ऑस्ट्रेलियाने दाखवला बाहेरचा रस्ता : द.आफ्रिकन संघ सेमीफायनलमध्ये
वृत्तसंस्था/ लॉर्ड्स
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाचे महिला टी-20 वर्ल्ड कप 2026 जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. रविवारी लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर खेळल्या गेलेल्या करो या मरोच्या महामुकाबल्यात माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवासोबतच भारतीय संघाचा या वर्ल्ड कपमधील प्रवास संपला असून संघ सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. भारताच्या पराभवाने द.आफ्रिकन महिला संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळाले आहे.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 4 बाद 170 धावा केल्या. शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावा जोडल्या. शेफाली 34 धावांवर तर स्मृती 38 धावांवर बाद झाली. कर्णधार हरमनप्रीत कौरने 27 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 3 षटकारांसह 56 धावा केल्या. हरमनप्रीतने जेमिमा रॉड्रिग्जसोबत (34 धावा, निवृत्त) तिसऱ्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी केली. शेवटच्या षटकात, तिने ऑस्ट्रेलियन कर्णधार सोफी मोलिन्यूच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार मारून भारताची धावसंख्या 170 पर्यंत पोहोचवली.
विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन सलामीवीर जॉर्जिया व्होल 4 धावा करुन बाद झाली. बेथ मुनीने 22 तर लिचफिल्डने 24 धावांचे योगदान दिले. यानंतर अनुभवी एलिस पेरी आणि अॅश्ले गार्डनर यांनी अर्धशतके झळकावत संघाला विजय मिळवून दिला. पेरीने 38 चेंडूत 56 धावा केल्या तर गार्डनरने 29 चेंडूत नाबाद 53 धावांचे योगदान दिले. यासह ऑसी संघाने 19 व्या षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले. आता ऑस्ट्रेलियाचा उपांत्य फेरीत वेस्ट इंडिज विरुद्ध सामना होणार आहे. भारत स्पर्धेतून बाहेर झाला असताना त्याच गटातून दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत पोहोचले आहेत.
