Weather Update: राज्यात सर्वत्र १४ जुलै रोजी हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. पण हवामान विभागाने मान्सून पुन्हा कधी सक्रिय होणार याबद्दल त्यांचा अंदाज जाहीर केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मान्सूनने ब्रेक का घेतला?
भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार सध्या सक्रिय हवामानाच्या अनुपस्थितीमुळे किमान आठवडा संपेपर्यंत तरी शहरात मुसळधार पाऊस होणार नाही. सध्या मान्सूनची लाट कमकुवत झाली आहे. पश्चिमेकडून कोरडे वारे वाहत असल्यामुळे आर्द्रतायुक्त वाऱ्यांना चालना मिळत नाही. त्यामुळे पूर्वेकडील राज्य वगळता संपूर्ण देशभरात कोरडं वातावरण पसरलं आहे. शिवाय मुसळधार पावसाच्या ढगांच्या अनुपस्थितिमुळेही पाऊस होत नाही.
सध्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमध्ये कोरडं वातावरण पसरलं आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मान्सूनने विश्रांती घेतली आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्रात केवळ हलक्या पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे पसरला. हळूहळू त्याने अरबी समुद्र वर महाराष्ट्राच्या किनारपट्टीला व्यापलं. पण कालांतराने तो पट्टा गायब झाला. यामुळे मान्सूनचा जोर कमी झाला आहे असा अंदाज हवामान विभागाचे माजी प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना वर्तवला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अशीच प्रणाली पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात सक्रिय होण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अरबी समुद्रातील पश्चिमेकडून येणारे वारे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कोकण आणि घाटमाथ्याच्या परिसरात १७ जुलैपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर २० जुलैपासून मुंबई आणि पुण्यासह राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
कोकणातील हवामान आज कसं असेल?
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पावसाचा जोर ओसरला आहे. त्यामुळे १४ जुलै, मंगळवार रोजी, संपूर्ण कोकण किनारपट्टीवर हलका पाऊस होण्याचा अंदाज आहे. १७ जुलैपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पाऊस होईल का?
मंगळवारी दिवसभर सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. साताऱ्याच्या घाटमाथ्यात पावसाचा जोर वाढू शकतो. परंतू, सोलापूर जिल्ह्यात आज वातावरण पूर्णपणे कोरडं राहण्याचा अंदाज आहे.
उत्तर महाराष्ट्र व खान्देशात स्थिती कशी असेल ?
नाशिक जिल्ह्यात आज हलका पाऊस होईल. अहिल्यानगरमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्येही आज मेघगर्जनेसह हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.
मराठवाडा व विदर्भातील हवामान कसं असेल?
छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हिंगोली व नांदेड जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस होईल. दरम्यान, परभणी, बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये हवामान पूर्णपणे कोरडं राहण्याची शक्यता आहे. शिवाय विदर्भात नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्येही हवामान शांत राहील. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये १६ जुलैपासून मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
तुमच्या जिल्ह्यांत हवामान कसं आहे? कोणकोणत्या भागांत पाऊस सुरू आहे आणि तापमान वाढ कुठे जाणवते आहे? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

