Headlines

BCCIकडून प्रतिसाद नाही, मग ऑस्ट्रेलियाकडे धाव; अनायाला महिला संघात क्रिकेटची संधी कशी मिळाली? रिपोर्ट ठरला महत्त्वाचा


Anaya Bangar Cricket Australia : क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून महिला संघात क्रिकेट खेळण्याची परवानगी मिळाल्यानंतर अनाया बांगर चर्चेत आली आहे. तिने हा दिवस माझ्यासाठी अत्यंत मोठा आहे, असं म्हणत ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे आभार मानले आहेत.

Anaya Bangar Cricket Australia
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: क्रिकेटच्या मैदानात पुन्हा एकदा चौकार-षटकार मारण्याचं अनाया बांगरचं स्वप्न अखेर साकार झालं आहे. बीसीसीआयकडे दाद मागूनही पदरी निराशा पडल्यानंतर अनायाने थेट क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे धाव घेतली होती. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियाने केवळ तिच्या अर्जावर वरवरचा विचार केला नाही, तर एका अत्यंत पारदर्शक आणि सखोल वैद्यकीय प्रक्रियेनंतर तिला ‘कम्युनिटी क्रिकेट’ खेळण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. पण, ही परवानगी मिळवण्याचा अनायाचा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी तिला नेमक्या कोणत्या अग्निदिव्यातून जावं लागलं? जाणून घेऊयात.

मँचेस्टर युनिव्हर्सिटीचा रिपोर्ट महत्त्वाचा ठरला

अनायाने क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केवळ तोंडी किंवा कागदी परवानगी मागितली नव्हती, तर सबळ वैज्ञानिक पुरावेही सादर केले. तिने मँचेस्टर युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्सच्या एका संशोधन प्रकल्पात भाग घेतला होता. हार्मोन थेरपीचा तिच्या शरीरावर, ताकदीवर आणि स्टॅमिनावर काय परिणाम होतो, याचा एक सविस्तर ‘ॲथलीट टेस्टिंग रिपोर्ट’ तिने तयार केला होता. अनयाच्या म्हणण्यानुसार, हा अहवाल तिने बीसीसीआयलाही दिला होता, पण तिथे तिला मौन पाहायला मिळालं. मात्र, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या अहवालाची गांभीर्याने दखल घेतली.

Maharashtra TimesSanjay Manjrekar : वैभव आणि जयस्वालला आताच आवरा, संजय मांजरेकरांची जाहीरपणे दोघांवर कारवाई करण्याची मागणी, काय कारण?

टेस्टोस्टेरॉन ते सर्जरी, कठोर वैद्यकीय चाचण्या

ट्रान्सजेंडर खेळाडूंना सामावून घेताना इतर महिला खेळाडूंवर अन्याय होऊ नये याची CA ने पूर्ण काळजी घेतली. यासाठी एका विशेष टीममार्फत अनायाची कठोर वैद्यकीय छाननी करण्यात आली. याबाबत बोलताना अनाया म्हणाली की, “क्रिकेट ऑस्ट्रेलियाने माझा संपूर्ण वैद्यकीय रेकॉर्ड तपासला. रक्ताच्या चाचणीपासून ते टेस्टोस्टेरॉन रिपोर्टपर्यंत सर्व गोष्टींची त्यांनी बारकाईने तपासणी केली. मार्चमध्ये झालेल्या माझ्या लिंगबदल शस्त्रक्रियेची (Gender-affirming surgery) सर्व कागदपत्रेही त्यांनी पडताळून पाहिली.”

कम्युनिटी क्रिकेटला ग्रीन सिग्नल, पण WBBL साठी अटी

या सर्व वैद्यकीय चाचण्यांमधून यशस्वीरीत्या पुढे गेल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या हेड ऑफ इंटिग्रिटी जॅकी पार्ट्रिज यांनी अनायाला अधिकृत पत्र पाठवले. त्यानुसार तिला तत्काळ ऑस्ट्रेलियातील प्रीमियर क्रिकेट (कम्युनिटी क्रिकेट) ज्याला लहान स्तरावरील व्यावसायिक क्रिकेट म्हणता येते, ते खेळण्याची परवानगी मिळाली आहे. पण ‘वूमेन्स बिग बॅश लीग’ (WBBL) सारख्या एलिट स्पर्धांमध्ये खेळण्यासाठी तिला काही कडक अटी पूर्ण कराव्या लागतील, ज्यामध्ये एलिट क्रिकेट खेळण्यासाठी सलग १२ महिने तिच्या रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी १० nmol/L च्या खाली राहणं बंधनकारक आहे. ही अट पूर्ण केल्यास मार्च २०२७ नंतर ती WBBL सारख्या एलिट क्रिकेटमध्ये खेळण्यास पात्र ठरू शकेल. दरम्यान, महिला बिग बॅश लीग ही ऑस्ट्रेलियातील एक व्यावसायिक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे.

Maharashtra TimesImran Khan : ‘इम्रान खान यांना एका डोळ्याने कमी दिसतं, खिडकी नसलेली कोठडी’; मुलाचे खळबळजनक दावे, काय म्हणाला?

बीसीसीआयची भूमिका अद्याप अस्पष्टच

एका बाजूला क्रिकेट ऑस्ट्रेलियाने वैद्यकीय पुराव्यांच्या आधारे ऐतिहासिक निर्णय घेतला आहे, तर दुसरीकडे बीसीसीआय अजूनही संभ्रमात आहे. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना आधीच बंदी घातली आहे. भारतात असा प्रकार पहिल्यांदाच घडल्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंना परवानगी देण्याबाबत बीसीसीआयकडे कोणतंही स्पष्ट धोरण किंवा नियम नाहीत.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा