बाळाचे पोट दुखणे, गॅस किंवा बद्धकोष्ठता झाल्यावर अनेक घरांमध्ये तूप किंवा ग्राइप वॉटर देण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, नवजात बाळांसाठी हे उपाय खरंच सुरक्षित आहेत का? ६ महिन्यांपूर्वी तूप देण्याची गरज आहे का, ग्राइप वॉटरमुळे कोलिक कमी होते का आणि बाळाला घन आहार कधी सुरू करावा, याबाबत पालकांनी काय काळजी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार महत्त्वाची माहिती.

लहान बाळांना तूप देणे खरोखरच गरजेचे आहे का?
तूप हा शरीराला ताकद देणारा पारंपरिक अन्नपदार्थ मानला जातो आणि त्यामुळे पचन, प्रतिकारशक्ती, वजन आणि मेंदूचा विकास होतो या विश्वासाने बाळाला ते लवकर दिले जाते. मात्र, ६ महिन्यांपेक्षा लहान बाळाच्या आहारात तूप घालण्याची अजिबात गरज नसते. ६ महिन्यांपर्यंतच्या बाळासाठी केवळ आणि केवळ आईचे दूध हेच सर्वोत्तम आणि पूर्ण अन्न असते.
जर बाळ फॉर्म्युला मिल्कवर असेल, तर त्यातूनच त्याला आवश्यक ते पोषण मिळते. बाळ ६ महिन्यांचे झाल्यावर जेव्हा आपण वरचा घन आहार सुरू करतो, तेव्हा त्याच्या संतुलित आहारात अतिशय कमी आणि मर्यादित प्रमाणात तुपाचा समावेश केला जाऊ शकतो. परंतु, तूप हे इतर पोषक अन्नाला पर्याय ठरू शकत नाही. तसेच केवळ तूप खाल्ल्याने बाळाची बुद्धिमत्ता वाढते, प्रतिकारशक्ती प्रचंड सुधारते किंवा बाळ मजबूत होते याला कोणताही वैद्यकीय आधार नाही; बाळाची वाढ ही एकूण कॅलरीज, प्रथिने, झोप आणि आरोग्यावर अवलंबून असते.
बाळाच्या बद्धकोष्ठतेवर तूप उपयोगी पडते का?
काही पालक तूप हे नैसर्गिकरीत्या पोट साफ करणारे औषध (Laxative) आहे असे मानून बाळाला देतात. परंतु, बालकांमधील बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी तूप प्रभावी ठरते याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. लहान बाळांमध्ये शौचाची वारंवारता, त्याचा मऊपणा आणि बाळाचे वय यावर बद्धकोष्ठता ठरते. आईचे दूध पिणारे बाळ अगदी काही दिवस शौचास गेले नाही, तरीही त्याची विष्ठा मऊ असेल आणि बाळ शांत असेल तर ती पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. परंतु, जर बाळाला कडक शौचास होत असेल, बाळ रडत असेल, दूध पीत नसेल, उलटी करत असेल, पोट फुगले असेल किंवा शौचातून रक्त येत असेल, तर घरगुती उपायांवर वेळ घालवण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बाळासाठी ग्राइप वॉटर सुरक्षित आहे का?
बाळाचे पोट दुखणे, गॅस, उचकी किंवा बाळ चिडचिड करत असल्यास अनेक घरांमध्ये ग्राइप वॉटर दिले जाते. मात्र, ग्राइप वॉटरमुळे कोलिक किंवा पचनाचा त्रास बरा होतो, असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. बाजारात उपलब्ध असलेल्या वेगवेगळ्या ग्राइप वॉटरमध्ये विविध घटक असतात. काहींमध्ये वनस्पतींचे अर्क, गोडवा आणणारे घटक, सोडीयम बायकार्बोनेट किंवा इतर घटक असतात जे नवजात बालकांसाठी योग्य नसतात.
ग्राइप वॉटर देण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे यामुळे बाळ नक्की का रडत आहे याचे मूळ कारण शोधण्यास उशीर होऊ शकतो. बाळ भुकेमुळे, थकव्यामुळे, प्रेमाच्या स्पर्शासाठी किंवा इतर शारीरिक त्रासामुळेही रडू शकते. कोलिकच्या त्रासासाठी दूध पाजल्यानंतर बाळाला खांद्यावर घेऊन ढेकर काढणे, शांत वातावरण ठेवणे याने मदत होते आणि जसजसे बाळ मोठे होते तसा हा त्रास आपोआप कमी होतो.
गॅस आणि कोलिकचा त्रास कमी करण्यासाठी पालकांनी काय करावे?
नवजात बालकांमध्ये पचनसंस्था परिपक्व होत असताना गॅस होणे अत्यंत स्वाभाविक आहे. यासाठी पालकांनी पुढील सोपे आणि सुरक्षित उपाय करावेत:
- दूध पाजण्याची योग्य पद्धत : आईचे दूध पाजताना बाळाने स्तनाग्र (Latch) व्यवस्थित पकडले आहे याची खात्री करा, जेणेकरून बाळ हवा गिळणार नाही.
- ढेकर काढणे : प्रत्येक वेळी दूध पाजून झाल्यावर बाळाला उभे धरून पाठीवरून हात फिरवून ढेकर आवर्जून काढून घ्या.
- अति-दूध पाजणे टाळा : बाळाच्या गरजेपेक्षा जास्त दूध पाजणे टाळा आणि दूध पाजल्यानंतर काही वेळ बाळाला थोडे उभे/उंच ठेवा.
- पोटाचे व्यायाम : डॉक्टरांच्या सल्ल्याने बाळाच्या पोटावर हलका हात फिरवणे किंवा पायाच्या सायकलिंगसारख्या हालचाली करून घेणे फायदेशीर ठरते.
- वैद्यकीय सल्ला : बाळ सतत, तीव्र रडत असेल आणि सोबत ताप, सुस्तपणा, उलट्या, वजन न वाढणे असा त्रास दिसत असेल तर त्वरित बालरोगतज्ज्ञांना दाखवा.
बाळाला बाहेरचे अन्नपदार्थ कधीपासून द्यावेत?
बहुतांश बाळांसाठी वयाच्या ६ व्या महिन्यापासून आईच्या दुधासोबत इतर पौष्टिक आणि मऊ अन्नाची सुरुवात केली जाते. सुरुवातीचे अन्न मऊ, पचायला सोपे आणि सुरक्षित असावे. लहान बाळांच्या आहारात मीठ, साखर, मध किंवा अनावश्यक सप्लिमेंट्स टाकणे पूर्णपणे टाळावे. जुन्या पद्धती डोळे झाकून पाळण्याऐवजी बाळाला निरोगी खाण्याच्या सवयी लावणे जास्त महत्त्वाचे आहे.
योग्य वयानंतर आणि मर्यादित प्रमाणात तुपाचा आहारात समावेश करणे ठीक आहे, परंतु तो संतुलित आहाराचा किंवा वैद्यकीय उपचारांचा पर्याय ठरू शकत नाही. तसेच, ग्राइप वॉटर हा बाळाच्या पोटदुखीवरचा कोणताही सिद्ध झालेला उपाय नाही. नवजात बालकांसाठी वयानुसार योग्य आहार देणे, त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवणे आणि कोणताही घरगुती प्रयोग करण्यापूर्वी बालरोगतज्ज्ञांचा (Pediatrician) सल्ला घेणे हाच सर्वात सुरक्षित आणि योग्य मार्ग आहे.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले
आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.
- नवीन आवृत्ती
- Aug 12, 2026, 12:50 PMMedically Reviewed byDr. Jaykishan Tripathi
- Aug 12, 2026, 12:50 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम
