Headlines

Maharashtra Government Changes in Farmers Loan Waiver Scheme in Cabinet Meeting


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अतिशय महत्त्वाचे आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. या निर्णयांपैकी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय हा महत्त्वाचा आहे. राज्य मंत्रिमंडळात आता शेतकरी कर्जमाफीचे निकष बदलण्यात आले आहे. यामुळे आणखी 23 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे.

Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने कर्जमाफी योजना आणली आहे. या कर्जमाफीचा राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. विशेष म्हणजे कर्जमाफीच्या या योजनेतील एक निकष बदलण्यात आले आहे. या नव्या बदलामुळे बहुसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे. या कर्जमाफी योजनेसह नियमित कर्जाची रक्कम भरणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर पैसे देखील मिळणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर याबाबत अतिशय महत्त्वाची माहिती दिली.

आणखी 23 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार

शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा करण्यात आली आहे. २०२९ च्या कर्जमाफी योजनेतील सुमारे 13 लाख शेतकऱ्यांसाठीची पन्नास हजार रुपयांपर्यंतची मर्यादा रद्द करून, नियमित कर्जमाफी करण्यात आली आहे. सन २०२६-२७ मधील नियमित परतफेडीची अट रद्द केल्याने 23 लाख शेतकऱ्यांनाही प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे.

मुख्यमंत्री कर्जमाफीबाबत काय म्हणाले?

“मी विधानसभेत घोषणा केली होती, आजपर्यंत सर्व कर्जमाफी योजनांमध्ये नगदच्या कर्जमाफी योजनेतील जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं. यावेळी आम्ही त्यांनाही 50 हजारांपर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता. पण रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्तापक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की, त्यांनाही 2 लाखांची कर्जमाफी द्यावी. म्हणून पहिल्यांदाच राज्याच्या इतिहासात कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे”, अशी महत्त्वाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

“दुसरी जी अट होती 2026-27 सालाचे पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील. ही 2026-27 ची अट आपण काढून टाकलेली आहे. 2025-26 सालाचे पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर मदत मिळणार आहे. यामुळे काही शेतकरी अपात्र झाले असते. पण ते पात्र झालेले आहेत. मला असं वाटतं की आता देशातील आणि राज्यातील सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता जाहीर केली आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

30 जुलैपर्यंत कर्जमाफीचे पैसे मिळणार, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

शेतकरी कर्जमाफीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनीदेखील मोठं वक्तव्य केलं आहे. “येत्या 30 जुलै आधी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार आहे. तसेच जे इनकम टॅक्स भरतात त्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही”, असंदेखील दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं.

“ही कर्जमाफी गरीब शेतकऱ्यांसाठी आहे. इनकम टॅक्स भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही. 30 जुलैपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम दिली जाणार आहे”, असं दत्तात्रय भरणे म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळात एसटी महामंडळाबाबतही मोठा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एसटी महामंडळाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीच्या राज्यभरातील अतिरिक्त जागांचा विकास होणार आहे. पीपीपी तत्वावर जिल्हा, तालुका आणि ग्रामीण भागातील बसस्थानक आणि महामंडळाच्या जागांचा विकास करण्यास मान्यता देण्यात आली आहे. पण या निर्णयावर काही संघटनांनी आक्षेप घेतल्याची माहिती आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

निर्णयावर टीका करणाऱ्यांना फडणवीसांचं उत्तर

“पहिल्यांदा ज्या संघटनांनी हे सांगितलं त्या संघटनांना मला विचारायचं आहे की, एसटी तोट्यात आहे. त्याकरता तुम्ही काही करताय का? काही उपाययोजना केल्या आहेत का? केवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आणि एसटी तोट्यात ठेवायची हे बंद केलं पाहिजे”, असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं.

“एसटीची एकही जागा विकली जाणार नाही. लाँगटर्म डेव्हलोपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाच असणार आहे. माहिती न घेता केवळ प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा हे योग्य नाहीय. पहिल्यांदा या संघटनांची जबाबदारी आहे की, एसटीच्या सर्व घोटाळ्यांना बाजूला करुन एसटी फायद्यात आणली पाहिजे. यादृष्टीने ते काम करताना दिसत नाहीत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणखी कोणकोणते निर्णय घेण्यात आले?

  • दापचरी येथे उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाचा कृषी बाजार. दुग्ध प्रकल्पाची ५५८.४३ हेक्टर जमीन देण्याचा निर्णय. पालघर जिल्ह्यातील मौजे दापचरी (ता.डहाणू) येथील दुग्ध प्रकल्पाची जमीन महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडळास देण्यास मंजुरी. याठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाच्या कृषि बाजार उभारणीसह पणन विषयक सुविधा निर्माण करण्यात येणार. पालघर, ठाणेसह परिसरातील शेतकऱ्यांना सुविधेचा मोठा लाभ होणार. (सहकार व पणन)
  • राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तांसाठी मुद्रीकरण धोरण मंजुर. यामुळे मालमत्तांच्या वापरातून पारदर्शक आणि आणखी चांगले उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करता येणार. अल्पकालीन व दीर्घकालीन अशा नियोजनातून महापालिका, नगरपालिका, नगरपररिषदा, नगरपंचायतींना मिळकतीचे उपाय शोधता येणार. (नगर विकास विभाग)
  • राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अर्बन चॅलेंज फंड अभियान राबविण्यात येणार. शहरांना दर्जेदार पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी बाजाराधारित वित्तपुरवठा मिळविता येणार. (नगर विकास विभाग)
  • बीड जिल्हा क्रीडा संकुलाच्या २४ कोटी ९५ लाख रुपयांच्या कामांना मंजुरी. क्रीडा संकुलात सिंथेटीक अॅथलेटीक ट्रॅक, फुटबॉल, हॉकी मैदान, व्हॉलीबॉल, कब्बडी, खोखो मैदान, इनडोअर हॉल इमारत अद्ययावतीकरण, वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्याचे बांधकाम, रेनवॉटर हार्वेस्टींग करणे, विविध खेळाची मैदानांचा समावेश. (क्रीडा विभाग)
  • अपराधी परिविक्षा अधिनियम, १९५८ अंतर्गत मुक्तबंदी व परिविक्षाधीन बंदी यांना देण्यात येणाऱ्या सहायक अनुदान योजनेच्या रक्कमेत दुप्पटीने वाढ. निर्दोष सुटलेल्या बंद्यांचा योजनेत समावेश करुन योजनेअंतर्गत सहायक अनुदान आता पंचवीस वरून पन्नास हजार रुपये इतकी वाढ. (महिला व बाल विकास)
  • महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास व विनियमन) नियम, २०१३ मध्ये सुधारणा करण्यास मंजुरी ( महसूल व वन विभाग)

देवेंद्र फडणवीस यांचं राहुल गांधींना उत्तर

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी टीईटी घोटाळ्यावरुन टीका केली आहे. त्यावरही देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “राहुल गांधींना कल्पना नसेल की सरकारने कारवाई करुन पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली. पेपर फुटल्यानंतर आरोपींना पकडलं नाही. त्याआधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने आणि आमच्या पोलिसांनी केली आहे. निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी याचं नियोजन चालू आहे. त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत. फक्त मला याची कल्पना नाही की, राहुल गांधींनी ट्विट परदेशातून केलं आहे की देशातून केलं आहे. कारण ते बहुतांशवेळी परदेशात असतात. त्यामुळे त्यांना सर्वच माहिती असते असं नाही”, असा टोला फडणवीसांनी लगावला.

“आपण प्रो अॅक्टिवली कारवाई केली आहे. ज्यांना पकडलं आहे ते आंतरराज्यीय गुन्हेगार आहेत. त्यामुळे या कारवाईतून आपण अनेक राज्यांतील पेपरफूट वाचवण्याचे आपण प्रयत्न केले आहेत. राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वत:कडे, स्वत:च्या पक्षाकडे आणि स्वत:च्या सरकारकडे पाहावं आणि त्यानंतर बोलावं”, अशी टीका फडणवीसांनी केली.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा