Headlines

TET Paper-Leak Scam: परीक्षा नव्हे, अग्निपरीक्षा! – maharashtra tet paper leak scam special explained



-सुजाता पाटील

महाराष्ट्रात २०१३ साली टीईटी, म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा सुरू केली. डीएड किंवा बीएड पदवी मिळवून शिक्षकी पेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही पात्रता परीक्षा सुरुवातीला घेतली जात होती. इतर स्पर्धा परीक्षांच्या धर्तीवर सुरुवातीच्या काळात ऑफलाइन व नंतर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेतली गेली.

सुरुवातीपासूनच या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी तीन ते साडेतीन टक्के एवढीच राहिलेली आहे. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीच्या या परीक्षेची एकूण काठिण्य पातळी आणि प्रश्नपत्रिकेचे तांत्रिक स्वरूप याबद्दल या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अनेकदा तक्रारीचाच सूर ऐकला आहे. शिक्षक होण्यासाठीच डीएड किंवा बीएड या प्रकारचे पदविका किंवा पदवी अभ्यासक्रम आखले गेलेले आहेत. ते यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची पुन्हा वेगळी पात्रता परीक्षा घेण्याची गरज भासणे म्हणजे शासनाने आपल्याच व्यवस्थेवर अविश्वास दाखवण्यासारखे आहे. ही परीक्षा घ्यायचीच असेल तर खरे तर ती कल चाचणी या स्वरूपाची असावी. इतर व्यावसायिक स्पर्धा परीक्षांसारखी केवळ वर्तुळे रंगवायला लावणारी परीक्षा एखादी व्यक्ती शिक्षक व्हायला योग्य आहे की नाही हे ठरवण्यास पुरेशी असू शकत नाही. या परीक्षेच्या अतिकाठिण्यपातळीमुळे विद्यार्थ्यांना पुन:पुन्हा या परीक्षेला बसावे लागते आणि त्यासाठीचे शुल्क भरावे लागते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील विद्यार्थ्यांना वारंवार हा खर्च परवडण्याजोगा नसतो.

एकीकडे प्रचंड बेरोजगारी आहे, शिक्षण क्षेत्रातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त असलेले लाखो विद्यार्थी शिक्षकी पेशात येण्यासाठी उत्सुक आहेत, दुसरीकडे महाराष्ट्रात हजारो शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत, पण या दोहोंच्या मध्ये टीईटी परीक्षेचा प्रचंड मोठा अडथळा उभा करून ठेवला आहे.

त्यातच सर्वोच्च न्यायालयाने सर्व सेवारत शिक्षकांसाठीही टीईटी अनिवार्य केली. उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम मुदत ऑगस्ट २०२८ ही निश्चित केली. सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुष्टी केली आहे की, शिक्षण हक्क कायदा (आरटीई), २००९ लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या शिक्षकांसह, सर्व सेवारत शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य आहे.
सप्टेंबर २०२५ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांनाही टीईटी म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागणार आहे, हे स्पष्ट झाले आहे. ज्या शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे त्यातील अनेक शिक्षकांची वीस, पंचवीस वर्षे सेवा झालेली आहे. बहुसंख्य शिक्षक वयाची पंचेचाळीशी पार केलेले आहेत. त्यामुळे आता या टप्प्यावर आपण शिक्षक म्हणून काम करण्यास, विद्यार्थ्यांना शिकवण्यास पात्र आहोत, हे परीक्षा देऊन सिद्ध करण्याची वेळ बहुसंख्य अनुभवी शिक्षकांवर आलेली आहे.

हे अगदी शंभर टक्के मान्य आहे की, शिक्षकांनी, शिकवण्याच्या पेशामध्ये असलेल्या सर्वांनीच सतत स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करत राहिले पाहिजे परंतु, अशा पद्धतीची बहुपर्यायी परीक्षा घेऊन शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्य तपासणे योग्य आहे का, याचाही विचार झाला पाहिजे. टीईटी परीक्षा एका अशा संस्थेमार्फत घेतली जाते जी संस्था बँकिंग क्षेत्रातील उमेदवार निवडण्यासाठी स्पर्धा परीक्षा घेते, असे कळते. शिक्षकी पेशा हा काही तांत्रिक पेशा नाही किंवा बँकिंगसारखा तो केवळ आकडेमोडीचा व्यवसाय नाही. शिक्षकांचा संबंध हा शिकण्यास उत्सुक असलेल्या, सतत नवनवीन कल्पनांच्या शोधात असलेल्या शारीरिक आणि मानसिक वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर असलेल्या विविध वयाच्या विद्यार्थ्यांशी असतो.

शिक्षकांसमोर विद्यार्थ्यांची जिवंत ऊर्जा असते. दर पाच वर्षांनी एक पिढी बदलते. त्यामुळे शिक्षकांसमोर असणारी आव्हाने सतत बदलत असतात. वर्गात चाळीस मुले असतील तर ते प्रत्येक मूल वेगळं असतं. दरवेळी विद्यार्थ्यांना हाताळण्यासाठी शिक्षकांना लागणारी कौशल्ये बदलत असतात. ही कौशल्ये अशा प्रकारच्या तांत्रिक पद्धतीच्या परीक्षेमधून तपासणे कसे शक्य आहे?
खरेतर प्रगत होत जाणारे तंत्रज्ञान, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित होत असलेले शैक्षणिक प्रवाह, सतत बदलत असणारी सामाजिक, राजकीय, आर्थिक, पर्यावरणीय परिस्थिती या अनुषंगाने विद्यार्थ्यांना बदलत्या जीवनशैलीला आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करणे हे शिक्षकाचे काम असते. मोबाइल आणि इंटरनेटच्या या युगात विद्यार्थ्यांचे वर्तन, त्यांची बदललेली मानसिकता हाताळणे हे शिक्षकांसमोरचे मोठे आव्हान आहे.

सद्यस्थितीत या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण शिक्षकांना मिळणे अत्यंत गरजेचे आहे. शिक्षकांना अशा पद्धतीने प्रशिक्षित करून ही कौशल्ये त्यांना आत्मसात झाली आहेत की नाही याची चाचणी घेणे आणि त्यासाठी त्यांना अधिक काही मार्गदर्शन, मदत हवी असेल तर ती पुरवणे ही शिक्षण विभागाची, शासनाची सहकार्याची, प्रगतिशील भूमिका असली पाहिजे. विद्यार्थ्यांचे जसे सर्वांगीण, आकारिक मूल्यमापन केले जाते तसेच शिक्षकांचे मूल्यमापन करण्याची पद्धत वापरली तर ते जास्त योग्य होईल. शिक्षकांचे मूल्यमापन करायचे असेल तर आधी त्यांना सुयोग्य, परस्परसंवादी असे उत्तम प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.

टीईटी सारखी तांत्रिक चाचणी घेणेच मुळात अयोग्य आहे. या चाचणीच्या निकालातील उत्तीर्णतेची टक्केवारी इतकी कमी असते की ही परीक्षा जाणूनबुजून शिक्षकी व्यवसायाचे प्रशिक्षण घेऊन त्यात यशस्स्वी झलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षकी पेशात येण्यास रोखणारी आणि विद्यमान शिक्षकांना सेवेबाहेर काढण्यासाठी आहे की काय, अशी शंका यावी.

खरे तर शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याचे कौशल्य ,समोरच्या विद्यार्थ्यांची ग्रहण क्षमता लक्षात घेऊन त्याप्रमाणे अध्ययन पद्धती वापरण्याचे कौशल्य हे अशा लेखी परीक्षेमधून मोजता येणे शक्य नाही. काही वेळा असेही आढळून येते की एखाद्या विषयात सुवर्णपदक मिळवलेल्या व्यक्तीलाही तो विषय समोरच्या विद्यार्थ्यांना समजेल अशा पद्धतीने शिकवता येईलच असे नाही, याउलट गुणपत्रिकेवर पन्नास टक्के गुण असलेला एखादा शिक्षक सुद्धा अतिशय विद्यार्थीप्रिय शिक्षक असू शकतो. काही शिक्षकांना मुलांबरोबर संवाद साधण्याची हातोटी असते. मुलांना त्यांच्याबरोबर नाचणारे, गाणारे , खेळणारे, गोष्टी सांगणारे शिक्षक आवडतात. टीईटी सारख्या परीक्षेतल्या गुणांवरून फक्त एखादी व्यक्ती चांगली शिक्षक आहे की नाही हे कसे ठरवता येईल? त्यामुळे अध्ययन कौशल्याचे मूल्यमापन अशा पद्धतीच्या बहुपर्यायी परीक्षेतून होणे केवळ अशक्य आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, अनुदानित मराठी शाळांची सद्यस्थिती अतिशय विदारक आहे. कमी विद्यार्थी संख्या, मोडकळीस आलेल्या इमारती, जेवढे विद्यार्थी आहेत त्यांनाही शिकवायला योग्य प्रमाणात शिक्षक नाहीत, अशी परिस्थिती आहे. शाळेत पुरेसे शिक्षक नाहीत आणि जे आहेत त्यांना विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळू दिला जात नाही. पोषण आहार, सरल, यू डायस आणि रोज येणारी असंख्य ऑनलाइन कामे, वेळोवेळी मागवली जाणारी तातडीची माहिती, प्रशिक्षण, जनगणना, ‘एसआयआर’ची कामे या सगळ्यांतून शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकवायलाच वेळ मिळणे दुरापास्त झालेले असताना शिक्षकांनी स्वतः अभ्यास कधी करायचा ?

आपल्या देशातल्या जवळपास सगळ्याच स्पर्धा परीक्षांना झालेली पेपरफुटीची लागण या टीईटी परीक्षेलाही झालेलीच आहे. या परीक्षेचे केंद्र तुम्ही राहत असाल तिथून जवळच येईल याचीही खात्री नसते. त्यामुळे यावर्षी पेपरफुटी होऊन परीक्षा रद्द झाल्याची बातमी पसरली तेव्हा अनेक विद्यार्थी, शिक्षक पेपर देण्यासाठी दूरवरच्या केंद्रांवर जाण्याकरिता प्रवासात होते. काही जण आदल्या दिवशीच मुक्कामाला गेलेले होते. या परीक्षार्थ्यांना प्रचंड मानसिक ताण सोसावा लागला. सेवेत नसणारे विद्यार्थी अक्षरश: रात्रीचा दिवस करून अभ्यास करतात, त्यांना आशा असते की यावर्षी तरी आपण परीक्षा उत्तीर्ण होऊ. नजिकच्या भविष्यात कुठेतरी शाश्वत नोकरी मिळेल. त्यांना ‘पवित्र पोर्टल’ चा आणखी एक खडतर मार्ग पार करायचा असतो. तरीही ते विद्यार्थी वर्षानुवर्षे मनात आशा धरून प्रयत्न करत आहेत. अशा पेपरफुटीनंतर त्यांची मानसिक अवस्था काय होत असेल ?
सेवेत असणाऱ्या शिक्षकांच्या डोक्यावर तर आपली नोकरी वाचवण्याची टांगती तलवार आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालू असलेल्या वार्षिक परीक्षा, त्यानंतर निकालाची कामं, मे महिन्यात जनगणना, त्यासोबतीला नवीन विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठीची खटपट, शाळा प्रवेशोत्सव ही सारी कसरत करत शिक्षक रात्री जागून अभ्यास करत होते.

आता ही परीक्षा पुन्हा होतील. त्यात भर म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि अनुदानित शाळांच्या शिक्षकांना चार महिन्यांसाठी SIR कामासाठी शाळेच्या सेवेतून पूर्ण मुक्त करण्याचे आदेश दिले जात आहेत. ही नवी वेठबिगारी त्यांच्यावर लादली जात आहे. हे शिक्षक अक्षरश: १६-१६ तास काम करत आहेत. अशा शारीरिक आणि मानसिक अवस्थेत ते काय आणि कसा अभ्यास करणार ?

म्हणूनच अशा तांत्रिक पद्धतीच्या परीक्षेपेक्षा शिक्षकांसाठी सर्वांगीण मूल्यमापनाची पद्धत वापरली पाहिजे. यासाठी प्रत्यक्ष काम करणारे शिक्षक, शिक्षण अभ्यासक, शिक्षण क्षेत्राचा अनुभव असलेले आजी माजी शासकीय अधिकारी यांच्या समन्वयाने या मूल्यमापनाचे स्वरूप ठरविले जावे. अशा पद्धतीच्या मूल्यमापनात पेपरफुटीची शक्यताही राहणार नाही.

सध्याच्या टीईटी परीक्षेच्या स्वरूपामुळे आधीच रोजच्या रोज तोंड द्याव्या लागणाऱ्या असंख्य अडचणी ,समस्या यांनी पिचलेल्या शिक्षकांसाठी टीईटी ही केवळ परीक्षा नाही तर ‘अग्निपरीक्षा’ ठरते आहे!
—————————————
(लेखिका सु. ए. सो माध्यमिक विद्यालय कुरूळ, ता. अलिबाग (रायगड) येथे मुख्याध्यापिका आहेत.)



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत