“महाराष्ट्रामध्ये संस्कार जपण्याची पद्धत आहे. शरद पवार यांच्यासारखे देशाचे आणि राज्याचे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व जर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटत असेल, तर त्यात वावगे काय? प्रत्येक घटनेला राजकीय रंग आणि आयाम देऊ नये,” अशा शब्दांत महसूल मंत्री
.
शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊतांना टोला
शरद पवार यांनी विधिमंडळात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी ‘ज्यांनी सरकार पाडले त्यांना भेटणे कितपत योग्य आहे?’ अशी नाराजी व्यक्त केली होती. यावर उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, “आम्ही विरोधी पक्षात असतानाही अनेकदा सरकारकडे जायचो. शरद पवार स्वतः मुख्यमंत्र्यांशी सन्मानाने चर्चा करतात, ही तर महाराष्ट्राच्या गौरवाची घटना आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती असून यावर कोणीही आक्षेप घेण्याची गरज नाही. प्रत्येक घटनेत राजकारण शोधू नये.” तसेच, सुनेत्रा पवार आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर बोलताना ते म्हणाले की, “सुनेत्रा पवार यांची मुख्यमंत्र्यांसोबत रोजच भेट आणि चर्चा होत असते. यात राष्ट्रवादी एनडीए सोबत येण्याचा कोणताही प्रश्न नाही, या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही.”
राज ठाकरेंवर नाराजी- “त्यांनी फडणवीसांचे अभिनंदन करायला हवे होते”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मिसिंग लिंकच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मिमिक्री करत टीका केली होती. यावर बावनकुळे यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. “मला वाईट वाटते की राज साहेबांसारख्या नेतृत्वाने असे का बोलावे? देवेंद्र फडणवीस हे या महाराष्ट्राचे भविष्य आहेत. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्राला विकसित करण्याचा जो प्लॅन विधानसभेत मांडला, तो ऐकून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी त्यांचे अभिनंदन करायला हवे होते. पण माझा तिथे भ्रमनिरास झाला.”
“एका छोट्याशा घटनेवरून काही पेड वर्कर लावून फडणवीसांची ‘डिझास्टर मॅन’ म्हणून बदनामी करण्याचा आणि त्यांची इमेज खराब करण्याचा प्रयत्न झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांचे नाव ‘इन्फ्रा मॅन’ म्हणून येणाऱ्या 10 पिढ्या सुवर्णअक्षरांनी नोंदवतील.”
बावनकुळे यांनी सांगितले की, 22 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ राबवण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिबिरे आयोजित करून महसूल, ग्रामविकास, कृषीसह विविध विभागांच्या 55 सेवा नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील. या अभियानाचा लाभ किमान 10 लाख कुटुंबांना मिळावा, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या शिबिरांमध्ये गावठाणातील घरांना स्वामित्व कार्ड, तसेच पात्र महिलांना ‘शेतकरी’ दर्जाचे प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रमही होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 22 जुलैला शक्य न झाल्यास 25 किंवा 26 जुलैला हे शिबिर घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूरमधील 118 वर्षांचा प्रश्न मार्गी
सोलापूरमधील ब्रिटिशकालीन **813 मालमत्तांचा 118 वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न निकाली काढण्यात आला असून, सुमारे 9 हजार कुटुंबांना मालकी हक्क मिळणार असल्याची माहिती बावनकुळे यांनी दिली. 1989 च्या रेडी रेकनर दराच्या केवळ अडीच टक्के शुल्क आकारून या मालमत्ता फ्रीहोल्ड करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीवर समिती काम करत असल्याचा दावा
शेतकरी कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली व्यापक समिती काम करत आहे. कर्जमाफीतील त्रुटी दूर करून शेतकऱ्यांना अधिक चांगला लाभ कसा देता येईल, यावर सरकार विचार करत असल्याचे त्यांनी सांगितले.
मिसिंग लिंक खर्चावर टीका फेटाळली
मिसिंग लिंक प्रकल्पाच्या वाढलेल्या खर्चावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर बावनकुळे म्हणाले की, हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा आणि अत्यंत गुंतागुंतीचा प्रकल्प आहे. अशा प्रकल्पांना खर्च येतोच. सरकारकडून तसेच विविध संस्थांकडून नियमित लेखापरीक्षण (ऑडिट) होत असते. घरबसल्या टीका करणाऱ्यांच्या आरोपांना काहीही महत्त्व नसल्याचे सांगत त्यांनी विरोधकांच्या टीकेची खिल्ली उडवली.
संबंधित बातमी वाचा…
मुख्यमंत्र्यांची विधानसभेत बघून घेईनची भाषा कशी?:’मिसिंग लिंक’ आणि राम मंदिर चोरीवरून राज ठाकरेंची महायुती सरकारवर सडकून टीका

“पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’च्या मुद्द्यावरून विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘देख लुंगा’ अशी भाषा वापरतात आणि चक्क हिंदीतून बोलतात. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, समोर बसलेले आमदार मराठी आहेत, मग तुम्ही विधानसभेत हिंदीतून कुणाला दम देत आहात? दिल्लीत बसलेल्या तुमच्या पक्षातील वरिष्ठांना संदेश द्यायचा आहे का?” अशा शब्दांत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. येथे वाचा संपूर्ण बातमी
मिसिंग लिंकवरून पृथ्वीराज चव्हाणांचे फडणवीसांना प्रत्युत्तर:आमदार खरेदीचे 50 खोके कुठून येतात, प्रकल्पाला विरोध नव्हता, पण भ्रष्टाचार आणि खर्चवाढीवर प्रश्न

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाला स्थगिती देण्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. “आमदार खरेदी करण्यासाठी लागणारे 50-50 खोके कुठून येतात? तर हा सर्व पैसा रस्ते कंत्राटांमधून येतो,” असा खळबळजनक आरोप चव्हाण यांनी केला आहे. कर्नाटकातील ‘पे सीएम’ आणि 40 टक्के कमिशनच्या घोषणेपेक्षा महाराष्ट्रातील परिस्थिती अधिक भयंकर असल्याचे सांगत त्यांनी राज्य सरकारच्या कारभारावर आणि भ्रष्टाचारावर सडकून टीका केली आहे. बीबीसी मराठीला दिलेल्या विशेष मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण यांनी मिसिंग लिंक, समृद्धी महामार्ग, रस्त्यांवरील खड्डे आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवर सविस्तर भाष्य केले. येथे वाचा संपूर्ण बातमी
मिसिंग लिंकवरून विरोधकांना फडणवीसांचे सडेतोड प्रत्युत्तर: म्हणाले- मला बदनामा करा, पण महाराष्ट्राला बदनाम करू नका; 13 हजार कोटींचा पूर नियंत्रण आराखडा

मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) अतिवृष्टी, पूरस्थिती, मिसिंग लिंक प्रकल्प आणि पायाभूत सुविधांवर विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा मांडला. यावेळी त्यांनी मुंबईत अवघ्या सहा दिवसांत पावसाळ्यातील सुमारे 42 टक्के पाऊस झाल्याचे सांगत हा अपवादात्मक पाऊस असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर मुंबईची तुंबई रोखण्यासाठी 13 हजार कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार केल्याची माहिती दिली. मिसिंग लिंक प्रकल्पावरील टीकेलाही त्यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आघाडी सरकारने हा प्रकल्प अशक्य असल्याचे सांगून फाइल बंद केली होती, तर महायुती सरकारने तो प्रत्यक्षात पूर्ण करून दाखवल्याचा दावा केला. येथे वाचा संपूर्ण बातमी
