जालना जिल्ह्यातील अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथे ही कारवाई करण्यात आली.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
योगेश काकफळे, जालना : अंबडचा तहसीलदार विजय चव्हाण याला ६ लाख ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याने जालना जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. गोदावरी नदीपात्रातील वाळू उत्खननाशी संबंधित प्रकरणात ही कारवाई करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर येथील त्याच्या निवासस्थानी सापळा रचून एसीबीने ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाळू उत्खननासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रसामग्री व वाहनांच्या कामकाजात अडथळे येऊ नयेत यासाठी तक्रारदाराकडे मोठ्या रकमेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने लाच देण्यास नकार देत एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर तक्रारीची पडताळणी करून बीड एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
कारवाईदरम्यान विजय चव्हाण याने ६ लाख ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आवश्यक पुरावे जप्त करण्यात आले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर येथील सातारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, गुरुवारीच जालना एसीबीने बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे कारवाई करून एका पोलीस अंमलदाराला १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक केली होती. त्यामुळे एका दिवसात महसूल आणि पोलीस विभागातील दोन अधिकाऱ्यांवर झालेल्या कारवाईमुळे प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
जिल्ह्यात चर्चेला उधाण
विजय चव्हाण हा विविध प्रशासकीय उपक्रमांमुळे आणि नागरिकांशी थेट संपर्क ठेवणारा अधिकारी म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे त्याच्या अटकेची बातमी समोर आल्यानंतर सर्वसामान्यांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. काही महिन्यांपूर्वी जालना महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संतोष खांडेकर लाच प्रकरणात एसीबीच्या जाळ्यात अडकले होते. त्यानंतर आता तहसीलदारावरील कारवाईमुळे जिल्ह्यातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
दरम्यानस आता या प्रकरणाचा पुढील तपास एसीबीकडून सुरू असून लाचखोरीच्या या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा