उपांत्य सामन्यातील पराभवातून सावरण्याचे दोन्ही संघांसमोर आव्हान
वृत्तसंस्था, मियामी : आज शनिवारी होणाऱ्या तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात उतरताना फ्रान्स आणि इंग्लंडला विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दाऊण पराभवातून सावरून पुन्हा उभे राहावे लागेल. फ्रान्स संघाचे प्रशिक्षक म्हणून दिदिए दुशाम्प यांचा हा शेवटचा सामना असेल, तर किलियन एमबाप्पे वैयक्तिक विक्रमाच्या दिशेने वाटचाल करेल. दोन्ही संघांच्या अंतिम संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

सलग तिसऱ्यांदा विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचे फ्रान्सचे स्वप्न मंगळवारी स्पेनकडून झालेल्या 2-0 अशा पराभवामुळे भंग पावले, तर दुसऱ्या दिवशी अर्जेंटिनाकडून 2-1 असा पराभव झाल्याने इंग्लंडलाही निराशाजनक क्षणांचा सामना करावा लागला. 48 संघांच्या या मोठ्या स्पर्धेत प्रदीर्घ प्रवास केल्यानंतर दोन्ही संघ शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या थकले आहेत. त्यामुळे चषक जिंकण्याचे स्वप्न घेऊन उत्तर अमेरिकेत आलेल्या खेळाडूंसाठी कांस्यपदकाचा हा पारंपरिक सामना कदाचित एक नकोसे ओझे वाटू शकते. ‘कोणत्याही खेळाडूला, विशेषत: फ्रान्सच्या कोणत्याही खेळाडूला हा सामना खेळायचा नाही. त्यांना अंतिम फेरीत खेळायचे होते. अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी आम्ही सर्वस्व पणाला लावले होते’, असे इंग्लंडचे प्रशिक्षक थॉमस टुशेल म्हणाले.
रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ येऊनही त्याला हुकल्यामुळे इंग्लंडला स्वत:ची निराशा पचवावी लागेल. या स्पर्धेत आतापर्यंत फारशी खेळण्याची संधी न मिळालेल्या आपल्या संघातील खेळाडूंना मैदानात उतरवण्यासाठी टुशेल या सामन्याचा वापर करू शकतात. फ्रान्सही आपल्या सुऊवातीच्या संघात मोठे बदल करेल अशी अपेक्षा आहे. त्याच्या अंतर्गत या स्पर्धेत कमी संधी मिळालेल्या खेळाडूंना खेळवले जाऊ शकते.
दोन्ही संघांच्या अपेक्षांच्या तुलनेत या सामन्याचे महत्त्व कदाचित कमी असेल, तरीही राखीव खेळाडूंसाठी आपली छाप पाडण्याची ही एक शेवटची संधी असेल. त्याचवेळी, एम्बाप्पे आणि दुशाम्प यांच्यासाठी मात्र अधिक महत्त्वपूर्ण गोष्टी पणाला लागल्या असतील. एकासाठी इतिहास घडवण्याची संधी आहे, तर दुसऱ्यासाठी विजयासह निरोप घेण्याची संधी आहे.

एमबाप्पेसाठी आणखी एका पराक्रमाची संधी
तिसऱ्या स्थानासाठीच्या या सामन्यात संघावर फारसा दबाव राहणार नसल्यामुळे एमबाप्पेसाठी ही एक शेवटची संधी ठरू शकते. फ्रान्सच्या मोहिमेचा निराशाजनक शेवट एका ऐतिहासिक क्षणात बदलण्याची ही त्याच्यासाठी संधी असेल, ज्यामुळे त्याच्या कारकिर्दीत आणखी एका महत्त्वाच्या टप्प्याची भर पडेल. त्याची विश्वचषकातील वाटचाल आधीच विशेष ठरली आहे फ्रान्सचा कर्णधार एमबाप्पे सामन्याच्या सुरुवातीपासूनच मैदानात उतरू शकतो. कारण 27 वर्षीय एमबाप्पेने या विश्वचषकात आठ आणि एकूण साऱ्या विश्वचषकांत 20 गोल केले आहेत. यामुळे तो ‘गोल्डन बूट’च्या शर्यतीत आहे आणि स्पर्धेत सर्वाधिक गोल करण्याच्या विक्रमाच्याही अगदी जवळ पोहोचला आहे.
दुशाम्प यांच्या फ्रान्स प्रशिक्षकपदाच्या कारकिर्दीतील अखेरचा सामना
मियामी येथील हा सामना दुशाम्प यांच्या 14 वर्षांच्या कार्यकाळाची सांगता करेल. या काळात त्यांनी फ्रान्सला 2018 चे विश्वचषक विजेतेपद, चार वर्षांनंतर अंतिम फेरी आणि सलग तीन वेळा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठून दिली. प्रशिक्षक म्हणून दुसरे विश्वचषक विजेतेपद जिंकून निवृत्त होण्याची त्यांची इच्छा फलदायी ठरू शकली नसली, तरी शनिवारी त्यांच्या खेळाडूंना अशा प्रशिक्षकाला निरोप देण्याची शेवटची संधी मिळेल, ज्यांनी मागील दशकभरात फ्रान्सला आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वांत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संघांपैकी एक म्हणून प्रस्थापित केले.
‘गेल्या चार वर्षांत आम्ही सर्वोत्तम ठरलो आहोत, कुणाला ते आवडो वा न आवडो आणि कोणी काहीही म्हणो’
– लायोनेल मेस्सी, अर्जेंटिना
