Headlines

Canada advances after defeating South Africa 1-0.


वृत्तसंस्था, इंग्लवूड, कॅलिफोर्निया : विश्वचषकातील आपला पहिला बाद फेरीचा सामना जिंकताना कॅनडाने दक्षिण आफ्रिकेला 1-0 असे पराभूत केले. या निकालानंतर स्टेडियममध्ये सर्वत्र जल्लोष सुरू असतानाच प्रशिक्षक जेसी मार्श यांनी आपल्या खेळाडूंना मैदानावर एकत्र बोलावले आणि मनापासून संवाद साधताना सांगितले, ‘आज तुम्ही कॅनडाचे नायक आहात.’

स्टीफन युस्टाकियोने सामन्याच्या अगदी शेवटी केलेल्या नाट्यामय गोलमुळे मार्श यांच्यात उत्साह संचारला. कॅनडाच्या व्यस्त क्रीडा वेळापत्रकात फुटबॉल कधीच मुख्य आकर्षण राहिले नाही आणि कॅनडाचा संघ यावेळी केवळ आपला तिसरा विश्वचषक खेळत आहे. परंतु मार्श यांना जाणीव झाली की, रविवारी मिळवलेला हा ऐतिहासिक विजय संपूर्ण राष्ट्राचे लक्ष वेधून घेऊ शकतो.

‘सो-फाय’ स्टेडियमवर 90 मिनिटांहून अधिक काळ निराशा आणि दक्षिण आफ्रिकेच्या सावध बचावाला भेदण्यात आलेले अपयश यानंतर एका क्षणात कॅनडाने इतिहास घडवला. यावेळी अॅलिस्टायर जॉन्स्टनने ‘बॉक्स’मध्ये दिलेला लांबचा पास थेट युस्टाकियोच्या दिशेने आला. ‘लॉस एंजेलिस एफसी’कडून व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या या मिडफिल्डरने चेंडू शांतपणे छातीवर घेतला आणि टप्पा पडताच तो गोलरक्षक रॉन्व्हन विल्यम्सच्या जाळीच्या खालच्या कोपऱ्यात जोरात मारला. दुसऱ्या सत्राच्या ‘स्टॉपेज टाइम’च्या दुसऱ्या मिनिटाला घडलेल्या या घडामोडीने कॅनडाच्या गोटात जल्लोषाला वाट मोकळी करून दिली.

आपापल्या गटात दुसरे स्थान मिळवल्यानंतर दक्षिण आफ्रिका आणि कॅनडा हे दोन्ही संघ विश्वचषकातील बाद फेरीतील आपल्या पहिल्या विजयासाठी मैदानात उतरले होते. 75 व्या मिनिटाला बचावपटू आल्फोन्सो डेव्हिस मैदानात उतरल्याने कॅनडाला बळ मिळाले. विश्वचषकातील हा त्याचा पहिलाच सामना होता. ‘बायर्न म्युनिक’चा हा खेळाडू धोंडशिरेच्या दुखापतीमुळे गटातील सामने खेळू शकला नव्हता. डेव्हिसने लगेचच दिवसातील सर्वोत्तम पास देत प्रॉमिस डेव्हिडसाठी गोल करण्याची सुवर्णसंधी निर्माण केली होती. परंतु त्या आघाडीपटूचा फटका गोलपोस्टच्या बाहेर गेला. त्यानंतर सामना पुन्हा एकदा संथ झाला. पण युस्टाकियोने कॅनडाला अतिरिक्त वेळेत खेळण्यापासून वाचवले.

दक्षिण आफ्रिकेने शेवटच्या क्षणापर्यंत जिद्दीने खेळ केला आणि गोलरक्षक विल्यम्सने पाच महत्त्वपूर्ण बचाव केले. या स्पर्धेत चार सामन्यांत केवळ दोन गोल नोंदवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने बचावफळीत भक्कम कामगिरी केली आणि प्रतिस्पर्ध्यांच्या गोलवर त्यांना केवळ एकच नेमका फटका मारता आला असला, तरी त्यांनी काही आशादायक संधी निर्माण केल्या.

नेदरलँड्स-मोरोक्को सामन्यातील विजेत्याशी पडेल गाठ

फिफाच्या ताज्या जागतिक क्रमवारीत 30 व्या स्थानावर असलेल्या कॅनडाने आगेकूच केली असून आता शनिवारी ह्युस्टन येथे त्यांचा सामना नेदरलँड्स किंवा मोरोक्कोशी होईल. टोरांटो आणि व्हँकुव्हरमध्ये गटातील पहिले तीन सामने खेळल्यानंतर, कॅनडाला मायदेशात हा ऐतिहासिक टप्पा गाठण्याची संधी मात्र हुकली, कारण गेल्या बुधवारी त्यांना स्वित्झर्लंडकडून 2-1 ने पराभव पत्करावा लागला आणि बाद फेरीसाठी त्यांना बाहेरच्या मैदानावर जावे लागले. मात्र मार्श यांच्या जिगरबाज संघाने विश्वचषकातील तीन सहभागांमध्ये पहिल्यांदाच 16 संघांच्या फेरीमध्ये धडक मारून दमदार पुनरागमन केले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत