![]()
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या 27 वर्षीय स्नेहल सावंत या तरुणीचा सातार्यातील रुग्णालयात प्रदीर्घ उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मूळ सातार्याच्या माण तालुक्यातील पूळकोटी गावच्या रहिवासी असलेल्या स्नेहल यांनी अत्यंत प्रतिकूल आणि संघर्षाच्या परिस्थितीतून एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करत शासकीय सेवेत प्रवेश केला होता. शासकीय सेवेत रुजू होऊन अवघे सात महिने उलटलेले असताना पालघर येथे रस्त्याने जात असताना अमोल मुळे या आरोपीने त्यांच्यावर अत्यंत अमानुषपणे कोयत्याने हल्ला चढवला होता. या भीषण हल्ल्यानंतर स्नेहल यांच्यावर सुरुवातीला पालघर आणि पुण्यातील रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात आले, यानंतर सातार्यातील एका रुग्णालयात गेले अडीच महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असलेल्या स्नेहल यांच्या उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाने आपली शेतजमीन विकून तब्बल 35 लाख रुपयांचा खर्च केला होता. मात्र अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. स्नेहल यांच्या निधनामुळे सावंत कुटुंबातील मुख्य आधार हिरावला गेल्याने पूळकोटी गावावर आणि संपूर्ण परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी प्रशासनाकडे आक्रमक मागणी केली आहे. स्नेहल यांच्यावर झालेला हा हल्ला अतिशय गंभीर स्वरूपाचा असून, हा खटला तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून पुढील सहा महिन्यांच्या आत दोषी आरोपीला फाशीचीच कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे.
Source link
कोयत्याने हल्ला झालेल्या युवतीचा सातार्यात मृत्यू:पालघर येथे घडली होती संतापजनक घटना; नातेवाईकांची प्रशासनाकडे आक्रमक मागणी
