Headlines

Nashik Accident: बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट; गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात करुण अंत, अख्खं गाव हळहळलं


Nashik Accident: अवघ्या १३ दिवसांपूर्वीच कन्यारत्ना झाले. मुलीसोबत वेळ घालवायचा म्हणून बाप सुट्टीवर आला अन् वाईट घडलं. अपघातात जवानाचा करुण अंत. अख्खं गाव हळहळलं.

nashik accident
प्रवीण आव्हाड(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर: कन्यारत्न प्राप्त झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी गावी सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. या घटनेने खंबाळेसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. प्रवीण भाऊसाहेब आव्हाड (वय २७, रा. खंबाळे) असे जवानाचे नाव आहे. रविवारी (दि. १४) रात्री ९.४५ वाजता झालेल्या दुचाकी अपघातात त्यांना प्राण गमवावे लागले.

प्रवीण आव्हाड हे भारतीय लष्करात गेल्या आठ वर्षांपासून कार्यरत होते. जम्मू-काश्मीरमधील उधमपूर परिसरात ते कर्तव्यावर होते. कुटुंबातील ते एकुलते एक चिरंजीव होते. अवघ्या १३ दिवसांपूर्वीच त्यांच्या घरी कन्यारत्नाचे आगमन झाले होते. नवजात कन्येला पाहण्यासाठी आणि कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्यासाठी ते ७५ दिवसांच्या दीर्घ सुट्टीवर गावी आले होते.

Maharashtra TimesNashik Accident: भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू; नाशिक-पुणे महामार्गावरील घटना
रविवारी (दि. १४) रात्री कामानिमित्त नांदूर शिंगोटे येथे गेलेले प्रवीण आव्हाड हे दुचाकीने खंबाळेकडे परतत असताना नाशिक-पुणे महामार्गावरील दोडी पाटीजवळ त्यांच्या दुचाकीची दुभाजकाला जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. कन्यारत्न प्राप्तीचा आनंद अजून ओसरलाही नव्हता, तोच कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकुलत्या एक मुलाच्या निधनाने आई-वडील, पत्नी आणि कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे. गावासह संपूर्ण परिसरात या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

दोडी पाटीजवळील दुभाजक हा अपघातप्रवण ठरत असून, या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे येथे सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे.

Maharashtra TimesNashik News : नगरसेवकांना भिवंडीच्या रिसॉर्टवर नेण्याची तयारी, फोटोसाठी भाजप शहराध्यक्षांनी स्टेअरिंग धरलं, बस हॉटेलच्या भिंतीवर धडकली
शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …
प्रवीण आव्हाड यांच्या पार्थिवावर खंबाळे येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भारतीय लष्करातील अधिकारी, पोलिस अधिकारी, लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रवीण यांच्या पत्नी पूजा, आई जिजाबाई, वडील भाऊसाहेब आव्हाड आणि अन्य कुटुंबीयांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून अश्रुपूर्ण वातावरणात त्यांना अखेरचा निरोप दिला. लष्करी मानवंदनेनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा