Headlines

Maria Harshitha Success Story ; प्रॉडक्ट मॅनेजर ते व्यावसायिक, घरात उरलेल्या शिल्लक अंड्यांकडे पाहून आली भन्नाट आयडिया


घरात उरलेल्या शिल्लक अंड्यांकडे पाहून हर्षिता यांना व्यवसायची सुंदर संकल्पना सुचली. त्यांनी नोकरी सुटल्यापासून ते व्यावसायिक होण्यापर्यंतचा प्रवास स्वतः सोशल मिडियावर शेअर केला आहे. आधी Amazon सारख्या कंपनीतून नोकरी सुटली. त्यानंतर अनेक प्रयत्न करूनही हाताला नोकरी मिळाली नाही. यातून खचून न जाता सुरू केलेला व्यवसाय आज कित्येक व्यावसायिक होऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Maria Harshitha Success Story
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
हर्षिता Amazon कंपनीत कार्यरत होत्या. काही कारणांमुळे त्यांची नोकरी सुटली. जेव्हा मॅनेजरने त्यांना ही गोष्ट समजावून सांगितली तेव्हा त्यांनी मोठ्या शांतीने ते मान्य केले. त्यावेळी त्यांच्या मनात फक्त आशा होती. काही तरी मार्ग निघेल असे मन सतत सांगत होते.

नोकरी सुटल्यावर त्यांनी अनेक कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज केले. ओळखीच्या माणसांशी संपर्क केला, नोकरीसाठी विचारणा केली. मोठ्या प्रयत्नानंतरही त्यांच्या हाताला काहीच लागले नाही. या सगळ्या अनुभवांमुळे नोकरी आणि करियर या गोष्टीकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोण बदलू लागला होता.

हर्षिता यांनी नव्या नोकरी शोधासाठी घेतलेली मेहनत पती कनिष्क डेव्हिड यांनी पाहिली. त्यांना सततचे मिळणारे अपयश पाहिले. कनिष्क यांनी हर्षिता यांना सल्ला दिला. ते म्हणाले की “तुम्ही एका कंपनीचे प्रॉडक्ट मॅनेजर राहिले आहात. त्याच पदासाठी नोकरीचा शोध घेत आहात. इतर प्रॉडक्टसाठी काम करण्यापेक्षा तुम्ही स्वतःचेच प्रॉडक्ट का नाही तयार करत?” पतीचा सल्ला हर्षिता यांनी मनावर घेतला पण नोकरीचा शोध काही थांबवला नाही.

“व्यवसाय करायचा तर आहे पण कसला?” असा प्रश्न सुरुवातीला इतरांप्रमाणे त्यांनाही पडला होता. पती-पत्नीने मिळून घरात चिकन कूप तयार केला. 6 कोंबडीची पिल्लं घरी आणली. याकाळातही हर्षिता यांचा नोकरीचा शोध सुरूच होता. एकीकडे त्या नोकरीही शोधत होत्या आणि दुसरीकडे पिल्लांची देखभालही करत होत्या. कोंबडीची पिल्लं मोठी झाली, त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की त्यांनी इतकी देखभाल करून वाढवलेली सगळी पिल्ले तर नर आहेत.

हर्षिता यांनी त्याच क्षणी कोंबड्या विकत घेतल्या. सुरुवातीला स्वतःच्या मुलांना घरची ताजी अंडी खायला मिळावी असा साधा उद्देश होता. दरम्यान, घरची गरजही भागत होती आणि कोंबड्यांची अंडीही अतिरिक्त उरत होती. त्या शिल्लक अंड्यांकडे पाहून त्यांना भन्नाट संकल्पना सुचली. त्यांनी अशा शिल्लक अंड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा निश्चय केला. अगदी घरच्या घरी लहानशा व्यवसाय सुरू केला. पुढे कोंबड्यांची संख्या वाढली, त्यापासून होणारे अंड्यांचे उत्पादनही वाढले. आता घरातून सुरू केलेला छोटा उपक्रम व्यवसायाचा स्वरूप घेऊ लागला आहे.

Maharashtra TimesNPS Account Charges: NPS संबंधित नियमांमध्ये बदल! खर्चाचे गणित बदलणार, 1 ऑक्टोबरपासून गुंतवणुकदारांना नवीन शुल्क लागणारअंडे बनले प्रॉडक्ट

हर्षिता यांनी नुकताच हा व्यवसाय सुरू केला आहे. घरी उरलेल्या कोंबड्यांच्या अंड्यांकडे त्यांनी प्रॉडक्ट म्हणून पाहिले आणि आधीपासून अंगीकृत असणाऱ्या प्रॉडक्ट मॅनेजमेंटच्या कौशल्याने व्यवसायाची पायाभरणी केली. व्यवसाय नुकताच उभारला असून अद्याप याचे टर्नओव्हर किंवा इतर आर्थिक माहिती अधिकृतरीत्या उपलब्ध नाही. परंतु हर्षिता यांनी बेरोजगारीतून शोधलेल्या संधीमुळे तसेच घरात शिल्लक राहिलेल्या अंड्यांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामुळे एका व्यवसायाला जन्म दिला आहे हे नक्कीच कौतुकास्पद आहे.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा