महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी आज (1 जुलै 2026) दुपारी 1 वाजता प्रत्यक्ष निवडणूक पार पडत आहे. या निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेचे (शिंदे गट) सचिन अहिर, तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे (ठाकरे गट) ज. मो. अभ्यंकर एकमेकांसमोर उभे आहेत. विधान
.
शिंदेंचे ‘धक्कातंत्र’ अन् ३ नावांची गुगली
एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांच्या पक्षप्रवेशाची आणि उमेदवारीची बाब अत्यंत गुप्त ठेवली होती. यासाठी त्यांनी राजकीय वर्तुळात पद्धतशीरपणे ‘धक्कातंत्र’ वापरले. शेवटच्या क्षणापर्यंत शिंदे गटाकडून उपसभापती पदासाठी डॉ. नीलम गोऱ्हे, चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने ही तीन नावे जाणीवपूर्वक चर्चेत ठेवली होती. उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी (सत्यजीत तांबे, किशोर पाटील, आमशा पाडवी आदी) एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापती करण्याची मागणी केल्याने सर्वांचे लक्ष तिकडे केंद्रित झाले होते.
ऐनवेळचा ‘चेकमेट’
सर्वांचे लक्ष दुसरीकडे असतानाच, ऐन वेळी सचिन अहिर यांना सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, चंद्रकांत पाटील आणि नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत थेट त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. ठाकरेंना गाफील ठेवून दिलेला हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे.
सचिन अहिर यांनी ठाकरेंची साथ का सोडली?
२०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत आलेले सचिन अहिर अचानक शिंदे गटात जाण्यामागे खालील राजकीय गणिते महत्त्वाची ठरली आहेत.
विधान परिषदेचे गणित: अहिर यांचा विधान परिषदेचा कार्यकाळ २०२८ पर्यंत आहे. सध्याचे ठाकरे गटाचे विधानसभेतील घटलेले संख्याबळ पाहता, भविष्यात त्यांना पुन्हा विधान परिषदेवर निवडून जाणे जवळपास अशक्य होते.
विधानसभेचे दरवाजे बंद: सचिन अहिर यांचा बालेकिल्ला ‘वरळी’ विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र, तेथून स्वतः आदित्य ठाकरे निवडणूक लढवतात. त्यामुळे त्यांच्यासाठी विधानसभेचे दरवाजेही बंद झाले होते.
उपसभापती पदाची थेट ऑफर: राजकीय पुनर्वसनासाठी शिंदे गटाकडून त्यांना थेट विधान परिषदेच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या ‘उपसभापती’ पदाची ऑफर देण्यात आली, जी त्यांनी तातडीने स्वीकारली.
संजय दिना पाटील यांचा प्रभाव: काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. पाटील हे अहिर यांचे अत्यंत जवळचे मित्र असल्याने त्यांच्या पक्षप्रवेशाने अहिर यांचाही निर्णय पक्का झाला.
उपसभापती पदाचे घटनात्मक महत्त्व
राज्याच्या राजकारणात विधान परिषदेचे उपसभापती पद अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. भारतीय संविधानाच्या कलम १८२ नुसार, विधान परिषद असलेल्या प्रत्येक राज्याने आपल्या सदस्यांमधून एका सभापतीची आणि एका उपसभापतीची निवड करणे बंधनकारक आहे. ७८ सदस्य संख्या असलेल्या या वरिष्ठ सभागृहात, सभापतींच्या अनुपस्थितीत सभागृहाचे कामकाज चालवणे, सदस्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे आणि संसदीय नियमांचे पालन करवून घेण्याचे सर्वाधिकार उपसभापतींकडे असतात.
आजची निवडणूक प्रक्रिया आणि वेळ
विधान परिषदेच्या कामकाजातील नियम ६ आणि ७ नुसार या निवडणुकीची प्रक्रिया राबवली जात आहे. प्रस्तावाचे अधिकृत नमुने सर्व सदस्यांना वितरित करण्यात आले होते.
३० जून रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आणि त्यानंतर छाननीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
आज (१ जुलै २०२६) दुपारी १ वाजता विधान परिषदेत प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पार पडेल.
महायुतीकडे असलेले स्पष्ट बहुमत आणि शिंदे गटाने राबवलेली अचूक रणनीती पाहता, काही तासांतच सचिन अहिर यांच्या गळ्यात उपसभापती पदाची माळ पडणार, हे आता निश्चित झाले आहे. या निकालामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर महाविकास आघाडीला, विशेषतः ठाकरे गटाला एक मोठा राजकीय धक्का बसला आहे.
संबंधित बातमी वाचा…
ठाकरे गटाला मुंबईत सर्वात मोठा झटका:आमदार सचिन अहिर यांना शिंदे गटाकडून विधान परिषद उपसभापतीपदाची उमेदवारी

विधान परिषद उपसभापतीपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. विधान परिषदेतील उपसभापतीपदासाठी सचिन अहिर अर्ज भरताना मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासह मंत्री चंद्रकांत पाटील, मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे देखील उपस्थित होते.
सचिन अहिर यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने आदित्य ठाकरे यांना सर्वांत मोठा फटका बसल्याचे बोलले जात आहे. कारण आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात विधान परिषदेचे दोन आमदार होते. वरळी विधानसभा मतदासंघात सचिन अहिर यांची वेगळी ताकद आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
