काळ मोकळा श्वास घेता आला.
‘ही प्रक्रिया आव्हानात्मक होती. बी जवळपास तीन महिने श्वासनलिकेत अडकून राहिल्याने ती आतील थराला घट्ट चिकटली होती. शिवाय तिचा पृष्ठभाग गुळगुळीत असल्यामुळे उपकरणाच्या साहाय्याने तिला पकडणे अवघड होते. सुमारे ५० मिनिटे चाललेल्या या प्रक्रियेत अत्यंत अचूकतेने बी बाहेर काढण्यात आली. प्रक्रियेदरम्यान श्वासनलिकेला कोणतीही दुखापत झाली नाही,’ असे डॉ. शाहिद पटेल यांनी सांगितले.
तीन महिन्यांपूर्वीची घटना आठवली
तीन महिन्यांपूर्वी चिकू खाताना रुग्णाला अचानक ठसका लागल्याचे नंतर समोर आले. त्यानंतर त्रास काही प्रमाणात कमी झाल्याने ही घटना गंभीर असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. ही माहिती डॉक्टरांनाही देण्यात आली नव्हती. त्यामुळे योग्य निदान होण्यास विलंब झाला.
श्वासनलिकेत बाहेरील वस्तू दीर्घकाळ अडकून राहिल्यास गंभीर संसर्ग, वारंवार न्यूमोनिया किंवा फुफ्फुसाच्या काही भागाचे कायमस्वरूपी नुकसान अशा गुंतागुंती उद्भवू शकतात. प्रौढांमध्ये अन्नाचा कण किंवा फळांची बी श्वासनलिकेत अडकण्याच्या घटना तुलनेने दुर्मीळ असल्या, तरी त्यांची लक्षणे अनेकदा कफ किंवा फुफ्फुसाशी संबंधित इतर आजारांसारखी दिसू शकतात.
जेवताना बोलणे, हसणे किंवा घाई करणे टाळावे, असा सल्ला डॉ. तनय सिन्हा यांनी दिला. अशा वेळी अन्नाचा कण किंवा फळांची बी चुकून श्वासनलिकेत जाण्याचा धोका वाढू शकतो. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ठसका लागल्यानंतर दीर्घकाळ खोकला, घरघर किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा