- Marathi News
- International
- Rebellion In PoK, 48 hour Warning To Pakistan Government, Preparations To March, Tension On The Next Day As Well; Many Policemen Injured In Encounter
यासर आलम | इस्लामाबाद/मुजफ्फराबाद14 तासांपूर्वी
- कॉपी लिंक

पीओकेमध्ये (पाकव्याप्त काश्मीर) बंड अधिक तीव्र झाले आहे. रविवारी येथे पोलिसांच्या कारवाईत एका आंदोलकाचा मृत्यू आणि अनेक जण जखमी झाल्यानंतर हे आंदोलन अधिकच उग्र झाले. सूत्रांनुसार, अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार चकमक झाली. डडियाल येथे आंदोलकांसह काही पोलिस कर्मचारीही जखमी झाले. यातील तिघेजण अतिदक्षता विभागात आहेत.
रविवारी झालेला गोळीबार व अटकेच्या कारवाईनंतर जम्मू-काश्मीर जॉइंट अवामी ॲक्शन कमिटीने (जेएएसी) पाकिस्तान सरकारला ४८ तासांचा अल्टिमेटम दिला आहे. संघटनेवरील बंदी उठवावी व ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांची सुटका करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास ९ जुलै रोजी कार्यकर्ते पीओकेची राजधानी मुजफ्फराबादच्या दिशेने मोर्चा काढतील, असा इशाराही दिला आहे. दरम्यान, इस्लामाबादहून मुजफ्फराबादला जाणारा मुख्य रस्ता वाहतुकीसाठी खुला केला आहे, परंतु खोऱ्यातील अनेक भागांत अजूनही मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त व चेकपोस्ट आहेत.
भारताकडे मदतीचे आवाहन
पीओकेचे नेते सरदार अमान काश्मिरी यांनी भारताला एलओसीवरील दळणवळण सुलभ करण्याचे आवाहन केले. रावलकोटमधील लोकांनाही सामान्य जीवन जगण्याची संधी मिळाली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे. सध्या सर्वसामान्यांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
निवडणुकीवर राजकारण
पीओकेमध्ये तीन आठवड्यांनंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) ‘रिफ्युजी सीट’चा वाद सुटेपर्यंत निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. पक्षाने जेएएसीसोबत चर्चा करण्याचा पुरस्कार केला आहे.
दुसरीकडे, पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे की आंदोलन मागे घेतल्यावरच चर्चा होईल, तर जेएएसी आधी बंदी उठवण्याच्या व कार्यकर्त्यांच्या सुटकेवर ठाम आहे.
पोलिस नाकेबंदीमुळे गरजेचे साहित्य पोहोचू शकत नाही
अन्नधान्याच्या पुरवठ्यावरूनही दोन्ही बाजू आमने-सामने आल्या आहेत. पोलिसांच्या नाकेबंदीमुळे लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहोचत नसल्याचा आरोप जेएएसीने केला आहे, तर आंदोलकच वाहतुकीत अडथळा आणत असल्याचा दावा पाकिस्तान सरकारने केला. खोऱ्यात ३० दिवसांपासून जनजीवन विस्कळीत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. कर्फ्यूसारख्या स्थितीचा लोकांना त्रास होत आहे.
पाक गुप्तचर संस्थांची पाचावर धारण, ज्येष्ठ अधिकारी तैनात
इस्लामाबादच्या गुप्तहेर यंत्रणेशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दावा केला की, पीओकेमधील परिस्थितीमागे भारताची ‘सिंदूर २.०’ मोहीम आहे. हा अधिकारी म्हणाला, ‘आमचे अनुभवी अधिकारी स्थिती हाताळत आहेत. बलूचिस्तानमध्येही अशा स्थितीचा सामना केला, येथेही परिस्थिती नियंत्रणात आणू.’ मात्र, अधिकाऱ्याने याचा पुरावा दिला नाही.
