उन्हाळ्याच्या आणि पावसाळ्याच्या दमट हवामानात घराघरांमध्ये AC चा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो. AC ची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यासाठी आणि विजेचे बिल कमी करण्यासाठी नियमित सर्व्हिसिंग करणे गरजेचे असते. मात्र, AC सर्व्हिसिंग करताना ग्राहकांनी पुरेशी काळजी न घेतल्यास तंत्रज्ञांकडून फसवणूक होण्याची किंवा AC कायमचा नादुरुस्त होण्याची दाट शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया.

1. अधिकृत आणि अनुभवी तंत्रज्ञांचीच निवड करा
लोकल किंवा अपरिचित मेकॅनिककडून AC दुरुस्त करून घेणे कधीकधी महागात पडू शकते. शक्यतो तुमच्या AC ब्रँडच्या (उदा. Voltas, Daikin, LG) अधिकृत सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधा किंवा नामांकित आणि प्रमाणित सेवा देणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा वापर करा. अनधिकृत व्यक्तींना एसी हाताळू दिल्यास वॉरंटी रद्द होऊ शकते आणि लोकल पार्ट्स टाकून फसवणूक होण्याचा धोका असतो.
2. गॅस रिफिलिंगमधील फसवणूक ओळखा
AC सर्व्हिसिंगमधील सर्वात मोठा घोटाळा गॅस गळतीचा (Gas Leakage) असतो. अनेकदा मेकॅनिक गरज नसतानाही ” AC चा गॅस संपला आहे किंवा लीक झाला आहे” असे सांगून दोन ते तीन हजार रुपये अतिरिक्त उकळतात. अशा वेळी मेकॅनिकसमोर प्रेशर गेज (PSI Gauge) वर गॅसचे प्रेशर स्वतः तपासून घ्या. जर गॅस खरोखरच कमी असेल, तर आधी गळती कुठे आहे (Leakage Point) ते शोधण्यास सांगा, केवळ गॅस भरून घेऊ नका.
3. एअर फिल्टर आणि कूलिंग कॉइलची स्वच्छता
AC कमी कूलिंग करत असल्यास किंवा त्यातून दुर्गंधी येत असल्यास त्याचे एअर फिल्टर आणि कूलिंग कॉइल साफ करणे आवश्यक असते. सर्व्हिसिंग करताना मेकॅनिकने इनडोअर युनिटचे फिल्टर्स जेट पंपाच्या साहाय्याने व्यवस्थित धुतले आहेत ना, याची खात्री करा. कॉइलवर जमा झालेली धूळ नीट साफ न झाल्यास कॉम्प्रेसरवर ताण येतो, कूलिंग कमी होते आणि विजेचा वापर कमालीचा वाढतो.
4. आउटडोअर युनिटची योग्य साफसफाई
अनेकदा लोक केवळ घरातील इनडोअर युनिट साफ करून घेतातआणि बाहेर लावलेल्या आउटडोअर युनिटकडे दुर्लक्ष करतात. आउटडोअर युनिट उघड्यावर असल्यामुळे त्यात मोठ्या प्रमाणात धूळ, पाने किंवा कचरा अडकतो. कॉम्प्रेसरचे आयुष्य वाढवण्यासाठी आणि कूलिंग योग्य राहण्यासाठी आउटडोअर युनिटमधील कंडेन्सर कॉइल पाण्याच्या तीव्र प्रवाहाने (Water Jet) साफ करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
5. इलेक्ट्रिकल वायरिंग, पाण्याचा निचरा आणि बिलिंग
पावसाळ्यात किंवा दमट हवेत AC मधून पाणी गळण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर येतात. सर्व्हिसिंग करताना पाण्याचा निचरा करणारा ड्रेन पाईप ब्लॉक झालेला नाही ना, हे तपासा. तसेच, इनडोअर-आउटडोअर युनिट जोडणाऱ्या वायर्स तपासा; कारण शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण AC जळण्याचा किंवा घराला आग लागण्याचा धोका असतो. काम झाल्यावर कोणतेही नवीन पार्ट बदलल्यास त्याचे पक्के बिल आणि वॉरंटी नक्की मागा.

