Tata Motors Price Hike: टाटा मोटर्स १ एप्रिल २०२५ पासून आपल्या कमर्शियल गाड्यांच्या किमतीत २ टक्क्यांपर्यंत वाढ करणार आहे. मारुती सुझुकीनेही एप्रिल २०२५ पासून वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

प्रत्येक व्हेरिएंटची किंमत महागाणार
मिळालेल्या माहितीनुसार, वाढत्या इनपुट खर्चामुळे ही किंमत वाढवली जात आहे. ही वाढ वेगवेगळ्या मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार बदलेल. याचा अर्थ असा की ही वाढ प्रत्येक गाड्यांसाठी सारखी असणार नाही. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. भारतातील सर्वात मोठी व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने त्यांच्या सर्व व्यावसायिक वाहनांच्या किमती २ टक्क्यांपर्यंत वाढवल्या आहेत आणि त्या १ एप्रिल २०२५ पासून लागू होतील, असे टाटा मोटर्सने म्हटले आहे.
कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत
भारतीय वाहन उद्योग अनेक अडचणींना तोंड देत आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढत आहेत, माल वाहतुकीचा खर्च वाढला आहे. सप्लाई चेन म्हणजे वस्तू बनवण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी मिळण्यात अडचण येते. टाटा मोटर्स आणि मारुती सुझुकी नंतर, इतर कंपन्या देखील आपल्या गाड्यांच्या किमतीत वाढ करु शकतात.
टाटा मोटर्स ट्रक, बसेस सारखी वाहने विकतात. आर्थिक वर्ष २५ च्या तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सच्या प्रोडक्शनमध्ये वाढ झाली आहे, परंतु नफ्यात २२.४१% घट झाली. त्यांचा नफा ५,४५१ कोटी रुपये होता. तथापि, ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीचे ऑपरेटिंग इनकम २.७१ टक्क्यांनी वाढून १,१३,५७५ कोटी रुपये झाले. एकंदरीत, असे म्हणता येईल की, वाढत्या किमतींमुळे टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्याचा ग्राहकांवर खिशावर नक्कीच परिणाम होऊ शकतो.
या महिन्यात कार खरेदीवर मिळणार जबरदस्त फायदे
जर तुम्ही टाटा मोटर्स किंवा मारुती सुझुकीची कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एप्रिलपूर्वी कार बुक करुन घ्या. जेणेकरुन तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागणार नाही.
मारुतीच्याही गाड्यांच्या किमती वाढणार
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकी इंडियाने घोषणा केली की 1 एप्रिल 2025 पासून कंपनी त्यांच्या कारच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढवणार आहे. कारच्या किमती वाढण्यामागील कारण वाढता इनपुट खर्च आणि ऑपरेशनल खर्च असल्याचे सांगितले जाते. यासोबतच, इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किमती देखील या वाढीचे कारण असल्याचे सांगितले जात आहे.

