Headlines

संजय नहार यांच्या कार्याला सुशीलकुमार शिंदे यांचा सलाम:'सरहद' संस्थेच्या त्रिदशकपूर्तीनिमित्त गौरवग्रंथाचे प्रकाशन, गडकरीही उपस्थित




माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्या कार्याचे कौतुक केले. देशाच्या ज्या भागात समस्या आणि दुःख आहेत, तिथे सर्वप्रथम पोहोचून ‘महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे’ असा संदेश देणाऱ्या नहार यांच्या समाजसेवेच्या यज्ञाला मी सलाम करतो, असे गौरवोद्गार शिंदे यांनी काढले. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते आणि सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त, ‘सरहदचा सांगाती’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि सरहद संस्थेच्या त्रिदशकपूर्तीचा त्रिविध सोहळा आयोजित करण्यात आला होता. या विशेष समारंभात शिंदे अध्यक्षपदावरून बोलत होते. केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी ऑनलाइन उपस्थित होते, तर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आणि नगरविकास व परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ हेही उपस्थित होते. यावेळी ललित गांधी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पुणे पुस्तक न्यासाचे मुख्य समन्वयक राजेश पांडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, संपादक राजीव खांडेकर, मणिपूरचे खासदार प्रमोद बोडो, लडाखचे खासदार मोहंमद हनीफा जान, जम्मू-काश्मीरचे ज्येष्ठ उद्योजक मुश्ताक छाया, श्रीनगरचे संपादक फैयाज कल्लू, संजय नहार, सुषमा नहार यांच्यासह गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, संतसिंह मोखा, युवराज शहा, इंज्र छाजेड आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. स्वारगेट परिसरातील गणेश कला क्रीडा मंच येथे हा सोहळा पार पडला. मान्यवरांच्या हस्ते संजय नहार यांचे ६१ व्या वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करण्यात आले. गौरवग्रंथाच्या प्रकाशनासोबतच सरहद संस्थेची त्रिदशकपूर्तीही साजरी करण्यात आली. यावेळी सरहद संस्था आणि संजय नहार यांच्या कार्यावरील एक दृकश्राव्यफीत दाखविण्यात आली. उद्योजक अविनाश चोरडिया यांनी सरहद संस्थेच्या कार्यासाठी ६१ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. सुशीलकुमार शिंदे यांनी नहार यांच्या कार्याची उदाहरणे दिली. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर पंजाबमध्ये कोणीही जाण्यास धजावत नसताना, संजय नहार धगधगत्या पंजाबात पोहोचले. त्यांनी वाड्यावस्त्यांवर फिरून दुःखी आणि अनाथ लोकांना दिलासा दिला. तसेच, काश्मीरमधील गंभीर परिस्थितीतही ते तिथे पोहोचले आणि अनाथ मुलांच्या भवितव्याची जबाबदारी स्वीकारून त्यांच्या निवास आणि शिक्षणाची सोय पुण्यात केली. नहार यांच्या विचार आणि कृतीत अंतर नाही. प्रतिकूल परिस्थिती, जीवे मारण्याच्या धमक्या आणि हल्ले यांना न घाबरता त्यांनी समाजसेवेचा यज्ञ व्रतस्थपणे सुरू ठेवला आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत