PC Mustafa Success Story: इडली-डोसा पीठ बनवणाऱ्या iD फ्रेश फूड्स या कंपनीचे संस्थापक आणि सीईओ, मुस्तफा पीसी, ने सहावीत नापास झाल्यावर शाळा सोडली. वडिलांसोबत काही रुपयांसाठी हमालीही केली पण, एका शिक्षकाने मुस्तफाच्या आयुष्याला नवीन वळण दिले.

दारिद्र्य, भूक अन् सहावीत नापास होण्याची वेदना
केरळमधील वायनाड जिल्ह्यातील चेन्नालोड या दुर्गम आणि मागासलेल्या गावात पी.सी. मुस्तफा यांचा जन्म झाला. मुस्तफाचे वडील कॉफीच्या मळ्यात हमाल म्हणून काम करायचे तर, आई कधीच शाळेत गेल्या नाही. मुस्तफा यांचे बालपण इतक्या भीषण दारिद्र्यात गेले की, त्यांच्याकडे शाळेत जाण्यासाठी चांगले कपडे किंवा बूटही नव्हते.
शाळा सोडून हमाली केली
मुस्तफा दररोज अनेक किलोमीटर चालून शाळेत जायचे. शाळेनंतर कुटुंबाचं पोट भरण्यासाठी वडिलांसोबत शेतमळ्यात काम करायचे. कामामुळे थकवा आणि भूक यांमुळे त्यांचा अभ्यास व्हायचा नाही परिणामी मुस्तफी सहावीत नापास झाले. त्यानंतर शाळा सोडून मुस्तफाने वडिलांसोबत पूर्णवेळ रोजंदारीवर काम सुरू केले.
एका शिक्षकाने आयुष्याला दिल नवीन वळण
मुस्तफाचे आयुष्य कदाचित मजूर म्हणून संपलं असतं पण, नशिबाने एकेदिवशी वेगळाच डाव साधला. शाळेतील शिक्षक, मॅथ्यू सर, यांनी मुस्तफाची सुप्त प्रतिभा ओळखली आणि मुस्तफाला सल्ला दिला, ज्याने त्यांना पुन्हा शाळेत जाण्यास प्रोत्साहित केले. आपल्या शिक्षकाच्या शब्दांनी मुस्तफाच्या मनावर खोलवर परिणाम केला. त्यानंतर, मजूर म्हणून काम करण्यासोबत मुस्तफा रात्रंदिवस अभ्यास करू लागला आणि सहावीत नापास झालेला मुस्तफा दहावीत संपूर्ण शाळेत प्रथम आला.
मजूर ते NIT अन् मग परदेश प्रवास
मग काय, 10 वी उत्तीर्ण झाल्यावर पुन्हा मागे वळून पाहिलं नाही आणि आपल्या कठोर परिश्रमाच्या जोरावर कालिकत येथील प्रतिष्ठित नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. NIT मध्ये इंजिनिअरिंग शिक्षण पूर्ण केल्यावर मुस्तफाला मोटोरोला आणि नंतर सिटीबँक यांसारख्या टॉप कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. एकेकाळी फाटक्या कपड्यांत फिरणारा मुलगा आता महिन्याला लाखो रुपये कमवू लागला होता.
भारतात परतल्यावर सुरू केले iD फ्रेश फू
पण मुस्तफाचे मन अजूनही भारतातच रमलेले. मायदेशात परत जाऊन आपल्यासारख्या गरीब लोकांना रोजगार उपलब्ध करून देणारा स्वतःचा काहीतरी व्यवसाय सुरू करायचा होता. 2003 मध्ये धाडसी निर्णय घेतला आणि परदेशातील गल्लेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून मुस्तफा भारतात आले. IIM बेंगळुरूमधून एमबीए पूर्ण आणि या दरम्यान 2005 मध्ये आपल्या चुलत भावांसोबत छोटा व्यवसाय सुरू केला. दक्षिण भारतातील लोक नाश्त्याला भरपूर इडली आणि डोसा खातात, पण बाजारात मिळणारे इडली आणि डोशाचे पीठ अस्वच्छ आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. इथूनच त्यांना iD फ्रेश फूडची कल्पना सुचली.
छोट्याशा खोलीतून सुरू केला व्यवसाय
आपल्या कल्पनेला सातत्यात उतरवत मुस्तफाने बेंगळुरूच्या इंदिरानगर परिसरातील 50 चौरस फुटांच्या छोट्याशा स्वयंपाकघरातून फक्त 2500 रुपयांपासून सुरुवात केली. या दरम्यान, दोन ग्राइंडर विकत घेतले आणि स्वतःच पीठ बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला मुस्तफा आपल्या स्कूटरवरून स्वतःच दुकानांमध्ये बॅटर विकायला जायचे. पहिल्या दिवशी फक्त 10 पाकिटे विकली गेली पण, मुस्तफाने हार मानली नाही.
2500 रुपयांची गुंतवणूक अन् उभा झाला 681 कोटींचा व्यवसाय
मुस्तफाचा प्रामाणिकपणा आणि निर्मळपणाने लोकांची मने जिंकली. हळूहळू, 10 पाकिटांपासून सुरुवात होऊन 100, मग 1000 पर्यंत वाढले आणि आज आयडी फ्रेश फूडचे दररोज लाखो किलो इडली-डोसा पीठ, मलबार पराठा आणि पनीर बाजारात विकले जाते. रेडी-टू-कूक फ्रेश फूड्समधील मजबूत बाजारातील मागणी आणि अपॅक्स पार्टनर्ससारख्या मोठ्या गुंतवणुकीमुळे समर्थित मूल्यांकनामुळे आयडी फ्रेश फूडचे मूल्य 4000 कोटींपेक्षा जास्त झाले आहे. iD फ्रेश फूड्स आज भारतात तसेच दुबई आणि अमेरिकेसारख्या देशांमध्ये कार्यरत असून हजारो तरुणांना रोजगार देते, ज्यापैकी बहुतेक ग्रामीण भागातील आहेत.

