Headlines

अहिल्यानगर:वेगवान युगात "आनंद चालीसा' ठरतेय मानसिक शांततेचा मार्ग




आजच्या वेगवान युगात प्रचंड धावपळ आणि सतत जिंकण्याच्या स्पर्धेमुळे मानवाची मानसिक शांतता हरवत चालली आहे. अशा काळात मानसिक स्थैर्य आणि आत्मिक समाधानासाठी जप, तप, आराधना आणि धर्माचरण अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रवर्तक पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांनी केले. नवी पेठ येथील जैन स्थानकात गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘आनंद चालीसा’ पाठाच्या वर्षपूर्ती सोहळ्यात ते बोलत होते. आचार्यश्रींचे कृपाशीर्वाद लाभलेल्या अहिल्यानगरमध्ये भाविक अत्यंत श्रद्धेने धर्माचरण करतात. नवीपेठ येथील जैन स्थानकाला अनेक तपस्वींचे सान्निध्य लाभले असल्याने या परिसरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा जाणवते. याच पवित्र ठिकाणी गेल्या वर्षभरापासून दर शुक्रवारी रात्री आनंद चालीसा पाठाचे अखंडपणे आयोजन केले जात असून, यामध्ये आबालवृद्ध भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. अशा धार्मिक कार्यांमुळे समाजात आनंदाचे वातावरण निर्माण होऊन नवचैतन्य येते. आनंद चालीसा पाठ हा मानवी जीवनाचे सार्थक करणारा आहे, अशा भावना पूज्य कुंदनऋषीजी महाराज यांनी यावेळी व्यक्त केल्या. नवी पेठ जैन स्थानकात पार पडलेल्या या वर्षपूर्ती सोहळ्याला पूज्य आलोकऋषीजी यांची उपस्थिती होती. तसेच जैन श्रावक संघाचे सेक्रेटरी संतोष गांधी, जय आनंद महावीर युवक मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सुभाष भंडारी, पारस लोढा, भरत बागरेचा, सचिन डागा, आनंद मुथा, बाबालाल गांधी, हेमंत मुथा, अमोल कटारिया, मनिषा मुनोत, मिनाताई मुनोत, ममता कटारिया उपस्थित होते. वंदना काठेड यांनी स्वागतगीत सादर केले. स्वागत शैलेश मुनोत यांनी, तर आभार सचिन डागा यांनी मानले. समाजात सकारात्मक विचार आणि ऊर्जा देणारा हा ‘आनंद चालीसा’ पाठाचा उपक्रम भविष्यातही अविरतपणे सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी संयोजकांनी व्यक्त केला. दर शुक्रवारी रात्री ९ वाजता होणाऱ्या या सामूहिक पाठामध्ये जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होऊन आत्मिक शांततेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आनंद चालीसा पाठ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत