Headlines

Stock Market Crash: भावांचा विषय लय हार्ड! दोघांनी नोकऱ्या बदलल्या अन् अनेक देशांचे शेअर बाजार हादरले; ‘ते’ नेमके कोण?


Stock Market Crash: ना युद्ध, ना कोणते निर्बंध, ना सरकारकडून कोणती मोठी घोषणा. तरीही शेअर बाजारात मोठी पडझड झाली. अब्जावधी डॉलर्स बुडाले, कारण दोघांनी नोकऱ्या बदलल्या होत्या.

ai stocks
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: गेल्या दोन वर्षभरापासून जगभरात एआय ची चर्चा आहे. एआय म्हणजे भविष्य असं समीकरण मांडलं जात आहे. त्यामुळे अमेरिकेपासून चीन, दक्षिण कोरिया आणि भारतापर्यंत सगळे देश एआयवर अब्जावधी डॉलर खर्च करत आहेत. पण २२ जूनला एआयच्या दुनियेचं बिंग फुटलं. याचा सर्वाधिक फटका जगातील सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांना बसला.

एकाच दिवशी जगातील बड्या एआय कंपन्यांचे शेअर्स घसरले. NVIDIA ला २०० अब्ज डॉलर्सचं नुकसान झालं. ऍमेझॉनचे शेअर्स ५ टक्क्यांनी खाली आले. मेटाच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांची घसरण झाली. गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटलादेखील फटका बसला. कंपनीचं बाजार भांडवल २७० अब्ज डॉलर्सनी घटलं. जगातील शेअर बाजारांमध्ये अस्वस्थता पसरली. जगभरातील बाजार आणि एआय क्षेत्र अचानक का हादरलं, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
Maharashtra TimesLPG Supply: अखेर ‘तो’ दिवस आलाच! LPG पुरवठ्याबद्दल सरकारचा मोठा निर्णय; कोट्यवधी नागरिकांना दिलासा
कोणतंही युद्ध सुरू नसताना, व्याज दरात कोणताही मोठा बदल झालेला नसताना, एआयवर कोणतेही निर्बंध आलेले नसताना शेअर बाजार हादरले. या सगळ्याची सुरुवात १६ जूनपासून झाली. गुगलचे सर्वात निष्णात एआय संशोधक नोम शजीर यांनी कंपनी सोडली आणि ओपन एआयमध्ये रुजू होत असल्याची घोषणा केली. २०१७ मध्ये प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक ट्रान्सफॉर्मर रिसर्च पेपरचे सहलेखक अशी त्यांची ओळख आहे. हेच तंत्रज्ञान आजच्या घडील सगळ्या अत्याधुनिक एआय मॉडेल्सचा पाया आहे.

एका धक्क्यातून जगभरातील शेअर बाजार सावरत असताना १९ जूनला दुसरी मोठी बातमी आली. गुगल डीपमाईंडचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार विजेते जॉन जंपर यांनी गुगल सोडून अँथ्रॉपिकमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. दोन्ही बातम्या आठवड्याच्या शेवटी आल्या. त्यामुळे २२ जूनला शेअर बाजार खुला होताच गुंतवणूकदारांनी अल्फाबेटचे शेअर्स विकण्यास सुरुवात केली. काही तासांमध्ये कंपनीचा शेअर ७.२ टक्क्यांनी घसरला.
Maharashtra TimesCrude Oil: होर्मुझ मार्ग खुला, खनिज तेलही स्वस्त; पण आता वेगळंच संकट; सामान्यांच्या खिशाला झळ
२ कर्मचाऱ्यांमुळे २५० बिलियन डॉलर कसे बुडाले?
नोम शजीर आणि जॉन जंपर साधेसुधे कर्मचारी नाहीत. ज्या मोजक्या संशोधकांमुळे एआय क्षेत्र मार्गक्रमण करतंय, त्या संशोधकांच्या यादीत शजीर आणि जंपर यांचा समावेश होतो. गुगलनं २ वर्षांपूर्वी नोम शजीरला आपल्याकडे घेताना जवळपास २.७ बिलियन डॉलर मोजले होते. आता ते पुन्हा ओपन एआयमध्ये परतले आहेत. हा गुगलसाठी मोठा धक्का आहे. यामुळेच गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे शेअर घसरले.

या सगळ्याची दुसरी बाजूदेखील महत्त्वाची आहे. गुगलचे शेअर घसरले. पण ओपन एआय आणि अँथ्रोपिक यावर कोणताही नकारात्मक परिणाम दिसला नाही. कारण या दोन्ही कंपन्या खासगी आहेत. त्या शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध झालेल्या नाहीत. त्यामुळेच गुंतवणूकदार त्यांचे शेअर विकू शकत नाहीत. उलट दोन्ही कंपन्यांना फायदा झाला. ओपन एआयच्या गोटात जगातील सर्वात मोठ्या शास्त्रज्ञांपैकी एक असलेले नोम शजीर दाखल झाले. तर अँथ्रॉपिकच्या गळाला त्याच तोडीचे जंपर लागले. याशिवाय जेमिनीच्या डेव्हलपमेंटशी संबंधित आणखी दोन शास्त्रज्ञ जोनास एडलर आणि अलेक्झांडर प्रिट्जेल यांनीही नोकरी सोडण्याची घोषणा केली. ते अँथ्रॉपिकमध्ये काम करणार आहेत. म्हणजेच गुगलमधून बडे शास्त्रज्ञ बाहेर पडत आहेत. याचा फायदा स्पर्धक कंपन्यांना होत आहे.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा