Headlines

Ketan Agrawal Murder Case Update : सिया गोयलला पुन्हा तिच्या घरी नेऊन पंचनामा


लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास आणखी आवळला

पुणे : पुण्यातील प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल हत्येप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपासाचा फास आणखी आवळला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिची पोलीस कोठडी संपत आली असून, तिच्या घरून महत्त्वाचे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांनी गुरुवारी तिला पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील गंगाधाम चौकात असलेल्या तिच्या ‘लीलाकुंज’ या निवासस्थानी नेले होते.

तेथे पोलिसांनी कसून तपासणी करत महत्त्वपूर्ण गोष्टी जप्त केल्या. त्यानंतर आता पुन्हा एकदा पोलिसांनी तिला तपासासाठी घरी नेल्यामुळे, या पंचनाम्यातून नेमके कोणते नवीन आणि महत्त्वपूर्ण पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत, याबाबत पुणे आणि लोणावळा परिसरात उलटसुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

तपासादरम्यान समोर आलेली सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, केतन अग्रवाल याचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यापूर्वी आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी हत्येचा रीतसर सराव केला होता. गंगाधाम ते लुल्लानगर रस्त्यावरील एका लहान टेकडीवर केतनला कसे ढकलायचे, याची त्यांनी आधीच तालीम केली होती.

पोलिसांनी या सराव केलेल्या घटनास्थळी देखील सिया आणि चेतन या दोघांना नेऊन कसून चौकशी केली आणि त्यानुसार घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून केतनला दरीत ढकलून हत्या केल्यानंतर, या प्रकरणाशी संबंधित काही पुरावे नष्ट करण्यात आले आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत.

त्यासाठीच सियाच्या घरातून तिचे कपडे, मोबाईल आणि इतर साहित्य जप्त करून तपासले जात आहे. दरम्यान, पोलीस तपासासाठी सियाला तिच्या घरी घेऊन आले असता, घरातून बाहेर पडताना तिने माध्यमांच्या कॅमेऱ्यांकडे पाहून अश्लील हावभाव केले.

गंभीर गुन्ह्याचा आरोप असतानाही तिच्या चेहऱ्यावर दिसणारा हा मुजोरपणा आणि संतापजनक वर्तन यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर तीव्र टीका होत असून नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस आता लवकरच न्यायालयात ‘लास्ट सीन टुगेदर’ ही थिअरी आणि गोळा केलेले सबळ तांत्रिक पुरावे सादर करणार आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत