मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे. त्यांनी अचानक हा निर्णय घेतल्यानंतर आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमराठी रिक्षा चालकांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालक आणि मालकांना मराठी येणं अनिवार्य करण्यात आलं आहे. या अमराठी रिक्षा चालकांना मराठी न आल्यास त्यांना एक महिन्याची नोटीस देणार होती. तसेच तरिही त्याला एक महिन्यात मराठी आलं नाही तर त्याचे लायसन्स आणि बॅच निलंबित करण्यात येणार होते आणि त्याला तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार होता. या तीन महिन्यांतही त्याला मराठी शिकता नाही आली तर त्याचे लायसन्स रद्द केले जाणार होते. 12 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार ही कारवाई केली जाणार होती. पण मुख्यमंत्र्यांची अचानक या कारवाईला स्थगिती देत रिक्षा-टॅक्सी चालकांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.
रिक्षा-टॅक्सी चालक आणि मालक संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीवेळी त्यांनी मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ मागितली. त्यांचे म्हणणे ऐकून घेत मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. या एक वर्षात अमराठी चालकांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
“मी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना धन्यवाद देतो. त्यांनी मराठी भाषा शिकवण्यासाठी अनेक लोकांची मोट बांधली. त्यामुळे जवळपास 1 लाख 60 हजार अमराठी मराठी भाषा शिकले. त्यापैकी 15 ते 20 हजार ऑटो रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांना मराठी भाषेचे प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यांना प्रमाणपत्र देण्याच्या वाटपाच्या कार्यक्रमाला मी स्वत: उपस्थित होतो. जुजबी मराठी भाषा शिकण्याची गोडी अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक-मालकांमध्ये बघायला मिळाली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
“परिवहन विभागाने मराठी भाषा आपल्या व्यवहारात प्रत्येकाला आली पाहिजे ही भूमिका घेतली. मराठी भाषा शिकण्याचं, मराठी भाषेवर प्रेम करण्याची जी भूमिका 1 लाख 60 हजार लोकांनी घेतली. त्यांचे धन्यवाद देतो. मंत्री प्रताप सरनाईक यांनी आणि त्यांच्या परिवहन विभागाने मराठी शिकवण्याचं अभियान राबवलं. मराठी लेखक, तज्ज्ञ आणि साहित्यिकांना घेऊन मराठी भाषा शिकवण्याचं अभियान सुर ठेवलं होतं. मुख्यमंत्र्यांनी बऱ्याच लोकांची मागणी लक्षात घेऊन या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. मी एवढंच सांगेन, मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये मोठ्या प्रमाणात होतोय याचं समाधान आहे”, अशी प्रतिक्रिया शिंदेंनी दिली.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
“अमराठी रिक्षा चालकांना 1 मे महाराष्ट्र दिन ते 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत आधीच 105 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर आपण ज्या रिक्षाचालकांना प्रवाशांबरोबर मराठीत संवाद साधता येत नाही त्यांना एक महिन्याची नोटीस देऊन नंतर त्यांना तीन महिन्यांचा कालावधी देण्यात येणार होता. त्या काळात त्यांनी मराठी शिकायची होती. या चार महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मराठी शिकली नाही तर त्यांचा बॅच रद्द होणार होता. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्या राज्याचे सर्वोच्च नेते आहेत. राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी जो निर्णय घेतला तो आम्हा सर्वांना बंधनकारक असतो. त्यानुसार आता कारवाई होईल”, असं प्रताप सरनाईक म्हणाले.
‘अमराठी चालकांना मराठी शिकावीच लागेल’
“हा मराठीचा मुद्दा झाला. मराठीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची कालावधी दिला आहे. त्या हिशोबाने आम्ही आरटीओ विभागाकडून कारवाई करु. पण मुदतवाढ दिली म्हणजे सर्वकाही संपलं, असं नाही. त्यांना मराठी शिकावीच लागेल. कारण 12 ऑगस्ट 2026 ला झालेल्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या चालकांना जुजबी मराठी बोलता येणं आवश्यक आहे.”
‘एका वर्षानंतर मुदतवाढ मागवली तर अयोग्य’
“आम्ही मराठी भाषा अभियान चालू केलेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आम्हाला सूचना केल्या आहेत. ही काळाची गरज आहे. कारण चालकांना जुजबी मराठी येणं आवश्यक आहे. राज्यात 1800 शिक्षक आणि 180 वर्ग आम्ही चालू ठेवले आहेत. त्यामध्ये तुम्ही मराठी शिका. मु्ख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदत दिली आहे. त्यानंतर परत तुम्ही मुदत मागाल तर ते योग्य होणार नाही.”
‘मुख्यमंत्र्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक’
“मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा आम्हाला मंत्री म्हणून बंधनकारक असतो. त्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून अमराठी चालकांना मराठी शिकावेच लागेल. महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणं बंधनकारक आहे. मुख्यमंत्र्यांनी एक वर्षाची मुदतवाढ दिली असेल तर तो निर्णय आम्हाला बंधनकारक आहे.”
‘आम्ही रोजगार हिरावून घेणारे नाही तर देणारे सरकार’
“आम्हाला असं वाटतं की, एक वर्षाची मुदतवाढ मिळाल्याने अमराठी रिक्षा चालक आमच्यापेक्षा चांगली मराठी बोलू शकतील. त्याचा आनंद आहे. हे महायुतीचं सरकार रोजगार देणारं सरकार आहे. रोजगार हिरावून घेणारं सरकार नाही. त्यामुळे कुणाचेही बॅच रद्द करुन किंवा लायसन्स रद्द करुन त्याला रोजगारापासून वंचित करण्याची आमची भूमिका नाही. पण महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी अस्मितेचं पालन करावंच लागेल. मराठी भूमीशी एकरुप व्हावंच लागेल. एक वर्षानंतरही तुम्हाला मराठी बोलावच लागेल.”
’36 वर्षे थांबलो, आणखी एक वर्ष थांबू’
“आम्ही 36 वर्षे थांबलो. महाराष्ट्रातील मराठी जनता एक वर्षे थांबायला तयार आहे. एक वर्षानंतर मराठी आलं नाही आणि पुन्हा मुदतवाढ मागितली तर ते अयोग्य आहे. तुम्हाला मराठी बोलावीच लागेल.”
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा