गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्याआधी काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीची चाहूल लागताच कोल्हापूरच्या राजकारणात दररोज नवनवीन नाट्यमय घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी थेट भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या यड्राव येथील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येत असतानाच झालेल्या या भेटीमुळे “गोकुळमध्ये नवा भूकंप” होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे.
सदिच्छा की राजकीय चाचपणी?
राजकीय विश्लेषकांच्या मते, निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या अशा भेटी केवळ कौटुंबिक नसून त्यामागे मोठी राजकीय चाचपणी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र या खळबळजनक भेटीनंतर राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, आमदार सतेज पाटील हे शिरोळ तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी स्वतःहून निंबाळकर यांच्या घरी येण्याची इच्छा व्यक्त केली होती.
“घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे ही आपली भारतीय संस्कृती आहे. या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसून ती केवळ एक सदिच्छा भेट होती,” असे स्पष्टीकरण निंबाळकर यांनी दिले आहे. या भेटीवेळी माजी आमदार राजुबाबा आवळे, दत्त कारखान्याचे गणपतराव पाटील आणि जिल्हा परिषद सदस्या अर्चना चौगुले यांच्यासारख्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
मुश्रीफांवरील टीका अन् सतेज पाटलांशी जवळीक
ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाण्याचे कारण म्हणजे सध्याची परिस्थिती. या भेटीच्या एक दिवस आधीच राजवर्धन निंबाळकर यांनी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर किकवी प्रकल्पातील कथित भ्रष्टाचारावरून सडकून टीका केली होती.
एकीकडे सत्तेतील मित्रपक्षाच्या मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्याचे आपल्या घरात आदरातिथ्य करायचे, यावरून महायुतीमधील नेत्यांमध्ये असलेले मतभेद आता उघड झाले आहेत. राजवर्धन निंबाळकर हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे ‘मानसपुत्र’ मानले जातात, त्यामुळे त्यांच्या या कृतीने महायुतीच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
आमदार सतेज पाटील हे यंदा ‘गोकुळ’मध्ये केवळ महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली न उतरता समविचारी लोकांची मोट बांधण्याच्या तयारीत आहेत. या रणनीतीद्वारे त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीतील (अजित पवार गट) नाराज नेत्यांसाठी आपले दरवाजे उघडे ठेवले आहेत. गोकुळमध्ये पक्षाच्या आदेशापेक्षा वैयक्तिक संबंधांना जास्त महत्त्व असते, याचाच फायदा घेत आ. सतेज पाटील क्रॉस वोटिंग आणि महायुतीतील असंतोष या दोन मुद्द्यांवर आपली गोकुळची निवडणूक ताकतीने लढवण्याच्या तयारीत आहेत.
सध्या गोकुळची निवडणूक बिनविरोध होणार अशी चर्चा असली तरी, महाडिक-मुश्रीफ यांच्यातील वाढते अंतर आणि सतेज पाटील-निंबाळकर यांच्यातील ही भेट पाहता निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. सतेज पाटील यांचा हा समविचारी आघाडीचा प्रयोग यशस्वी ठरतो की महायुती आपली फाटाफूट रोखण्यात यशस्वी होते, हे येणारा काळच ठरवणार आहे. दरम्यान, सध्या तरी कोल्हापूरच्या चहाच्या कट्ट्यापासून ते राजकीय कार्यालयांपर्यंत केवळ सतेज पाटील यांच्या या ‘राजकीय गाठीभेटी’चीच चर्चा रंगली आहे.
लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.
डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.
चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.
चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.
महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.
चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.… आणखी वाचा