Headlines

कधी मुसळधार कोसळणार, कधी उन्हाचा चटका; एल निनोमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढणार, महाराष्ट्रात काय स्थिती?| Maharashtra Times


Super El Nino Impact: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. हा एल निनोचा परिणाम असू शकतो असा अंदाज आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात एल निनोमुळे मान्सूनवर मोठा परिणाम दिसून येणार आहे.

सुपर एल निनो
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
Super El Nino : जुलै महिन्यात महाराष्ट्रातील बहुतांश शेतकरी खरीपाची पेरणी करतात. महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा दिला. शहरातील धरणांमधील जलसाठाही भरला. पण दुसऱ्या आठवड्यात पावसाने दडी मारली. शिवाय संपूर्ण आठवडा पाऊस होणार नाही असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची ३०-४०% तूट आहे तर काही जिल्ह्यांमध्ये ५०-७० टक्के तूट आहे. जुलैच्या सुरुवातीला पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं. पण आता मोसमी वाऱ्यांना चालना देणारी कोणतीही प्रणाली सक्रिय नाही.

अचानक मुसळधार पाऊस कशामुळे पडला?

प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. जुलै महिन्यात तो आणखी तीव्र होणार होता. परिणामी १०-१५ जुलैपर्यंत उत्तर, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांचा प्रभाव कमी झाला. याशिवाय मॅडेन-ज्युलियन ऑसिलेशनचा(MJO) मान्सूनवर मोठा प्रभाव झाला आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर मोसमी वाऱ्यांचा वेग मंदावला आणि ९ जुलैपर्यंत देशभर व्यापला. मान्सूनच्या संथ गतीमुळे जून महिनाही कोरडाच होता. मान्सूनपूर्व पावसाचीही देशात तूट होती. जुलैची सुरुवात होताच ही परिस्थिती पूर्णपणे बदलून गेली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे अनेक धरणांमधील पाणीसाठा वाढला. पण त्यानंतर पावसाने पुन्हा उघडीप दिली.

Maharashtra TimesMaharashtra Weather: ऐन जुलै महिन्यात राज्यात कोरडं वातावरण, पण येत्या आठवड्यात पाऊस धुमाकूळ घालणार; हवामान विभागाचा अंदाज

पाऊस सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकाची लागवडकेली. ही पिकं पावसावर अवलंबून राहतात. पिंकाची वाढ होताना मातीत सतत ओलावा असणं गरजेचं असतं. त्यासाठी पावसाची गरज असते. पणी गेले अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे पिकांचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. हवामान तज्ज्ञांच्या मते, या मागे कारण म्हणजे एल निनो. एल निनोमुळे साधारणतः भारतीय उपखंडातील आर्द्रतायुक्त वाऱ्यांच्या प्रवाहावर परिणाम होतो. यामुळे अनियमित स्वरूपात पाऊस होतो. कधी मुसळधार तर कधी कोरडं वातावरण निर्माण होतं.

अस्थिर मान्सूनचा अंदाज

यापूर्वीही एल निनोचा भारतात असाच प्रभाव दिसून आला आहे. कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळसदृष्य स्थिती निर्माण झाली. जुलै महिन्याच्या अखेरीस मान्सूनला आणखी एका हवामान प्रणालीमुळे चालना मिळणार आहे. त्यामुळे पुन्हा अतिवृष्टीचा इशारा देण्यात येईल. पण हवामान शास्त्रज्ञांनी तरीही सावधगिरी बाळगायचा सल्ला दिला आहे. यंदाचा मान्सूनचा हंगाम अत्यंत अस्थिर असेल असा त्यांचा अंदाज आहे.

Maharashtra TimesPune News: पुण्यात ३६ किमी लांब ‘उच्च क्षमता वर्तुळाकार मार्ग’, उन्नत मार्गावरून टोल-मुक्त प्रवास; कसा असेल प्रकल्प?

दरम्यान, अमेरीकेतील हवामान खातं NOAA एल निनो येत्या काही महिन्यात आणखी तीव्र होणार असून इतिहासातील सर्वात तीव्र बनू शकतो. २०२६ सह २०२७ पर्यंतही एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची ९७ टक्के शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हिवाळ्यापर्यंत सुपर एल निनो सक्रिय होण्याची ८१ टक्के शक्यता आहे. त्यामुळे यंदा भारतातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा