Twinkle Khanna Praises Tukaram Mundhe Work : तुकाराम मुंढे यांच्या बेधडक कारवाईमुळे सध्या बऱ्याच हॉटेल व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अनेक कलाकारांनी त्यांचे कौतुक करुन बरेचदा आपले अनुभव शेअर केले. आता अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नाने सुद्धा तिचा अनुभव सांगितला आहे.

ट्विंकल खन्नाने टाइम्स ऑफ इंडियात लिहिलेल्या एका लेखात ही माहिती दिली आहे. त्यात तिने तुकाराम मुंढे यांच्या या कठोर कारवाईबद्दलचे आपले विचार विनोदी शैलीत मांडले. पनीरच्या चवीवरून आपल्यात आणि आईमध्ये जी ‘भांडणं’ सुरू झाली आहे, त्याचे वर्णन तिने यात केले आहे; तसेच, पनीरच्या रंगावरूनही लवकरच असाच वाद निर्माण होऊ शकतो, अशी भीतीही व्यक्त केली आहे.
‘मुंढेंमुळे कॉटन कँडीचा गुलाबी रंग गायब’
ट्विंकलने लिहिले आहे, “पूर्वी जेव्हा मी केवळ फिरण्यासाठी जत्रेत जायचे, तेव्हा म्हातारीचे केस (कॉटन कँडी) गुलाबी रंगाची मिळायची. आता तिचा रंग माझ्या केसांच्या मुळांशी मिळताजुळता झाला आहे, जी मुळे हेअर कलरिंगच्या दोन सेशनच्या मधल्या काळात दिसू लागतात. थोडक्यात सांगायचे तर, आता ती खऱ्या अर्थाने आपल्या नावाला साजेशी दिसते. अहवालांनुसार, हा गुलाबी रंग गायब होण्यामागे महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांचा हात आहे; त्यांनी राज्यभरात 3000 हून अधिक ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. त्यांच्या कारवाईमुळे ‘डोमिनोज’सह शेकडो रेस्टॉरंट्स बंद करावी लागली आहेत. मुंढे जिथे जिथे जातात, तिथे तिथे बड्या लोकांची मुंडकी (डोकी) पडतातच.”
‘भेसळयुक्त पनीरचे प्रकरण समोर आल्यापासून मी घरीच पनीर बनवते’
आपल्या स्तंभालेखामध्ये ट्विंकल खन्ना लिहिले, “भेसळयुक्त पनीरचे प्रकरण चर्चेत आल्यापासून, मी आणि माझी आई घरीच पनीर बनवू लागलो आहोत. आमच्यातील जुना वाद अजूनही सुरूच आहे: एका लीटर दुधापासून तिला 250 ग्रॅम पनीर मिळते, तर मला तितक्याच दुधापासून 180 ग्रॅम पनीर मिळते. आता तर कोणाचे पनीर अधिक चविष्ट आहे, इथपर्यंत ही स्पर्धा पोहोचली आहे.”
“कोणाचे पनीर अधिक पांढरे आहे, असे आई कदाचित विचारायला सुरुवात करेल.”
ट्विंकलने पुढे लिहिले, “मला शंका आहे की कालांतराने ती कदाचित ‘कोणाचे पनीर अधिक पांढरे आहे’ असेही विचारेल आणि मग मला माझ्या पनीरमध्ये डिटर्जंट मिसळावे लागेल. हे ऐकायला जरी विचित्र वाटत असले, तरी प्रत्यक्षात ते तितकेसे विचित्र नाही. एका अलीकडील अहवालानुसार, बिहारमधील नालंदा जिल्ह्यात मिठाऐवजी डिटर्जंटचा वापर केल्यामुळे विद्यार्थी आजारी पडले होते.”
एका रेस्टॉरंटमधील किस्सा आणि मुंढे यांच्या कारवाईचा उल्लेख
ट्विंकल पुढे लिहिले, “मी माझ्या मित्र-मैत्रिणींसोबत एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. आम्ही तंदूरी ब्रोकोली आणि चिकन टिक्काची ऑर्डर दिली. मग मी वेटरला विचारले, ‘मुंढे यांनी तुमच्या रेस्टॉरंटची तपासणी केली आहे का?’ त्याने संकोचत उत्तर दिले, ‘हो मॅडम, गेल्या आठवड्यात. आम्ही ती तपासणी यशस्वीपणे पार केली.’ त्यावर मी म्हणाली, ‘अरे व्वा! मग तर मी बिनधास्तपणे पनीर टिक्का मागवू शकते. प्लीज आमच्या ऑर्डरमध्ये ते सुद्धा समाविष्ट करा.’
मुंढे की मार्टिनी
“सर्वात आधी आपली ड्रिंक्स येतात आणि त्यानंतर स्टार्टर्स येतात. मी टूथपिकच्या साहाय्याने पनीरचा एक तुकडा उचलला. तो माझ्या तोंडापर्यंत पोहोचण्याआधीच तुटला आणि माझ्या मार्टिनीमध्ये पडतो. मी दुसरे ड्रिंक मागवण्याचा विचार केला होता. पण मग मला वाटते की, ज्या व्यक्तीची कृती ही त्यांच्या शब्दांपेक्षा आणि गाण्यांपेक्षाही अधिक प्रभावी आहे, त्यांच्या सन्मानार्थ ‘टोस्ट’ उंचावण्याची हीच योग्य वेळ आहे. मी या ड्रिंकला ‘मुंढे की मार्टिनी’ असे नाव दिले: जिन, वर्मुथ, ऑलिव्ह आणि पनीर. ‘शेकेन, नॉट स्टर्ड’ (म्हणजेच ढवळलेले नाही, तर हलवून तयार केलेले).”
गेल्या काही दिवसांत अनेक सेलिब्रिटी मंडळींनीही तुकाराम मुंढेच्या कार्याचे कौतुक केले आहे. तसेच एखाद्या गोष्टीत त्यांना समस्या आढळली तर ते लगेचच त्यांना टॅग करुन त्याबाबत तक्रारही करत आहेत.

