सतराव्या शतकात फ्रेंच तत्त्ववेत्ता रेने देकार्त याने मानवी अस्तित्वाचा अत्यंत खोलवर वेध घेताना एक अजरामर वाक्य उच्चारले होते—‘Cogito, ergo sum’ अर्थात ‘मी विचार करतो, म्हणून मी आहे.’ मानवाचे या पृथ्वीवरील श्रेष्ठत्व, त्याचे वर्चस्व आणि त्याची संस्कृती या सर्वांचा पाया त्याच्या शारीरिक ताकदीत नाही, तर त्याच्या वैचारिक क्षमतेत आहे. आपण काय खरे मानतो, कशावर विश्वास ठेवतो, कठीण प्रसंगात निर्णय कसे घेतो आणि सामूहिक समस्या सोडवण्यासाठी एकत्र कसे येतो, या सर्व गोष्टी पूर्णपणे आपल्या विचारशक्तीवर अवलंबून आहेत. पण आज, एकविसाव्या शतकाच्या पहिल्या पंचविशीनंतर, देकार्तच्या या तत्त्वज्ञानाला एका नव्या काळजीने घेरले आहे. आपल्याच नवनिर्मितीने बनविलेले ‘एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता याची ती काळजी! एआयचा सध्या सुरू असलेला अनिर्बंध वापर मानवी विचारांचा पाया मजबूत करण्याऐवजी तो हळूहळू पोखरून टाकेल की काय, असे काही शास्त्रज्ञांना वाटू लागले आहे .
दिनांक ४ जून २०२६ रोजी SSRN (सोशल सायन्स रिसर्च नेटवर्क )या इंटरनेट वरील प्रसिद्ध प्रि-प्रिंट प्लॅटफॉर्म वर (
प्रसिद्ध झालेल्या एका सखोल आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रात या नव्या धोक्याला ‘एपिस्टेमिक रिस्क’ असे यथार्थ नाव देण्यात आले आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर, हा आपल्या ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेवर, अचूक माहिती ओळखण्याच्या क्षमतेवर आणि स्वतंत्रपणे निर्णय घेण्याच्या आपल्या ताकदीवरच झालेला थेट हल्ला आहे. सदर संशोधन हे एमआयटी, कॉर्नेल, स्टॅनफर्ड, बर्कली, ऑक्सफर्ड, इंपिरियल कॉलेज लंडन इत्यादी दिग्गज विद्यापीठे आणि एफआरआयसारख्या काही नामांकित संस्थांमधील तब्बल ३० संशोधकांनी एकत्र येऊन केलेले आहे, म्हणून त्याची दाखल घेणे आपल्याला भाग आहे .
या संशोधनामधील मूळ गाभा हा आहे की एआयच्या अनिर्बंध वापरामुळे नव्याने उदयास आलेला धोका केवळ ‘फेक न्यूज’ किंवा सोशल मीडियावरील अफवांपुरता मर्यादित नाही; तर तो त्याहून खूप खोलवर झिरपलेला आहे. एआय आता केवळ आपल्याला माहिती देणारे एक निष्क्रिय साधन राहिलेले नाही, तर आपण माहितीवर कसा विश्वास ठेवतो, एकत्र मिळून अर्थ कसा लावतो आणि जगाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहतो, या संपूर्ण विचारप्रक्रियेच्या पायाभूत रचनेतच ते आता थेट हस्तक्षेप करत आहे. हे संकट जसजसे वाढत जाईल, तसतशी या संकटाला ओळखण्याची आणि त्यावर उपाय शोधण्याची मानवी क्षमताच नष्ट होत जाईल, कारण आपला स्वतंत्र विचारच तेव्हा संपलेला असेल.
या नव्या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा धोका हा आहे की ते अत्यंत गोड शब्दांत आणि ओघवत्या शैलीत आपले मन वळवेल. संशोधकांनी याला ‘पटवणे आणि मन वळवणे’ (पर्सूएशन आणि मॅनिप्युलेशन ) असे म्हटले आहे. आजची अत्याधुनिक एआय साधने अत्यंत प्रभावी मजकूर आणि संवाद तयार करण्यास सक्षम झाली आहेत. राजकीय प्रभाव पाडण्यासाठी, एखाद्या विशिष्ट कट्टरपंथी विचारसरणीचा प्रसार करण्यासाठी आणि आर्थिक फसवणुकीसाठी राज्य (स्टेट ) आणि बिगर-राज्य (नॉन स्टेट अॅक्टर्स) घटकांकडून या क्षमतांचा आधीच सक्रिय वापर केला जात आहे. याहूनही भयंकर बाब म्हणजे या एआय प्रणालींची ‘सायकॉफन्सी’ म्हणजेच वापरकर्त्याला खुश ठेवण्यासाठी त्याच्याच मताला सतत होकार देण्याची प्रवृत्ती. चॅट जीपीटी /जेमिनी सारखी एआय टूल्स अनेकदा आपल्याला पडताळणी करणारे एखादे विरोधी मत दाखवण्याऐवजी, आपल्याला जे ऐकायला आवडेल तेच परत परत सांगून आपल्या आधीच्याच, आणि कदाचित चुकीच्या, विश्वासांना अधिक घट्ट करतात. यामुळे माणूस स्वतःच्याच एका वैचारिक बुडबुड्यात अडकतो आणि वेगवेगळ्या दृष्टिकोनांचा विचार करण्याची त्याची इच्छाशक्तीच नष्ट होते. जेव्हा भविष्यात एआय आपले एक कायमस्वरूपी ‘संवादक’ बनेल, तेव्हा हे तंत्रज्ञान निर्णय घेणाऱ्या महत्त्वाच्या संस्थांना किंवा एखाद्या नाजूक मनोवृत्तीच्या व्यक्तीला अत्यंत सहजपणे आपल्या बाजूने वळवू शकेल.
या भावनिक आणि वैचारिक गुंतागुंतीतूनच दुसरी एक भयंकर सवय मानवी मेंदूला जडत आहे, ज्याला या संशोधनात ‘कॉग्निटिव्ह ऑफलोडिंग’ किंवा ‘बौद्धिक आळस’ असे संबोधले आहे. आपण आजवर अनेक गोष्टी यंत्रांवर सोपवल्या. कॅल्क्युलेटरने आपली आकडेमोड सोपी केली आणि इंटरनेट सर्च इंजिनने आपल्याला माहिती तोंडपाठ ठेवण्याच्या ओझ्यातून मुक्त केले, पण एआयच्या बाबतीत झालेला बदल हा गुणात्मकदृष्ट्या अत्यंत वेगळा आणि गंभीर आहे. इंटरनेट सर्चच्या काळात माणूस माहिती शोधत होता, पण तर्क लावण्याचे आणि समजुती तयार करण्याचे काम तो स्वतःच करत होता. आजचे एआय मात्र त्यापुढची मजल मारत आहे; ते थेट आपल्या जागी योजना बनवते, कठीण प्रश्नांची स्पष्टीकरणे देते, युक्तिवाद रचते आणि निर्णयही घेते. जेव्हा आपण आपले तर्क करण्याचे, मूल्यांकन करण्याचे आणि विचार करण्याचे हे सर्वोच्च अधिकार एका यंत्राकडे सोपवतो, तेव्हा मेंदूची सक्रियता आणि त्याची कष्ट करण्याची नैसर्गिक तयारी कमालीची घटते.
इथे पुन्हा रेने देकार्त आठवतो. जर ‘विचार करणे’ हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा असेल, आणि जर माझ्या जागी एक मशीन विचार करत असेल, तर माणूस म्हणून माझे अस्तित्व काय उरते? या प्रश्नाचे उत्तर विज्ञानाने शोधायला सुरुवात केली आहे आणि ते फारसे समाधानकारक नाही. संशोधनात असे दिसून आले आहे की, AI च्या साहाय्याने सलग कोडिंग करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनीअर्सची स्वतःहून चुका शोधण्याची (डीबगिंग ) आणि त्या सोडवण्याची मूळ क्षमता कालांतराने लक्षणीयरीत्या कमी होते. याच संदर्भात मागच्या वर्षी एमआयटी मीडिया लॅबने प्रसिद्ध केलेल्या आणि स्वयंसेवकांच्या मेंदूचे ईईजी काढून केलेल्या एका शैक्षणिक अभ्यासातून असेही समोर आले आहे की, बौद्धिक कामांसाठी एआय वर अतिशय अवलंबून राहिल्याने माणसाच्या मेंदूतील ‘न्यूरल कनेक्टिव्हिटी’ कमी होते आणि माणसे स्वतःच्याच स्वतंत्र विचारांवरचा विश्वास हळूहळू गमावू लागतात. या स्थितीला या वर्षीच्या सदर संशोधन पत्रात ‘कॉग्निटिव्ह सरेंडर’ म्हणजेच ‘बौद्धिक आत्मसमर्पण’ असे अतिशय मार्मिक नाव दिले आहे. ‘तूच सांग, मी विचार कशाला करू’ ही मेंदूला लागलेली नवी सवय केवळ वैयक्तिक कौशल्यांचाच ऱ्हास करत नाही, तर संपूर्ण समाजाची ‘बौद्धिक लवचिकता’ संपुष्टात आणत आहे.
या वैयक्तिक आळसाचा आणि परावलंबित्वाचा परिपाक एका अत्यंत धोकादायक सामाजिक कोंडीत होत आहे, ज्याला संशोधक ‘फीडबॅक लूप्स’ आणि पर्यायाने ‘एपिस्टेमिक लॉक-इन’ म्हणतात. आज आपण पाहतो की एआय द्वारे निर्माण केलेला लाखो पानांचा मजकूर इंटरनेटवर टाकला जात आहे. भयानक वास्तव हे आहे की, भविष्यातील नवीन एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी हाच एआय -निर्मित ‘सिंथेटिक’ डेटा पुन्हा वापरला जाणार आहे.
म्हणजे गंमत बघा : माणसाचे विचार आता एआय घडवणार आणि तेच विचार पुन्हा भविष्यातील ‘एआय’ला ‘ट्रेन’ करणार, हे एक न संपणारे चक्र आहे. यामुळे ‘होमोजेनायझेशन’ म्हणजेच विचारांचे प्रचंड सपाटीकरण होत आहे.
उदा : जानेवारी २०२६ मध्ये कियान्यु हाओ आणि जेम्स इव्हान्स आदी संशोधकांनी एका मोठ्या अभ्यासात ४ कोटींहून अधिक वैज्ञानिक शोधनिबंधांचे विश्लेषण केले असता असे आढळले की, एआय चा वापर वाढल्यामुळे वैयक्तिक संशोधनाचा वेग नक्कीच वाढला आहे, पण एकूण वैज्ञानिक संशोधनातील विषयांची विविधता मात्र मोठ्या प्रमाणावर आकुंचन पावली आहे.
‘ब्रेनस्टॉर्मिंग’ किंवा कल्पनाविष्काराच्या सत्रांमध्ये जेव्हा लोक ‘एआय’ची मदत घेतात, तेव्हा खऱ्या मानवी गटांच्या तुलनेत अत्यंत कमी अद्वितीय कल्पना पुढे येतात. सगळे एआयला विचारून एकाच साच्यातील कल्पना समोर आणतात! भाषिक पातळीवरही हेच घडत आहे; लार्ज लँग्वेज मॉडेल्सची विशिष्ट वाक्यरचना आता माणसांच्या संवादात आणि लेखनातही थेट उतरू लागली आहे.एआय ने लिहिलेला मजकूर मातब्बर लेखकांच्या नावाने हल्ली वर्तमानपत्रात सुद्धा सर्रास दिसू लागला आहे म्हणजे बरेच लेखक हल्ली एआय वापरून लेख ‘बनवणारे’ झालेले आहेत आणि यात हल्ली कुणाला वावगे वाटणे सुद्धा बंद झाले आहे !
मानवी संस्कृतीचा आजवरचा विकास हा मतभेदांमधून, वेगवेगळ्या विचारसरणींमधून आणि बंडखोर वृत्तींमधून झाला आहे. लोकशाही असो वा विज्ञान, समाजाला प्रगतीसाठी अशा ‘हट्टी अल्पसंख्याकांची’ गरज असते, जे प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन नवीन सत्य मांडू शकतात, पण जेव्हा संपूर्ण समाज एकाच प्रकारच्या एआयचा वापर करून विचार करेल, तेव्हा विचारांची ही नैसर्गिक विविधता नष्ट होईल. समाज एकाच प्रकारच्या संकुचित विचारसरणीत कायमचा अडकून पडेल आणि नवीन ज्ञान किंवा मूल्यांकडे जाण्याचे आपले मार्ग कायमचे बंद होतील. हीच ती ‘एपिस्टेमिक लॉक-इन’ची अवस्था, जिथून परत फिरणे मानवी समाजाला जवळपास अशक्य होऊन बसेल.
मग या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? या संशोधन पत्राचा उद्देश आपल्याला घाबरवणे किंवा तंत्रज्ञान पूर्णपणे बंद करायला लावणे हा नक्कीच नाही. उलट, योग्य पद्धतीने वापरल्यास एआय हे मानवी बुद्धिमत्तेला नव्या उंचीवर नेऊ शकते आणि आपल्या लोकशाही संस्थांना अधिक सक्षम करू शकते. पण त्यासाठी आपल्याला आपल्या दृष्टिकोनात आणि पद्धतीत आमूलाग्र बदल करावा लागेल. आपण स्वतः जाणीवपूर्वक आपल्या आणि एआय च्या संवादात काही ‘बौद्धिक अडथळे’ (कॉग्निटिव्ह फ्रिक्शन ) उभे केले पाहिजेत. जेव्हा आपण एखाद्या प्रश्नावर स्वतः विचार न करता थेट ‘एआय’कडून उत्तर मागतो, तेव्हा आपण आपल्या मेंदूचे नुकसान करत असतो. त्याऐवजी, प्रथम स्वतः विचार करून मसुदा तयार करणे आणि मग केवळ त्रुटी शोधण्यासाठी किंवा पर्यायी दृष्टिकोन समजून घेण्यासाठी एआयची मदत घेणे, हा खरा मार्ग आहे. याशिवाय, शिक्षण क्षेत्रात केवळ ‘डिजिटल साक्षरता’ न शिकवता, विद्यार्थ्यांमध्ये एआय च्या विशिष्ट चुका आणि धोके ओळखण्याची क्षमता निर्माण करणारी ‘एपिस्टेमिक लस’ टोचण्याची नितांत गरज आहे.
शेवटी, हा प्रश्न केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा नाही, तर ‘माणूस’ म्हणून आपल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या जाणिवेचा आहे. देकार्तने म्हटल्याप्रमाणे आपला विचार हाच आपल्या अस्तित्वाचा गाभा आहे. जर आपण विचार करण्याचे हे कष्ट, ती वेदना आणि तो आनंद टाळण्यासाठी सर्व काही एका मूक यंत्राकडे सोपवले, तर आपण कदाचित व्यावसायिक जगात अधिक वेगाने काम करू, पण आपली माणुसकी हरवून बसू. मानवी विचारविश्वाचे हे आभाळ मोकळे ठेवायचे असेल, तर आपल्याला आपल्या मेंदूला सतत कष्ट द्यावेच लागतील. कारण ज्या दिवशी आपला स्वतंत्र विचार थांबेल, त्या दिवशी आपले खरे अस्तित्वही संपलेले असेल.
००००००००

