Headlines

ऑपरेशन ‘गरुड’ला विरोध; तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली बैठक, केसीआर म्हणतात, अभियान तत्काळ थांबवा! – former telangana cm kcr demanded chhattisgarh govt immediately stop garuda campaign pri


Operation Garuda: तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी माओवाद्यांच्या शांतता चर्चेच्या समर्थनात भूमिका घेत केंद्र आणि छत्तीसगड सरकारला हे अभियान तत्काळ थांबविण्याची मागणी केली आहे.

garud operation
garud operation(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म. टा. वृत्तसेवा, गडचिरोली : छत्तीसगडमधील करेगुट्टाच्या पहाडावरील ऑपरेशन गरुडवरून आंध्र प्रदेश आणि तेलंगणमधील राजकीय नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने राजकारण तापले आहे. तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी माओवाद्यांच्या शांतता चर्चेच्या समर्थनात भूमिका घेत केंद्र आणि छत्तीसगड सरकारला हे अभियान तत्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. तर मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माओवाद्यांच्या शांतता प्रस्तावाच्या अनुषंगाने बैठक घेतली.

केसीआर यांनी तेलंगणमधील एका जाहीर सभेत ‘ऑपरेशन गरुडच्या नावाखाली नि:ष्पाप आदिवासी आपले प्राण गमावत आहेत. सरकारने युद्धाचा नाही तर संवादाचा मार्ग स्वीकारावा. माओवाद्यांनी शांतता चर्चेचा प्रस्ताव पाठविला आहे. यावर केंद्र सरकारकडून कोणताही सकारात्मक पुढाकार घेण्यात आलेला नाही’, असाही आरोप केला. त्यांनी लवकरच एक शिष्टमंडळ तयार करून पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची घोषणाही केली. केंद्र आणि छत्तीसगड सरकारला ते अभियान तात्काळ थांबवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. केसीआर यांच्या विधानानंतर लगेचच तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी माओवाद्यांच्या शांतता चर्चेच्या प्रस्तावावर वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. वाय. एस. राजशेखर रेड्डी यांच्या सरकारमध्ये गृहमंत्री असलेले आणि माओवाद्यांशी समोरासमोर चर्चा करणारे माजी मंत्री जना रेड्डी यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या बैठकीत शांतता चर्चेच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली. यासोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि मानवाधिकार समर्थकही सक्रिय झाले आहेत.

शांतता चर्चेसाठी दुसरे पत्रक

करेगुट्टाच्या पहाडावर ऑपरेशन गरुड (कगार) सुरू असतानाच माओवाद्यांनी दुसऱ्यांदा शांतता चर्चेच्या अनुषंगाने पत्रक जारी केले आहे. माओवाद्यांच्या केंद्रीय कमिटीचा प्रवक्ता अभय याने हे पत्रक काढले आहे. या पत्रकानुसार, ‘करेगुट्टा परिसरात नाकाबंदी करून तेलंगण, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील दहा हजार सुरक्षा दलाचे जवान तैनात करून तीन दिवसांपासून एक मोठे ऑपरेशन राबविले जात आहे. आम्ही कुठल्याही अटीविना शांतता वार्ता करण्याचा प्रयत्न करीत आहोत. या परिस्थितीत ऑपरेशन कायम ठेवले जात असल्याने शांतता चर्चेचा अर्थ उरत नाही. आम्ही सरकारला परत एकदा अपील केले आहे. शांतता चर्चेसाठी अनुकूल वातावरण तयार करण्यासाठी छत्तीसगड, झारखंड, आंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात युद्धविरामची घोषणा करण्यात यावी,’ अशी मागणीही केली आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा