Headlines

Parbhani ZP Result 2026 BJP Former Minsiter Suresh Warpudkar 4 out of 5 Family members defeat; भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची घराणेशाही मतदारांनी नाकारली, 5 पैकी 4 कुटुंबीय पडले, ‘हाता’वर लढलेला पुतण्या जिंकला


Suresh Warpudkar : माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपल्याच घरातील पाच जणांना वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी दिली होती, पण तरीही मतदारांनी घराणेशाहीला सपशेल नाकारले

Parbhani Suresh Warpudkar Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
परभणी : काही काळापूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा दारुण पराभव करत मतदारांनी घराणेशाहीला फुल्ली मारली होती. आता परभणी जिल्हा परिषदेमध्येही भाजप नेते आणि माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपल्याच घरातील पाच जणांना वेगवेगळ्या पक्षांतून उमेदवारी दिली होती, पण तरीही मतदारांनी घराणेशाहीला सपशेल नाकारले आहे. एकाच कुटुंबातील पाच उमेदवारांपैकी चार जणांचा दारुण पराभव करत मतदारांनी माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना चांगला धक्का दिला आहे. परभणी तालुक्यातील लोहगाव सर्कलमधून पुतण्या अजित वरपूडकर याने मात्र कुटुंबाची लाज राखली आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या अजित वरपूडकर या कुटुंबातील एकमेव सदस्याचा विजय झाला आहे.

भाजपचे माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपल्याच घरातील तब्बल पाच जणांना वेगवेगळ्या पक्षातून उमेदवारी दिली होती. मुलगा समशेर वरपूडकर याला शिंगणापूर गटातून, पुतणे ऐश्वर्य हे जांब गटातून, तर सून प्रेरणा या दैठणा गटातून भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत होत्या. याशिवाय मुलगी सोनल देशमुख ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून झरी गटातून उभ्या होत्या. तर पुतण्या अजित वरपूडकर देखील काँग्रेसकडून लोहगाव गटातून उभे राहिले. पाच उमेदवार दिल्यामुळे वरपूडकर यांच्या घरातील सदस्यांची चांगलीच चर्चा रंगली होती.

सुरेश वरपूडकर यांचा मुलगा समशेर वरपूडकर, सून प्रेरणा वरपूडकर, पुतण्या ऐश्वर्य वरपूडकर तर मुलगी सोनल देशमुख या चौघांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे केवळ लोहगाव गटातून काँग्रेस पक्षाकडून उभे असलेला पुतण्या अजित वरपूडकर मात्र विजय झाला आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांनी आपला घरगुती पॅटर्न राबवल्यानंतर मात्र मतदारांनी त्याला सपशेल नकार दिला आहे.

घरातील चारही उमेदवाराचा पराभव झाल्याने माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांना चांगलाच धक्का बसला आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांची पत्नी विजयी झाली आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही सुरेश वरपूडकर यांनी आपल्या घरातील जास्तीत जास्त उमेदवार देण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांच्या या प्रयत्नाला आता अपयश आले आहे

नगरपालिका निवडणुकीत लोहगाव नगरपालिकेत एकाच घरातील पाच जणांना उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या पाचही जणांचा पराभव झाला होता ही बातमी राज्यभर चर्चिली गेली होती. त्यानंतर परभणी मध्ये देखील असाच प्रकार माजी मंत्र्याने केल्यानंतर मात्र पुन्हा एकदा मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे यामुळे मतदार राजा हा घराणेशाहीला नाकारत असल्याचे देखील समोर आले आहे त्याचबरोबर धनशक्तीला देखील या मतदारांनी नाकारल्याचे दिसून आले आहेत.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा