Headlines

मेघ पाठव कालिदासा… – the arrival of the month of ashadh has brought to mind kalidas meghaduta


-अतुल पांडे

‘आषाढस्य प्रथम दिवसे…’ म्हणजे महाकवी कालिदासांच्या स्मरणाचा दिवस. विरहातील यक्ष, त्याच्या प्रेयसीसाठी निरोप घेऊन निघालेला मेघ, त्याचे प्रवासवर्णन, ‘मेघदूत’मधील शब्दकळा या सगळ्यांचा आठव करण्याचा दिवस. हा दिन कुठे साहित्यरूपाने साजरा होतो, कुठे त्यावर नाट्यकृती सादर होते; तर कुठे चित्र रंगविली जातात. ज्या रामटेकच्या गडावर बसून कालिदासांनी ‘मेघदूत’ रचले असे मानले जाते, त्या गडावर काव्यजागर केला जातो. तो या वर्षीही झाला. दर वर्षी रामटेकच्या गडावर कालिदासाचे स्मरण होते, तेव्हा आजूबाजूने मेघ भिरभिरत असतात. या वेळी मात्र ते तिथे नाहीत. तिथेच काय विदर्भातही ते अभावानेच दिसतात. मेघच नाहीत तर ख्याली-खुशालीचे निरोप कोण नेणार?

कालिदासाला विदर्भाने मोहून टाकले होते. रामटेकचा उंचवटा, आषाढाचा महिना, भले मोठे ढग यांनी त्याला प्रभावित केले होते. आज रामटेकचा गड तसाच आहे, आषाढही सुरू झाला आहे, अभाव आहे तो ढगांचा. त्या ढगातून पडणाऱ्या पाण्याचा. आत्ताही पाणी आहेच, त्याची जागा तेवढी बदलली आहे. ते आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत.

‘एल निनोचा प्रभाव आहे. पाऊस कमी होईल,’ असे सांगितले गेले. जूनमध्ये पेरणी न करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला गेला. हक्काचा मृग गेला. त्यानंतरची नक्षत्रे गेली. जुलै तरी मनासारखा बरसेल असे वाटत असताना, तो अर्धा संपला, पण बरसलेला नाही. काही तुरळक सरींची आशा धरून कुठे कुठे पेरण्या झाल्या. कुठे उगवलेले अंकुर जळून गेले. कुठे अंकुरच फुटले नाहीत.

पाऊस नाही, बियाणे महागलेले, खते महागलेली, दुष्काळात तेरावा महिना म्हणावे तसे अमरावती आणि अकोला जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांनी पेरलेले बियाणे उगवले नाही. यात सोयाबीन उत्पादकांची संख्या मोठी आहे. ‘बूस्टर’ आणि ‘रवी सीड्‌स’ या दोन कंपन्यांची बियाणे उगवली नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी थेट पोलिसांतच केल्या आहेत. तुरळक ठिकाणी ‘महाबीज’वर शेतकऱ्यांचा रोष आहे. या दोन कंपन्यांच्या बियाण्यांवर महारोष आहे. या बियाण्यांचे नमुने घेतले गेले. त्याची तपासणी झाली. त्यातील काही बियाण्यांत उगवण क्षमता नसल्याचे निदर्शनास आले. आता बूस्टर कंपनी म्हणते, ‘तपासणीमध्ये ज्या बियाण्यांमध्ये उगवण क्षमता नसल्याचे सिद्ध झाले, त्या शेतकऱ्यांना आम्ही बियाण्यांचे पैसे परत करू.’ बियाण्यांचे पैसे जरूर परत मिळतील. बियाणे मातीत रोवून पिकांची वाट बघणारी त्यांची अपेक्षा, तिचे काय? त्यांचा वाया गेलेला वेळ त्याचे काय? हे नुकसान कोण भरून देणार, हा प्रश्न आहेच. निसर्गाच्या बेभरवशी वागण्यामुळे ज्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली, त्यांना जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बियाणे मोफत दिले जातील, अशी घोषणा आता सरकारने केली आहे. ती वेळेत तडीस जावी इतकेच. कारण सरकारी काम थोडे वेळखाऊ असते.

अकोला जिल्ह्यात गेल्या वर्षी सोयाबीन खरेदी घोटाळा झाला होता. ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने १९,७२३ क्विंटल सोयाबीन खरेदी केले. नाफेडच्या गोदामात मात्र १८,४२६ क्विंटलच सोयाबीन पोहचविले. लाखो रुपये किमतीच्या १,२९७ क्विंटल सोयाबीन खरेदीच्या बनावट पावत्या, खोट्या लॉट एंट्री बनविल्या गेल्या. पोलिसात गुन्हे दाखल झाले. पणन विभागाने कंपनीला परवा काळ्या यादीत टाकले. कारवाईची गती अशी असेल तर बोगस लोकांवर धाक कसा बसेल. दूषित अन्नपदार्थ विकणाऱ्यावर ज्या पद्धतीने कारवाया होत आहेत, त्यापेक्षा कडक कारवाया बोगस बियाणे विकणाऱ्यांवर होणे आवश्यक आहे.

एकीकडे जे पेरले ते उगवत नाही, दुसरीकडे नागपूरसारख्या महानगरातील मध्यवस्तीत; बगीच्यात गांजाची झाडे उगवतात. उद्यानात येऊन कोणी गांजा पेरून जाते, कुणी डोळ्यांसमोर बोगस बियाणे विकते, कुणी शेतकऱ्याचे सोयाबीन परस्पर विकते आणि आपल्याला खबरही नसते. प्रशासनाने इतक्याही नशेत असू नये!

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत