त. भा. प्रतिनिधी लोणावळा
मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात सोमवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे डोंगराचा काही भाग भूस्खलित होऊन एका घरावर कोसळल्याने एकाच कुटुंबातील तीन जणांचा दरड व मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडल्याने मृत्यू झाला. या दुर्घटनेत अनेक वाहनेदेखील बाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. हा ढिगारा बाजूला करण्याचे काम सुरू असताना पुन्हा दरड कोसळल्याने बचावकार्यालयात अडथळा आला. दरम्यान, या दुर्घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
तिकोणे कुटूंबावर काळाचा घाला
या दुर्घटनेत ज्ञानेश्वर नंदू तिकोणे (वय 25 वर्षे), त्यांचे वडील नंदू दत्तू तिकोणे (वय 55 वर्ष) व आई अनिता नंदू तिकोणे (वय 50 वर्ष) अशी या घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नंदू तिकोणे हे पाटण गावातील शेतकरी आहेत. विसापूर किल्ल्यालगतच त्यांचे घर आहे.
रात्री तिकोणे कुटुंबीय घरात झोपलेले असताना सोमवारी रात्री साडेचारच्या सुमारास डोंगराचा मोठा भाग त्यांच्या घरावर कोसळला. त्यात संपूर्ण घर माती व ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने तिघांचाही त्यात मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस, महसूल प्रशासन, अग्निशमन दल, एनडीआरएफ तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेतली व तात्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले.
बचावकार्य सुरू असताना पुन्हा दरड कोसळली
जेसीबी मशीनच्या सहाय्याने घरावर आलेली ही दरड व राडारोडा बाजूला करण्याचे काम सुरू असताना पावसामुळे डोंगराचा एक मोठा भाग पुन्हा घसरून खाली आला. त्यामुळे मदत कार्याला आलेल्या यंत्रणांची व नागरिकांचीदेखील धावपळ झाली. अखेर शर्थीच्या प्रयत्नांनंतर तिघांचेही मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आला.
