Noida Construction Quality: नोएडातील १ कोटींच्या फ्लॅटच्या छताचा प्लास्टर अचानक कोसळला. त्यावेळी एक लहान मुलगा खाली उभा होता. सुदैवानं तो वाचला. त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. बिल्डरकडे तक्रार केल्यानंतर उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचा आरोपही तिने केला. हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं घडलं तरी काय?
हा व्हिडीओ akshitabansal604 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. नोएडातील गौर सिटी फर्स्ट एव्हेन्यूमध्ये राहणाऱ्या अक्षिता बन्सल यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या घराच्या छताचं प्लास्टर अचानक खाली पडल्याचं त्या सांगत आहेत. विशेष म्हणजे, प्लास्टर खाली पडताना त्यांचा मुलगा अगदी त्याच ठिकाणी उभा होता. सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही. पण या प्रकरणातील लक्षवेधी बाब म्हणजे प्लास्टर पडण्यापूर्वी साधारणपणे आधी तडे जातात आणि मग ते खाली पडतं. पण इथे छतावर आधी कोणताही क्रॅक किंवा तडा दिसत नव्हता. ते अचानक खाली पडलं.
या प्लास्टरमधील सिमेंट सुद्धा हलक्या प्रतीचं असल्याचा आरोप त्या करत आहेत. कारण कोसळलेला प्लास्टर हातात घेऊन तो सहज तुटत असल्याचं त्यांनी व्हिडीओमध्ये दाखवलं आणि बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले. बरं, या प्रकरणी जेव्हा त्यांनी बिल्डरकडे तक्रार केली, तेव्हा त्यांना उडवाउडवीची उत्तरं मिळाल्याचं त्या सांगतात.
सुदैवानं मुलगा वाचला
हा व्हिडीओ ७ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तसंच अनेकांनी या व्हिडीओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. कोणी महिलेच्या मुलाच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली. तर कोणी ‘तुमचा मुलगा सुखरूप असेल अशी आशा आहे’, अशी प्रतिक्रिया दिली. असो, या प्रकरणी तुमचं काय मत आहे? तुम्ही देखील आपल्या प्रतिक्रिया द्या.
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

