अमित शहा यांचा जेन झी पिढीला सल्ला
पुणे : आजच्या युवकांनी लोकमान्य टिळकांचे ‘गीता रहस्य’ वाचावे. त्यांचे कधी वाकडे पाऊल पडणार नाही, असा सल्ला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जेन झी पिढीला शनिवारी येथे दिला. टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक पुरस्कार 2026 ‘ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना ट्रस्टचे अध्यक्ष रोहित टिळक यांच्या हस्ते देण्यात आला.
एक लाख रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, टिळक स्मारक ट्रस्टच्या विश्वस्त गीताली टिळक, प्रणती टिळक आदी उपस्थित होते.
शहा म्हणाले, सांस्कृतिक राष्ट्रवादाला लोकमान्य टिळक दिशा दिली. आज त्याच दूरदृष्टीमुळे देश सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मार्गाने जात आहे. युवकांनी टिळकांचे गीता रहस्य वाचावे. त्यांचे कधी वाकडे पाऊल पडणार नाही.
इंग्रज हे केसरी, मराठाला घाबरायचे.
आत्मनिर्भरता, अनुशासन, कर्तव्यभाव हा देखील स्वराज्याचा भाग आहे. त्यांचे जीवन हा प्रेरणास्रोत आहे.
पुरस्कार हा प्रेरणादायी असतो. व्यक्ती मोठी होते, तेव्हा ती व्यक्ती राहत नाही. त्यापुढे जाते. डोवाल यांच्याबाबत तसे म्हणता येईल.
डोवाल जन्मजात देशभक्त आहेत. आपण आपला राष्ट्रवाद प्रखर केला.भारताने जगात स्थान मजबूत केले. त्यात डोवाल यांचे योगदान मोठे आहे. विदेशनीती, अंतर्बाह्य सुरक्षेसाठी त्यांनी मोठे काम केले, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.
अजित डोवाल म्हणाले, पुण्यात शालेय वयात असताना सव्वा वर्षे राहिलो. आई मला चतुःश्रृंगी देवीच्या मंदिरात घेऊन जाई. पुण्यातल्या शाळेत टिळक यांच्या विचारांची ओळख झाली. आज तिथेच मला हा पुरस्कार मिळाला आहे. याचा आनंद आहे.
एकजूट होऊन काम करावे लागेल
आजही भारतापुढे अंतर्गत व बाहेरील अनेक आव्हाने आहेत. सगळीच माणसे आनंदी वा समाधानी नाहीत. त्यामुळे एकजूट होऊन काम करावे लागेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धुरंधराकडून धुरंधराला पुरस्कार दिला जाणे, हा मधुरयोग आहे. दोघेही चाणक्य म्हणून ओळखले जातात. डोवाल यांनी देशाची सामरिक नीती बदलली. मार खाणारा नव्हे; तर घरात घुसून मारणारा देश, अशी देशाची प्रतिमा तयार केली. लोकमान्य टिळक हे भारतीय राष्ट्रवादाचे जनक होते. त्यांनीच राष्ट्रवादाची खऱ्या अर्थाने सुरूवात केली, असेही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘अजित डोवाल सिर्फ नाम ही काफी है. एकीकडे देशद्रोही, नक्षलवादी संपवणारे शहा आहेत, तर दुसरीकडे सुरक्षा सांभाळणारे, रणनीतीकार डोवाल आहेत. अमित शहा यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार मिळणे, हा दुग्धशर्करायोग आहे.
मोदीशा आज एकच नाव झाले आहे. ही जोडी देशाच्या विकासासाठी आपले सर्वस्व देत आहे.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, ‘डोवाल
यांनी संपूर्ण जीवन राष्ट्र सेवा व सुरक्षेसाठी समर्पित केले. सक्षम नेतृत्वाकडून त्यांचा सन्मान यथोचित आहे. अजित डोवाल यांच्यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे.’
