Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:मुलांना विज्ञानाच्या मदतीने आपले पारंपरिक ज्ञान समजावून सांगता येते




‘केस लवकर कसे वाढवावेत?’ आणि ‘माझे केस का गळत आहेत?’ हे केसांच्या निगेबाबत गुगलवर सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या दहा प्रश्नांपैकी आहेत. जगभरातील लाखो लोक वेगवेगळ्या प्रश्नांसाठी ‘हेअर ग्रोथ’ हा शब्द वापरून शोध घेतात. गेल्या मंगळवारी कपिवाचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमीव शर्मा यांच्याशी बोलत असताना मी ही माहिती त्यांच्यासोबत शेअर केली. त्यावर त्यांनी एक अशी गोष्ट सांगितली की, मला आश्चर्य वाटले. ते म्हणाले, ग्राहकांच्या या जागतिक गरजेमुळे न्यूट्राफॉल हा युनिलिव्हरच्या वेलबिइंग व्यवसायातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. या उत्पादनातील प्रमुख घटक शतावरी असल्याने ते आयुर्वेदाच्या ज्ञानावर चांगली कमाई करत आहेत. आमची चर्चा 45 मिनिटांहून अधिक वेळ चालली. शेवटी आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की, जीवनाची गुणवत्ता आणि आर्थिक समृद्धी वाढवायची असेल, तर केवळ आयुर्वेद नव्हे, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचाही आधुनिक विज्ञानाशी समन्वय साधून अभ्यास करणे आवश्यक आहे. या चर्चेची आठवण मला शनिवारी झाली. ऑस्ट्रेलियातून आलेल्या माझ्या एका मित्राच्या कुटुंबातील दोन मुलांनी रविवारी बाहेर जेवायला जाण्याचे ठरवले होते. मी त्यांना मला त्यात सहभागी करू नका, अशी विनंती केली. त्यांनी ‘तुम्ही उपवास का करता?’ किंवा ‘त्यामागील विज्ञान काय आहे?’ असे विचारण्याऐवजी, ‘अनेक पिढ्यांनी शेकडो वर्षे ही परंपरा का जपली?’ असा प्रश्न विचारला. अनेकदा अशा प्रश्नातूनच नव्या वैज्ञानिक चर्चेची सुरुवात होते. माझ्या भूमिकेच्या समर्थनार्थ मी जपानी पेशीजीवशास्त्रज्ञ योशिनोरी ओसुमी यांच्या संशोधनाचा उल्लेख केला. पेशीतील ऑटोफॅजी या प्रक्रियेची यंत्रणा शोधून काढल्याबद्दल त्यांना 2016 मध्ये शरीरक्रियाशास्त्र किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले. ऑटोफॅजी म्हणजे पेशीतील खराब किंवा अनावश्यक घटकांचे विघटन करून त्यांचा पुनर्वापर करण्याची प्रक्रिया. त्यांनी एकादशीचा अभ्यास केलेला नव्हता आणि उपवासाने आजार बरे होतात, असेही त्यांनी सिद्ध केले नव्हते. मात्र त्यांनी हे दाखवून दिले की, शरीराला काही काळ पोषणतत्त्वांचा तुटवडा जाणवला, तर पेशी स्वतःची अंतर्गत पुनर्वापर यंत्रणा सक्रिय करतात. त्यामुळे पेशींचे आरोग्य टिकून राहण्यास मदत होते. आपल्या पूर्वजांकडे सूक्ष्मदर्शक नव्हते. जनुकीय अनुक्रमणाचे तंत्रज्ञानही नव्हते. पण त्यांच्याकडे शतकानुशतके जमा झालेला अनुभव आणि निरीक्षणांचा मोठा ठेवा होता. त्यांनी पाहिले होते की, संयमाने आणि मर्यादित प्रमाणात अन्न घेतल्याने आरोग्य सुधारते, मन अधिक एकाग्र होते आणि आत्मशिस्त वाढते. आयुर्वेदातील अनेक ग्रंथांमध्ये ‘लंघन’ म्हणजेच पचनसंस्थेवरील ताण कमी करून शरीरातील संतुलन पुन्हा प्रस्थापित करण्याचा उपाय सांगितला आहे. आधुनिक जीवनशैली मात्र याच्या अगदी उलट दिशेने जाताना दिसते. आपण सतत काही ना काही खात असतो, रात्री उशिरा जेवतो आणि पचनसंस्थेला आवश्यक विश्रांती देत नाही. त्यामुळे शरीरातील दुरुस्तीची अनेक कामे करण्याऐवजी शरीर सतत अन्न पचवण्यातच व्यग्र राहते. म्हणूनच आज इंटरमिटंट फास्टिंग जगभर लोकप्रिय झाले आहे. पण कोट्यवधी भारतीयांसाठी श्रद्धेच्या आधारावर एकादशी किंवा इतर ठरावीक दिवशी उपवास करण्याची शिस्तबद्ध परंपरा शतकानुशतके अस्तित्वात आहे. नियंत्रित उपवासाचे नवे फायदे संशोधनातून समोर येतात, तेव्हा पुन्हा जाणवते की, भारतातील अनेक प्राचीन परंपरा निसर्ग आणि मानवी शरीराच्या सूक्ष्म निरीक्षणांवर आधारित होत्या. जीवशास्त्राच्या पुस्तकांत पेशींच्या पुनर्वापर प्रक्रियेचे वर्णन येण्याच्या खूप आधी आपल्या पूर्वजांनी उपवासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवले होते. तो उपचार म्हणून नव्हे, तर विवेकपूर्ण जीवनशैलीचा एक भाग म्हणून. आपल्या पूर्वजांनी कधी सेल्युलर रिसायकलिंग, मेटाबॉलिक स्विचिंग किंवा ऑटोफॅजी यांसारखे शब्द वापरले नाहीत. त्यांनी संशोधनपर लेखही प्रकाशित केले नाहीत. त्यांनी फक्त पिढ्यान‌्पिढ्या निसर्ग, ऋतू, मानवी वर्तन आणि आरोग्य यांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यांचे ज्ञान प्रयोगशाळेतील उपकरणांमधून नव्हे, तर शतकानुशतके साठलेल्या अनुभवातून विकसित झाले. त्यामुळे परंपरा आणि विज्ञान यांच्यात संघर्षाचे नाते असणे आवश्यक नाही. परंपरा अनेकदा एखादी संकल्पना मांडते, तर विज्ञान तिची पडताळणी करते. एक अनुभव जपते, तर दुसरे त्यामागील कारण स्पष्ट करते. फंडा असा आहे की, आपला वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवा. त्यांना डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवायला सांगू नका आणि तो नाकारायलाही सांगू नका. त्याऐवजी विज्ञानाच्या मदतीने आदर, कुतूहल आणि चिकित्सक दृष्टीने त्याचा शोध घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत