Headlines

Arbaj Shaikh : ‘सैराट’ फेम अरबाज शेखला पितृशोक! सोलापुरातील रुग्णालयात उपचारादरम्यान अभिनेत्याच्या वडिलांचं निधन


Arbaj Shaikh Father Passes Away : ‘सैराट’ फेम अरबाज शेखच्या वडिलांचं आज निधन झालं आहे.

Arbaj Shaikh Father Passes Away
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सोलापूर – ‘सैराट’ फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या वडिलांचं गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अरबाज शेखचे वडील अस्लम शेख सोलापुरातील खाजगी रुग्णालयात मेंदू विषयक विकारावर उपचार घेत होते. महिन्याभरापासून सोलापुरातील खाजगी रुग्णालयात अस्लम शेख यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनं अरबाजच्या कुटुंबावर शोककळा पसरली असून चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वी अरबाजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये त्यानं सोलापूरमधील खासगी रुग्णालयावर गंभीर आरोप केले होते. वडिलांच्या उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार जास्त पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप अरबाजनं केला होता. हा व्हिडिओ थेट तुकाराम मुंढे यांच्यापर्यंत पोहोचला. सोलापुरातील अन्न आणि औषध प्रशासनाकडून संबंधित रुग्णालयाच्या मेडिकलवर कारवाई करण्यात आली.
Maharashtra TimesSanjay Dutt : ‘आईला त्या सगळ्यातून जाताना पाहणं असह्य होतं’, नर्गिस यांची कॅन्सरशी झुंज, संजय दत्तनं सांगितला कठीण काळ

शिवसेना शिंदे पक्षाकडून आर्थिक मदत

अरबाज शेखचा व्हिडिओ राज्यभरात वायरल झाल्यानं सोशल मीडियावर दुःख व्यक्त करण्यात आलेलं. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाकडून त्या व्हिडिओची दखल घेतली होती. शिवसेना नेते मंगेश चिवटे यांनी तत्काळ तज्ञ डॉक्टर आणि सुपर स्पेशल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार ज्योती वाघमारे यांच्या मार्फत अरबाज शेखला आर्थिक मदत केली होती. सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात अरबाज शेख याचे वडील अस्लम शेख यांना दाखल करण्यात आलेलं. गुरुवारी सकाळी उपचारा दरम्यान अस्लम शेख यांची प्राणज्योत मालवली.

सैराटनंतर नागराज मंजुळेंचा सल्ला ते घरच्यांपासून लपवून केलेलं कोर्ट मॅरेज, अरबाज-सिमरन सोबत गप्पा

दरम्यान, अरबाज शेखला नागराज मंजुळे यांच्या ‘सैराट’ या सिनेमातून ओळख मिळाली. या सिनेमातील त्याची सल्याची भूमिका चांगलीच गाजली. त्यानंतर अभिनेत्यानं ‘झुंड’, ‘बस्ता’, ‘मुसंडी’, ‘पिक्चर बॉयज’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अभिनेता नागराज मंजुळे यांच्या ‘मटका किंग’ या वेब सीरिजमध्येही अरबाज झळकला आहे. अरबाज त्याच्या लग्नामुळेही चर्चेत आलेला. लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यावर अभिनेत्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागलेला. मात्र, मुलाखतीमध्ये अभिनेत्यानं त्यावर सडेतोड उत्तर दिलेलं.