Headlines

Nepal Flash Floods: …तर तिथेच आज आमची कबर असती! नेपाळमधून परतलेल्या प्रवाशानं सांगितली अंगावर काटा आणणारी कहाणी


नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात आतापर्यंत ३३२ जणांचा जीव गेला आहे. बेपत्ता असलेल्यांचा आकडा १००० च्या पुढे असल्यानं जीवितहानी वाढण्याची भीती आहे.

nepal flood 1
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नवी दिल्ली: नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात ३३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर बेपत्ता झालेल्यांचा आकडा १००० ते १३०० जणांच्या दरम्यान आहे. हा आकडा पाहता मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. या नैसर्गिक संकटानं कोलकात्याचे अनिंद्य मुखर्जी पुरते हादरून गेले आहेत. अनिंद्य यांनी अवघ्या काही दिवसांपूर्वी जो भाग पाहिला, जिथे वास्तव्य केलं, त्याच परिसरात पुरानं अक्षरश: थैमान घातलं. अनिंद्य ज्या गावात ३ रात्री थांबले, ते गाव आता पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे.

अनिंद्य मुखर्जी काही दिवसांपूर्वीच कैलास-मानसरोवर यात्रा करून परतले. यात्रेदरम्यान त्यांनी नेपाळच्या याच भागातून प्रवास केला. ‘दीड महिन्यांपूर्वी आम्ही एका गावात तीन रात्र मुक्काम केला. आता ते गाव नैसर्गिक आपत्तीमुळे बेचिराख झालं आहे. जिथे आम्ही तीन रात्री छान घालवल्या, तिथे आता सगळं काही उद्ध्वस्त झालं आहे. हा सगळा प्रकार सुन्न करणारा आहे,’ अशा शब्दांत अनिंद्य यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

नेपाळच्या रसुवा जिल्ह्यात बुधवारी सकाळी भोटेकाशी नदीच्या पात्रात प्रचंड भूस्खलन झालं. या दुर्घटनेनंतर अनेक जण बेपत्ता झाले. त्यात कैलास-मानसरोवर यात्रेला गेलेल्या भारतीय भाविकांचाही समावेश आहे. ही बातमी कानावर पडताच अनिंद्य यांनी दीड महिन्यांपूर्वी त्यांनी केलेला प्रवास आठवला.

आमचा प्रवास आता सुरू असता तर काय झालं असतं, असा प्रश्न अनिंद्य यांना पडला आहे. ‘मी, माझे मित्र, नातेवाईक, सगळे त्याच मार्गानं गेले होते. मी तिथे असतो, तर माझं काय झालं असतं? फक्त कल्पना करूनही जीव घाबरा होतो. मीदेखील नैसर्गिक आपत्तीचा बळी ठरलो असतो. आज आमची कबर तिथे असती,’ असं अनिंद्य म्हणाले.

हिमालय परिसरात सातत्यानं नैसर्गिक संकटं येत आहेत. त्याबद्दल अनिंद्य यांनी चिंता बोलून दाखवली. अचानक पूर, ढगफुटी, भूस्खलन यासारख्या घटना सातत्यानं होत आहेत. हे सगळे निसर्गाचे संकेत आहेत. पण माणसाला ते संकेत समजत आहेत का, हा खरा प्रश्न आहे, असं म्हणत अनिंद्य यांनी सगळ्यांनाच अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला.