Headlines

विजय हातातून निसटला, तरी गिल नाराज नाही; सामन्यानंतर कोणाला दिलं मालिका विजयाचं श्रेय??


IND Vs SL Test Series : श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका १-० अशी जिंकल्यानंतर शुभमन गिलने भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य केले. विजय हुकल्यानंतर कर्णधाराने नेमकं काय म्हटलं? युवा खेळाडूंच्या कामगिरीबाबतही त्याने मोठं वक्तव्य केलं.

Shubman Gill
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि श्रीलंका यांच्यातील कोलंबोतील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. मात्र, टीम इंडियाने दोन सामन्यांची ही कसोटी मालिका १-० अशी खिशात घातली. पहिल्या डावात ५०३ धावांचा डोंगर उभारून श्रीलंकेला फॉलोऑन दिल्यानंतरही यजमान संघाच्या फलंदाजांनी चिवट झुंज देत भारताच्या तोंडचा विजयाचा घास हिरावून घेतला. या थरारक सामन्यानंतर आणि मालिका विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार शुभमन गिलने श्रीलंकेच्या जिद्दीचे कौतुक करत आपल्या युवा संघाच्या कामगिरीवर सविस्तर भाष्य केले आहे.

‘आम्ही वेगळं काहीच करू शकलो नसतो…’

सामन्यानंतर गिलला विचारण्यात आले की, विजयासाठी टीम इंडिया आणखी काही वेगळी रणनीती आखू शकली असती का? यावर अत्यंत रोखठोक उत्तर देत गिल म्हणाला, “खरं सांगायचं तर, काहीही नाही. आम्ही सलग तीन दिवस जवळपास २५० षटके क्षेत्ररक्षण केले आणि जे काही शक्य होते ते सर्व आम्ही पणाला लावले. श्रीलंकेने अत्यंत उत्कृष्ट खेळ दाखवला. त्यांच्या फलंदाजांनी अप्रतिम फलंदाजी केली. त्यांच्याकडे टॅलेंट आहे आणि नशिबाचीही उत्तम साथ होती. त्यामुळे मला नाही वाटत की आम्ही यापेक्षा वेगळे काही करू शकलो असतो.”

Maharashtra TimesIND vs SL Second Test Result : भारताने श्रीलंकेविरुद्ध मालिका जिंकली, पण दुसऱ्या कसोटीत यजमानांचा पलटवार; कोणामुळे सामना अनिर्णित?

खूप काही शिकलो!

मालिका १-० ने खिशात घातल्यानंतर संघाच्या एकंदर कामगिरीचे मूल्यमापन करताना कॅप्टन गिलने विरोधकांकडूनही शिकण्यासारखे बरेच काही असल्याचे मान्य केले. तो म्हणाला, “या मालिकेत आमच्यासाठी अनेक सकारात्मक गोष्टी घडल्या. अगदी विरोधी संघाकडूनही आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. श्रीलंकेचा संघ ज्या भयंकर दबावाखाली होता आणि तिथून त्यांनी जसे ‘कमबॅक’ केले, ते पाहणे खरोखरच शानदार होते. लंच आणि टी-ब्रेक दरम्यान आम्ही ड्रेसिंग रूममध्ये याच गोष्टीवर चर्चा करत होतो की आम्ही यापेक्षा जास्त काहीच करू शकत नव्हतो.”

युवा शिलेदारांवर कॅप्टन फिदा

आपल्या सहकाऱ्यांचे कौतुक करताना गिल पुढे म्हणाला, “संपूर्ण मालिकेत देवदत्त पडिक्कलने अतिशय शानदार खेळ दाखवला. केएल राहुल खूप चांगल्या लयीत दिसला. गोलंदाजीत युवा फिरकीपटू मानव सुथारने भेदक मारा केला, तर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने दोन्ही डावांत अपार मेहनत घेतली. आमच्या सर्वच गोलंदाजांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते आणि त्याचेच फळ आम्हाला मालिका विजयाच्या रूपात मिळाले आहे.” असं म्हणत त्याने युवा शिलेदांरांना मालिका विजयाचं श्रेय दिलं.

Maharashtra TimesIND vs SL : भारताचा विजय हिरावून घेणारा श्रीलंकन फलंदाज कोण? BCCI उपाध्यक्षांकडून थेट सचिनशी तुलना, काय म्हणाले?

टीम इंडियाचे भविष्य अत्यंत रोमांचक

संघातील नवोदित युवा खेळाडूंचा उदय आणि भविष्यातील तयारीबाबत बोलताना गिलने स्पष्ट केले की, “सध्याचा काळ आमच्यासाठी अत्यंत रोमांचक आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर, आमच्या तयारीमध्ये आणि कामगिरीमध्ये सातत्य राखणे अत्यंत गरजेचे आहे. आतापर्यंतच्या या प्रवासात आमच्यासाठी अनेक चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी समोर आल्या आहेत, ज्या आम्हाला भविष्यात नक्कीच फायदेशीर ठरतील.”