Headlines

Monsoon 2026 Arrives: आनंदमेघ नि चिंतेचे मळभ – monsoon has finally arrived in maharashtra on tuesday 23 june 2026


पंधरा दिवसांच्या विलंबाने का होईना, राज्यात मान्सूनच्या आगमनाची आनंदवार्ता मिळाली. त्यामुळे राज्यातील नागरिक सुखावून जाणे साहजिकच. गेले काही दिवस कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सून कोकणातच रेंगाळला होता. आता पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांनी त्याच्या प्रवासाला गती मिळाली. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, खान्देश आणि विदर्भ-मराठवाड्यात मान्सूनचे ढग पोहोचले आहेत.

येत्या दोन दिवसांत उर्वरित भागांतही ते दाखल होतील. त्यानंतर पुन्हा काही दिवस तो विश्रांती घेईल, असा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे. मान्सून दाखल झाला असला, तरी पुढील काळात पाऊस कसा होणार, याची शाश्वती नसल्याने अजूनही चिंतेचे मळभ पूर्णपणे दूर झालेले नाही. कोरड्या जमिनीमध्ये पावसाने काहीशी ओल दिली असली, तरी धरणे अजूनही कोरडीच आहेत; गावोगावी टँकर अजूनही सुरूच आहेत. हे चित्र पालटण्यासाठी आणखी काही दिवस सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे.

मुंबई व कोकणात जोरदार पाऊस झाला, तर पुण्यात बुधवार सकाळपर्यंत रिमझिम सुरू होती. या महिन्याच्या सुरुवातीपासूनच शेतकरी पेरण्यांच्या तयारीत होते. ताज्या पावसाने जमिनीत काहीशी ओल धरली असली, तरी पेरण्यांसाठी ती पुरेशी नाही; त्यामुळेच दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी आता किमान ६० मिमी. पाऊस होईपर्यंत पेरण्या करू नका, हा सरकारचा सल्ला पाळावा लागेल. पावसाने दडी मारल्याने फटका मूग-उडदासारख्या पिकांना फटका बसू शकतो. पावसाचे आगमन लांबल्याने धरणेही कोरडी पडलेली आहेत. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये अजूनही फक्त २०-२५ टक्के साठा आहे; पुण्यासारख्या भागांत तर हे प्रमाण दहा टक्केच आहे.

पहिला पाऊस जमिनीत मुरतो आणि जमिनीची तहान भागवल्यानंतर पाणी ओढ्या-नाल्यांमधून वाहू लागते. त्यानंतरच धरणांमध्ये पाणी साठू लागते. त्यासाठी आणखी काही दिवस पाऊस होणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रमुख शहरांमध्ये पाणीकपात आणि गावोगावी-दुर्गम भागांमध्ये टँकर सुरूच आहेत. त्यातही उच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये यंत्रणांची असंवेदनशीलता उघड झाली. मेळघाटातील गावकऱ्यांच्या पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींवर अधिकाऱ्यांनी खुशाल ‘टँकर सुरू आहेत,’ असे उत्तर दिले; मात्र पाणी मिळत नव्हते आणि दूषित पाण्याने माणसे आजारी पडू लागली; ही वस्तुस्थिती समोर आल्यानंतर न्यायालयाने या बाबूंची कानउघाडणी केली. आता तरी सोपवलेली कामे इमानेइतबारे होतील, अशी आशा आहे. अजूनही राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा असा बहुतेक उत्तर भारत कोरडा आहे. आता पाऊस आला, तरी तो सरासरी गाठणार का आणि पिकांना गरज असेल, अशा पद्धतीने वेळोवेळी होणार का, असे प्रश्न कायम आहेत.

ग्रामीण भागात पावसाचे आगमन आशा उंचावणारे असले, तरी या पहिल्याच पावसाने प्रमुख शहरांमधील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडवून दिला. मुंबईत गेले काही दिवस वाजतगाजत नालेसफाईचे पाहणी दौरे पार पडले होते; मात्र पहिल्याच पावसात किंग्ज सर्कल, अंधेरी सबवे आणि मानखुर्द अशा विविध भागांमध्ये साचलेल्या पाण्याने नालेसफाईचे पितळ उघडे पाडले. यापूर्वी काही नागरिकांचे प्राण घेणाऱ्या उघड्या गटारांचा सापळाही कायम आहे. खुद्द महापौर रितू तावडे यांच्या दौऱ्यात त्यांच्या समोरच एक अधिकारी अशा गटारात पडल्याने महापालिका प्रशासनाचा कारभार समोर आला.

मुंबई-गोवा मार्गाचे काम पूर्ण होण्याचे नवनवे मुहूर्त पुन्हा कागदावरच राहिल्याचे दिसून आले. ठिकठिकाणी पावसाने खचलेल्या या महामार्गाची दुर्दशा पुन्हा नागरिकांच्या त्रासात भर घालत आहे. अन्य शहरांमध्येही थोड्याबहुत फरकाने हेच चित्र दिसून आले. पुण्या-मुंबईत रस्त्यांवर पाण्याची तळी साचल्याने बहुतांश भागांमध्ये पावसाबरोबरच वाहतूक कोंडीचेही आगमन झाले आहे. अगदी गल्लीबोळांतही काँक्रिट रस्ते करण्याच्या अट्टहासामुळे जमिनीत पाणी मुरण्यास जागा शिल्लक नाही आणि ड्रेनेज यंत्रणा तुंबलेली असल्याने ही स्थिती उद्भवते, याची जाणीव ’विकासजीवीं’ना कधी होणार, हा प्रश्नच आहे. एकीकडे पुरेशा पावसाची प्रतीक्षा आणि दुसरीकडे नागरिकांची सुविधा अशा विविध पातळ्यांवर सज्ज राहण्याचा इशाराच पहिल्या पावसाने दिला, असे म्हणावे लागेल.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत