Headlines

British citizen accused of conversion in pune crime registered under new anti conversion law; ब्रिटनहून पुण्यात आला अन् धर्म परिवर्तनाचा प्रयत्न? नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद


Crime News: भारतात वास्तव्यास असताना सदर व्यक्तीला अशा प्रकारचा धार्मिक प्रचार करण्याची कायदेशीर परवानगी होती का, याची पडताळणी आता पोलीस करत आहेत.

pune crime
ब्रिटनहून पुण्यात आला अन् धर्म परिवर्तनाचा प्रयत्न? नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत गुन्ह्याची नोंद(फोटोLipi)
पुणे : पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत नुकत्याच लागू झालेल्या ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’ नुसार दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांनी या कारवाईला दुजोरा दिला असून, या दोन्ही घटनांचा पोलिसांकडून सखोल तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

यातील पहिली घटना पुण्यातील गुरुवार पेठ भागात उघडकीस आली आहे. खडक पोलीस ठाण्यात हिंदुत्ववादी संघटनांच्या फिर्यादीवरून एका ब्रिटिश नागरिकावर ९ ऑगस्ट रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हा मूळचा महाराष्ट्रीयन परंतु सध्या ब्रिटनचे नागरिकत्व असलेला व्यक्ती एका प्रार्थनास्थळामध्ये धार्मिक उपदेश करत होता. चमत्कारांचे आमिष दाखवून त्याने स्थानिकांना धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी त्याच्यावर धर्मांतरविरोधी कायद्यासह ‘फॉरेनर्स अँड इमिग्रेशन ॲक्ट २०२५’ नुसार कारवाई करण्यात आली आहे.

दुसरी गंभीर घटना फुरसुंगी येथे घडली असून, नव्या धर्मांतरविरोधी कायद्यांतर्गत पुण्यात नोंदवला गेलेला हा पहिला गुन्हा ठरला आहे. शिवकुमार रावत नावाच्या एका व्यक्तीने एका अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याचा प्रकार ५ ऑगस्ट रोजी उघडकीस आला होता. पोलिसांनी पीडित मुलीची सुटका केल्यानंतर तपासात अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या. आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याचे आणि तिला बळजबरीने धर्म बदलण्यासाठी दबाव टाकल्याचे निष्पन्न झाले. या प्रकारामुळे आरोपीवर धर्मांतरविरोधी कायद्याच्या कलमांसोबतच ‘पॉक्सो’ (बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात धर्मांतराच्या मुद्द्यावरून हा कडक कायदा अस्तित्वात आल्यानंतर, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये आरोपींचा नेमका हेतू काय होता आणि प्रत्यक्षात कायद्याच्या कोणत्या तरतुदींचे उल्लंघन झाले आहे, हे सविस्तर पोलीस तपासाअंतीच स्पष्ट होणार आहे.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा