Headlines

Elephants Deaths: आधी अशक्तपणा, मग लकवा अन् मृत्यू; हत्ती कोसळले, ते उठलेच नाहीत; 20 जणांचा जीव कोणी घेतला?


कधीकाळी जंगलात ऐटीत चालणारे हत्ती गेल्या काही महिन्यांपासून एकाएकी जीव गमावत आहेत. त्यांच्या रहस्यमय मृत्यूंनी वन विभागात खळबळ उडाली आहे.

kenya elephants
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नैरोबी: केनियाच्या अंबोलेसी परिसरात जून २०२६ पासून हत्तींचे रहस्यमय मृत्यू होत आहेत. आतापर्यंत किमान २० हत्तींचा जीव गेला आहे. यात बहुतांश हत्ति‍णी आणि कमी वयाचे नर हत्ती आहेत. या हत्तींमध्ये एकसारखीच लक्षणं दिसून आली आहेत. त्यांना नीट चालता येत नाही. काहींच्या शरीरात लकव्यासारखी लक्षणं दिसून आली.

अनेक हत्ती जमिनीवर एकदा कोसळले, ते पुन्हा कधीच उभे राहू शकले नाहीत. या हत्तींचे मृत्यू नेमके का होत आहेत, ते स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या घटना दक्षिण केनियाच्या अंबोसेली आणि आसपासच्या परिसरात घडल्या आहेत. ही ठिकाणं टांझानियाची सीमा आणि माऊंट किलोमांजारोच्या आसपास आहेत.

अंबोसेली परिसर हत्तींच्या झुंडींसाठी ओळखला जातो. दरवर्षी इथे मोठ्या संख्येनं पर्यटक हत्ती पाहायला येतात. त्यामुळे सातत्यानं वाढत असलेले मृत्यू वन्यजीव अधिकारी आणि तज्ज्ञांसाठी चिंतेचा विषय आहेत. हत्तींच्या मृत्यूंमागील कारणांचा शोध घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे.

जूनच्या शेवटी आणि जुलैमध्ये आजारी पडलेल्या हत्तींमध्ये सारखीच लक्षणं दिसली. त्यांना नीट चालता येत नव्हतं. काही हत्ती चालता चालता कोसळले. मग ते पुन्हा उभेच राहिले नाहीत. अनेक हत्तींचे पाय आणि शरीराच्या अन्य भागांमध्ये लकव्यासारखी लक्षणं आढळली. केनिया वन्य जीव सेवा पथक हत्तींच्या मृत्यूंचा तपास करत आहे.

काही हत्तींच्या शरीरात साईनाईडचं प्रमाण अधिक सापडलं आहे. एखाद्या विषारी पदार्थ किंवा कीटकनाशकामुळे हत्तींचे मृत्यू होत नाहीत ना, याचाही शोध घेतला जात आहे. साईनाईड मिळाल्यानंतर विषप्रयोगाचा संशय व्यक्त केला जात आहे. पण अद्याप यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.

हत्तींवर विषप्रयोग झाला असता, तर त्यांची शव खाणारी गिधाडं आणि अन्य प्राणी यांच्यावरही परिणाम झाला असता, याकडे काही तज्ज्ञ लक्ष वेधतात. पण अद्याप तरी एकाही अन्य प्राण्याचा मृत्यू झालेला नाही. त्यामुळे आजाराच्या शक्यतेकडे ठळकपणे पाहिलं जात आहे. पण अद्याप तरी कोणत्याही संसर्गजन्य आजाराचे पुरावे मिळालेले नाहीत.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा