पर्वरी गोळीबार प्रकरण : नायक यांच्याकडून पोलिसांत तक्रार दाखल
त. भा. प्रतिनिधी/ पणजी / म्हापसा :
कॅसिनो मॅजेस्टिक पॅराडाईजचे संचालक श्रीनिवास नायक यांना लक्ष्य करून झालेल्या कथित गोळीबार प्रकरणी पर्वरी पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. नायक यांनी पर्वरी पोलिसांशी संपर्क साधून या घटनेसंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मात्र, या कथित हल्ल्याप्रकरणी त्यांनी अद्याप कोणाचेही नाव संशयित म्हणून घेतलेले नाही.
पोलिसांनी अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, गोळीबारामागील हेतू आणि त्यात कथितरित्या सामील असलेल्या व्यक्तींची ओळख यासह गोळीबाराच्या सभोवतालच्या परिस्थितीचा तपास करत आहेत. श्रीनिवास नायक यांच्यावर झालेला गोळीबार आर्थिक व्यवहारातून झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. नायक यांनी एका हॉटल प्रकल्पात मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवली होती. मात्र या व्यवहारात अनेक अडथळे निर्माण झाल्याने नायक यांनी ते पैसे परत घेतले होते. नंतर हे प्रकरण उच्च न्यायालायपर्यंत पोचले होते. याच प्रकरणातून हा हल्ला झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात असून त्याबाबत तपास सुऊ आहे.
संशयित दुचाकीवरून झाले पसार
शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात संशयितांनी नायक यांच्यावर गोळीबार केला होता. सुदैवाने नायक यातून बचावले. त्यांना प्रत्युत्तर देताना नायक यांच्या सुरक्षारक्षकानेही तीन फैरी झाडल्या होत्या. संशयितांचा मुख्य रस्त्यापर्यंत पाठलाग करण्यात आला, मात्र संशयित दुचाकीवरून पळून गेले.
नायक यांच्यावरील गोळीबार हा त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने करण्यात आला होता की केवळ भीती निर्माण करण्यासाठी हा हल्ला घडवून आणला होता याबाबत संशय व्यक्त केला जात आहे. दोघांनी नायक यांच्या दिशेने तीन राऊंड गोळीबार केला. त्याचवेळी नायक यांच्या सुरक्षारक्षकाने प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड गोळीबार केला. मात्र, दोन्ही बाजूंकडून झालेल्या गोळीबारात कोणालाही दुखापत झाली नाही. शुटरचे नेम चुकलेच, मात्र त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करणाऱ्या सुरक्षा रक्षकांचाही नेम कसा चुकला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
संशयितांचे चेहरे सीसीटीव्हीत कैद
दरम्यान, दोन्ही संशयितांचे चेहरे घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहेत. पर्वरी पोलिसांनी सीसीटीव्ह फुटेज घेतली असून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. पोलिसांनी विविध पथके तयार करून त्यांना वेगवेगळ्या दिशेने तपासासाठी रवाना केले आहे. घटनास्थळावरून काडतुसांचे शेल्सही जप्त करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज, घटनास्थळावरील पुरावे आणि हल्लेखोरांच्या हालचालींच्या आधारे पोलिस तपास करत आहेत.
श्रीनिवास नायक विविध वादांमध्ये चर्चेत
श्रीनिवास नायक यांचे नाव यापूर्वीही विविध वादांमध्ये चर्चेत आले आहे. त्यांनी यापूर्वी एका राजकीय नेत्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. त्यामुळे या हल्ल्यामागे नेमके कोणते कारण आहे, तसेच हल्लेखोरांचा उद्देश काय होता, याबाबत विविध शक्यता व्यक्त होत आहेत. दरम्यान, नायक यांना लक्ष्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेताना पोलिसांसमोर अनेक प्रश्न आहेत. तपासातूनच या गोळीबारामागचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
गोळीबाराची कोणतीही घटना खपवून घेतली जाणार नाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा इशारा
पणजी : गोव्यात गोळीबाराची कोणतीही घटना खपवून घेतली जाणार नाही आणि कॅसिनो मॅजेस्टिकचे संचालक व त्यांच्या सुरक्षारक्षकावरील हल्ल्यात सहभागी असलेल्यांना लवकरच अटक केली जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शनिवारी सांगितले.
पणजीत एका कार्यक्रमाला आले असता पत्रकाराशी बोलताना सावंत म्हणाले की, हल्ल्यामागील हेतूदेखील शोधला जाईल आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश आपण पोलिस महासंचालकांना दिले आहेत. एखाद्या व्यावसायिकावर अशा प्रकारचा हल्ला होणे योग्य नाही आणि विशेषत: गोव्यात हे खपवून घेतले जाणार नाही. थोड्याच काळात, या गुह्यामागे कोण आहे आणि त्याचा हेतू काय होता, हे तपासातून उघड होईल, असे ते म्हणाले.
अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी सरकार आणि पोलिस सर्व आवश्यक उपाययोजना करतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या आठ वर्षांत गोव्यात उघडपणे शुक्रवारी झालेली गोळीबाराची ही पहिलीच घटना आहे. हल्लेखोरांना ओळखण्यासाठी आणि शस्त्रs पुरवणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. गोळीबार करणारे गोव्याबाहेरील भाडोत्री मारेकरी (‘सुपारी किलर’) असू शकतात, असा पोलिसांना संशय असून ते अद्याप त्यांच्या ठावठिकाणाचा शोध घेत आहेत. तपासाचा एक भाग म्हणून गोवा नोंदणी क्रमांक असलेली एक बेवारस कारही समोर आली आहे.
मुख्यमंत्री गांभीर्याने दखल घेतील – आरोग्यमंत्री विश्वजित राणे
पर्वरी येथे जो गोळीबार झाला. हा प्रकार गंभीर आहे. यापूर्वी गोव्यात असे कधीही घडले नाही. याप्रकरणी कठोर कारवाई होण्याची गरज आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर पूर्ण विश्वास व खात्री आहे की, ते याकडे नक्कीच गांभीर्याने लक्ष देणार, असा विश्वास आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.
रेईसमागूश वेरे येथे एक कार्यक्रम आटोपून जात असताना राज्यातील कायदा सुव्यवस्था व मॅजेस्टिक प्राईड कॅसिनोबाहेर संचालक श्रीनिवास नायक यांच्यावर झालेल्या हल्याबाबत आरोग्यमंत्री राणे यांना छेडले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली.
उंदराच्या चाव्याबाबतचा अहवाल आल्यानंतरच भाष्य करू
गोमेकॉत एका ऊग्णाच्या पायाला उंदराने चावा घेतल्याचे आपण सोशल मीडियावर पाहिले आहे. सोशल मीडिया खूपच सक्रिय आहे. ही घटना खूपच गंभीर आहे. याबाबत आपण डिनकडे स्पष्टीकरण मागितले आहे. जोपर्यंत याबाबत अहवाल आपल्याकडे येत नाही तोपर्यंत आपण काही बोलणार नाही. योग्य अहवाल आल्यानंतच आपण योग्य निर्णय घेणार आहे, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी सांगितले.
