अल्पवयीन मुलींवर, महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या बातम्यांनी समाज सुन्न होत असताना फ्रान्समधील गिजेल पेलिको यांचे ‘ए हिम टू लाइफ : शेम हॅज टू चेंज साइड्स’ हे पुस्तक लक्षवेधी ठरते. जवळपास दशकभर पती डोमिनिकने पन्नासेक नराधमांना गिजेल यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्यास प्रवृत्त केले. हे सत्य अचानकपणे उघडकीस आले, तेव्हा पन्नास वर्षांच्या संसाराची ही शोकांतिका अनुभवताना गिजेल स्वाभाविकपणे कोलमडून गेल्या. तरीही धैर्य एकवटत त्यांनी आपली ओळख लपवण्याचा कायदेशीर अधिकार स्वेच्छेने सोडण्याचा क्रांतिकारक निर्णय घेतला. खटल्याच्या जवळपास प्रत्येक सुनावणीला त्यांनी हजेरी लावली. अखेरीस डोमिनिकला वीस वर्षांच्या कारावासाची, तर अन्य नराधमांनाही कारावासाची शिक्षा झाली. ‘अत्याचाराची लाज पीडित व्यक्तीने बाळगण्याची गरज नसून, संबंधित गुन्हेगाराने लज्जित व्हायला हवे,’ ही ठाम भूमिका घेऊन लढणाऱ्या गिजेल यांचे हे आत्मकथन आहे.
पतीच्या विकृत कृत्यांची माहिती पोलिसांकडून गिजेल यांना कशी मिळाली, या कथनाने पुस्तकाची सुरुवात होते. २०२०मध्ये डोमिनिकला एका सुपरमार्केटमध्ये महिलांचे चोरून फोटो काढल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्या तपासात पोलिसांना व्हिडिओ आणि फोटोंचा मोठा साठा सापडला. त्यातून बेशुद्ध असलेल्या गिजेल यांच्यावर अनेक पुरुष वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार करत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी हे सत्य उलगडले, तेव्हा आलेल्या उद्ध्वस्तपणाच्या भावनेला गिजेल शब्दरूप देतात.
या पार्श्वभूमीवर गिजेल यांनी भूतकाळातील आठवणी जागवल्या आहेत. अवघ्या नवव्या वर्षी हरपलेले मातृछत्र, वडिलांनी दुसरे लग्न केल्यानंतर वाट्याला आलेला सावत्र आईचा जाच, भावाने केलेली आत्महत्या, डोमिनिक यांच्याशी झालेली भेट, त्या नात्यातील किशोरवयीन गोडवा, कुटुंबावर हुकूम गाजवणारा क्रूर आणि लंपट सासरा असा गुंतागुंतीच्या आयुष्याचा पट त्या उलगडून दाखवतात. आपल्या वैवाहिक जीवनात डोमिनिक यांच्याकडून करण्यात आलेल्या विकृत ‘मागण्या’, काही काळासाठी आपण स्वतः विवाहबाह्य संबंधांच्या आहारी गेल्याची चूक, आपल्या एका मैत्रिणीने डोमिनिकच्या चारित्र्याविषयी सावध करूनही आपण त्याकडे केलेले दुर्लक्ष याची त्या प्रांजळ कबुली देतात. तरीही त्या चढउतारांवर मात करीत आपल्या मुला-नातवांमध्ये रमलेल्या गिजेल यांच्या वाट्याला पतीनेच केलेला अकल्पनीय विश्वासघात कसा आला, हे वर्णन हृदयद्रावक आहे.
अर्थात, या पुस्तकाचे मर्म गिजेल त्या भीषण वास्तवास सामोऱ्या कशा गेल्या, यात आहे. आपल्यावर झालेल्या गुन्ह्याचा खटला बंद दाराआड न चालवता तो खुला असावा, असा आग्रह त्यांनी धरणे; प्रस्थापित संकेतांच्या विरोधात जाऊन घेतलेल्या या निर्णयावर खुद्द न्यायाधीशांची नाराजी; सरकारी वकिलांचाही बंद सुनावणीचा आग्रह; परंतु, कायद्यानुसार निर्णय केवळ पीडितेचाच असल्याने न्यायाधीशांनी गिजेल यांच्या बाजूने दिलेला निर्णय… हे सगळे मांडत त्या समाजाच्या पुरुषसत्ताक मानसिकतेवर दाहक भाष्य करतात.
न्यायालयात आरोपींचे चेहरे समोर आले, त्यांतील काही गिजेल यांना परिचित असणे, काहींनी तोंडावर मुखवटे घालून चेहरा लपविणे, आरोपींचा निष्पाप असण्याचा अधिकार धोक्यात येईल असा युक्तिवाद करीत बचाव वकिलांनी ‘बलात्कार’ हा शब्द वापरू नये अशी विनंती करणे, एका वकिलाने तर गिजेल यांची आपल्या अशिलांच्या विकृत कृत्यांना सहमती असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करणे, या कथनातून त्यांना कोणत्या यातनांतून जावे लागले असेल, याची कल्पना येते. यात आपल्या आयुष्याची सार्वजनिक चिरफाड झाली, या शब्दांत त्या आपली वेदना व्यक्त करतात.
आज वयाच्या सत्तरीत पोचलेल्या आणि एका शांत आयुष्याची अपेक्षा बाळगणाऱ्या गिजेल यांना या घटनेने हादरवून सोडले. मात्र, न्यायालयाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ महिलांचा वाढलेला ओघ, रोज मिळणारी पाठबळ देणारी शेकडो पत्रे यांमुळे त्या स्त्री-शक्तीच्या एकजुटीचे केंद्रबिंदू बनल्या. त्यातून आपल्याला बळ मिळाले, असे त्या म्हणतात. या भीषण घडामोडींचा कुटुंबावर कसा दूरगामी परिणाम झाला, हे गिजेल सांगतातच; पण या सगळ्यातून बाहेर पडत पुढे त्यांची भेट झालेल्या जीन-लू यांच्याबरोबर त्या राहू लागल्या, या वर्णनातून त्यांनी भूतकाळ मागे टाकत नवीन आयुष्याची सुरुवात केल्याचा संदेशही दिला आहे..
……………………………………………………….
ए हिम टू लाइफ : शेम हॅज टू चेंज साइड्स
लेखिका : गिजेल पेलिको
अनुवाद : नताशा लेहरर व रूथ डायव्हर
प्रकाशक : बॉडली हेड
पाने : २५६, किंमत : १४९९ रु.

