बुडाच्या बैठकीत विविध विषयांना मंजुरी, कणबर्गीत होणार आयटी पार्क
बेळगाव
सुमारे 25 कोटी रुपयांच्या निधीतून कुमारस्वामी ले-आऊटमध्ये 18 गुंठे जागेत 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्यासह कणबर्गीत 1,223 कोटींच्या निधीतून आयटी पार्क उभारण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बुडाच्या बैठकीत घेण्यात आला.
शनिवारी बेळगाव शहर विकास प्राधिकरणाची (बुडा) बैठक पार पडली. सदर बैठकीला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी, बुडाचे नूतन अध्यक्ष आमदार आसिफ सेठ यांनी सदर माहिती दिली. आयटी पार्कला मंजुरी मिळाली असून लवकरच कामाला सुरुवात करण्याची सूचनाही अधिकाऱ्यांना करण्यात आली.
यावेळी बुडाने पहिल्यांदाच महिलांसाठी तीन अत्याधुनिक जीम उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 4500 चौरस फुटांमध्ये या जीम तयार होणार आहेत. यासाठी 3 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून बेळगावात महिलांसाठी स्वतंत्र जीम नसल्याने हा निर्णय घेण्यात आला. कणबर्गी येथील आयटी पार्कच्या कामाला तीन टप्प्यात सुरुवात होणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यात 1.8 लाख चौरस फूट बांधकाम केले जाणार असून त्यासाठी 75 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात 14.29 लाख चौरस फुटाचे बांधकाम होणार असून त्यासाठी 600 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तिसऱ्या टप्प्यात 13.77 लाख चौरस फुटांचे बांधकाम होणार असून यासाठी 548 कोटी रुपये अपेक्षित आहेत.
तिन्ही टप्प्यांमध्ये 1223 कोटींचा खर्च करून 12 टॉवर उभारले जाणार आहेत. विशेष म्हणजे कुमारस्वामी ले-आऊटमध्ये 100 खाटांचे हॉस्पिटल उभारण्यासह रामतीर्थनगर येथे तीन मजली कल्याण मंटप, शहरातील दहा चौकांचे सुशोभिकरण आणि सह्याद्रीनगर, मुत्त्यानट्टी येथील दोन तलावांचा 11 कोटींच्या निधीतून विकास केला जाणार आहे. सदर बैठकीला उपमहापौर हणमंत कोंगाली, बुडा आयुक्त शकील अहमद, नगररचना अधिकारी व्ही. बी. हिरेमठ यांच्यासह सदस्य व अधिकारी उपस्थित होते.
