Ajit Pawar: दादांनी पाठीत खंजीर खुपसला! मोठी डील झालीय! NCPच्या आमदाराचं खळबळजनक पत्र, पटेलांवर निशाणा – ncp mla manohar chandrikapure writes open letter to ajit pawar after party denies ticket for maharashtra assembly poll 2024
Ajit Pawar: दादांनी पाठीत खंजीर खुपसला! मोठी डील झालीय! NCPच्या आमदाराचं खळबळजनक पत्र, पटेलांवर निशाणा – ncp mla manohar chandrikapure writes open letter to ajit pawar after party denies ticket for maharashtra assembly poll 2024
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी परवा प्रसिद्ध झाली. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अर्जुनी-मोरगावचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा पत्ता कापला. आता चंद्रिकापुरेंनी दादांच्या नावानं एक पत्र लिहिलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
गोंदिया: भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी मंगळवारी अजित पवार ांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी बडोले यांना अर्जुनी-मोरगावमधून विधानसभेचं तिकीट जाहीर झालं. त्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचं तिकीट कापलं. त्यामुळे नाराज झालेल्या चंद्रिकापुरे यांनी पत्र लिहून त्यांची खदखद व्यक्त केली आहे. पत्रातून त्यांनी अजित पवार आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्यावर तोफ डागली आहे. चंद्रिकापुरे काँग्रेसमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा आहे.
अजित पवारांनी विश्वासघात केल्याचा आरोप चंद्रिकापुरे यांनी पत्रातून केला आहे. ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा निष्ठावंत व एकनिष्ठ कार्यकर्ता बोलतोय. आज माझं तिकीट कापण्यात आल्याचं समजलं. मुंबईत येऊनही रिकाम्या हातानं परत यावं लागलं, याचं मनापासून दुःख झालं आहे. दादा, जेव्हा महायुतीत जाण्याचा निर्णय तुम्ही घेतला, तेव्हा इच्छा नसतानाही आपल्यावर श्रद्धा आणि विश्वास ठेऊन मी आणि माझा मतदारसंघ तुमच्यासोबत राहिला. आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही माझा विश्वासघात केला. केवळ, माझाच नाही तर माझ्यासह माझ्या अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील लाखो नागरिकांचा हा विश्वासघात आहे,’ असं चंद्रिकापुरेंनी पत्रात म्हटलं आहे. NCP Candidate List: ताटातलं वाटीत आलं अन् आमदाराचं तिकीट गेलं; दादांचा निष्ठावंताला धक्का, पटेलांचा पुन्हा डाव ‘मीच राष्ट्रवादीचा उमेदवार असेन, असं सांगत मी मतदारसंघातील गावं न गावं पिंजून काढली. जनतेला भेटून आपली भूमिका कशी बरोबर आहे, हे समजावलं. पण, ऐनवेळी माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. दादा, पाठीत खंजीर खुपसल्याचे वाईट वाटते हो. पण ज्या हातात खंजीर आहे, तो हात आपलाच असल्यावर जास्त वाईट वाटते. दोन दिवसांपूर्वी भाजपाचा नेता प्रफुल पटेल यांना भेटला आणि त्यांना पटलं. हे सहजच पटेल असं नक्कीच वाटत नाही, यात मोठी डील झालीय, अशीच चर्चा आता मतदारसंघात, जनतेत सुरू आहे,’ अशी खदखद तिकीट कापण्यात आलेल्या चंद्रिकापुरेंनी व्यक्त केली आहे. Maharashtra Election 2024: दोन्ही शिवसेनेची एकच मागणी; मविआ, महायुतीची कोंडी; ठाकरे, शिंदेंना नेमकं काय हवंय? ‘कालपर्यंत मी भाजपाचा निष्ठावंत, कट्टर म्हणणार नेता आज सुमडीत आपल्या पक्षात आला. नेतेमंडळी पक्ष बदलायला मोकळी असतात. पण दादा सतरंज्या उचलणारा कार्यकर्ता एकनिष्ठतेची अग्निपरीक्षा देत असतो. म्हणूनच, आमच्या इथल्या नेत्याची सरड्यासारखी बदललेली भूमिका पाहून मला आणि माझ्या मतदारसंघातील जनतेलासुद्धा वाईट वाटलं. मतदारसंघातील जनता हे विसरणार नाही आणि हा विश्वासघातकीपणा लक्षात ठेवेल. तुम्हाला कदाचित हे पटलं असेल, पण माझ्या लोकांना हे अजिबात ‘पटेल’ असं नाही. त्यामुळे याच निवडणुकीत याचा हिशोब होणार आणि जनताच सुफडासाफ करणार. कारण, आता मी जनतेमध्ये जाऊनच दाद मागणार आहे, आता जनतेकडेच विधानसभेचं तिकीट मागणार आहे,’ असं म्हणत त्यांनी पत्राचा शेवट केला आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा