![]()
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय टपाल विभागाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर विशेष आवरणाचे प्रकाशन केले. हा कार्यक्रम शनिवारी पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबच्या तूळपुळे हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री तसेच महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत या विशेष आवरणाचे अनावरण झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्य पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये होते. यावेळी पुणे विभागाच्या पोस्टमास्टर जनरल प्रिती अग्रवाल आणि पुणे विभागाचे पोस्टल सर्व्हिसेस संचालक अभिजीत बानसोडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी टपाल विभागातील आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंचा विशेष गौरव करण्यात आला. विविध क्रीडा प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करून देशाचा नावलौकिक वाढवणाऱ्या या खेळाडूंच्या योगदानाची उपस्थित मान्यवरांनी प्रशंसा केली. हॉकीचे महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. क्रीडा, आरोग्य आणि तंदुरुस्तीबाबत जनजागृती करणे तसेच युवकांचा क्रीडा क्षेत्रातील सहभाग वाढवणे हा या दिनाचा प्रमुख उद्देश आहे. क्रीडा क्षेत्रातील योगदान, क्रीडाप्रेम आणि राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व अधोरेखित करण्याच्या उद्देशाने भारतीय टपाल विभागाने हे विशेष आवरण प्रसिद्ध केले आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 च्या पार्श्वभूमीवर या उपक्रमामुळे देशातील क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन मिळण्यास मदत होईल, असे यावेळी नमूद करण्यात आले. महत्त्वपूर्ण घटना, व्यक्ती, क्रीडा आणि सांस्कृतिक विषयांचे स्मरण जतन करण्यासाठी विशेष आवरणे एक प्रभावी माध्यम ठरतात. त्यामुळे हे विशेष आवरण क्रीडाप्रेमी, टपाल तिकीट संग्राहक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाचे ठरेल. या कार्यक्रमास टपाल विभागाचे अधिकारी व कर्मचारी, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, टपाल तिकीट संग्राहक आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुणे शहर पश्चिम विभागाचे प्रवर अधीक्षक नितीन येवला यांनी आभार मानले, तर पोस्ट निरीक्षक सिद्धार्थ हराळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Source link
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विशेष आवरणाचे प्रकाशन:आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव, राष्ट्रकुल स्पर्धा 2026 ची पार्श्वभूमी
