![]()
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ गर्भपाताला नकार दिला म्हणून एका अंध महिलेला आणि तिच्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप मुलाला विहिरीत ढकलून देण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या क्रूर कृत्यात चिमुकल्या बालकाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून, त्याची गंभीर जखमी माता सध्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. गंभीर जखमी झालेल्या आईचे नाव सरस्वती पाटील असून, साडेतीन वर्षांच्या बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव कृष्णा आहे. आपल्याला आपले अंध पती स्वप्नील पाटील आणि सासू आशाबाई पाटील यांनी विहिरीत ढकलल्याचा खुलासा सरस्वती यांनी पोलिसांकडे केला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. अपघाताचा बनाव; पण अंध मातेच्या जबाबानं सत्य आलं समोर किनगाव शिवारातील एका विहिरीत महिला आणि लहान मुलगा पडल्याची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोघांना बाहेर काढले. दुर्दैवाने, साडेतीन वर्षांच्या कृष्णाचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता, तर त्याची आई गंभीर जखमी झाली होती. सरस्वती यांच्या जबावाने प्रकरणाला धक्कादायक वळण पीडित महिला आणि तिचा मुलगा दोघेही दृष्टीहीन असल्याने, सुरुवातीला हा केवळ एक ‘दुर्दैवी अपघात’ असावा असा पोलिसांचा अंदाज होता. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असताना जखमी माता सरस्वती पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबाने या प्रकरणाला धक्कादायक वळण दिले. आपले पती स्वप्नील पाटील (जे स्वतः अंध आहेत) आणि सासू आशाबाई पाटील यांनीच आपल्याला विहिरीत ढकलल्याचा खळबळजनक खुलासा सरस्वती यांनी केला. पूजेच्या बहाण्याने विहिरीजवळ नेले स्वप्नील आणि आशाबाई पाटील यांनी सून सरस्वती आणि तिचा मुलगा कृष्णाला विहिरीच्या पूजेच्या बहाण्याने यावल तालुक्यातील किनगाव शिवारात विहिरीजवळ नेले. तिथे पोहचताच अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला, तर सरस्वती या जखमी झाल्यात. त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबातून सारा प्रकार उघड झाला. यावल पोलिसांनी दोन्ही आरोपी स्वप्नील पाटील आणि आशाबाई पाटील यांना ताब्यात घेतले आहे.
Source link
सोनोग्राफीच्या वादातून जळगावात हत्या:गर्भपाताला नकार दिला म्हणून अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; मुलाचा बुडून मृत्यू, अंध पती आणि सासूचे कृत्य
