![]()
छत्रपती संभाजीनगर शहरातील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांनी आत्महत्या केल्याची मन सुन्न करणारी घटना ताजी असतानाच, शहरात आणखी एक मोठी दुर्घटना टळली आहे. हर्सूल-सावंगी परिसरात एका तरुणाने घरातील वादातून थेट एका उंच टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिस आणि अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि तासभर चाललेल्या थरारक रेस्क्यू ऑपरेशननंतर या तरुणाला सुखरूप खाली उतरवण्यात यश आले आहे. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओही आता समोर आला आहे. नेमके काय घडले? मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हर्सूल-सावंगी परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचा घरात काही कारणांवरून वाद झाला होता. रागाच्या भरात आणि नैराश्यातून त्याने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. तो थेट परिसरातील एका उंच टॉवरवर जाऊन बसला. हा तरुण टॉवरवर चढल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला. पाहता पाहता घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली. तासभराचा ‘हाय-व्होल्टेज ड्रामा’ आणि सुटका नागरिकांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून हर्सूल पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. तरुणाला खाली उडी मारण्यापासून रोखण्यासाठी पोलिसांनी त्याच्याशी संवाद साधायला सुरुवात केली. अग्निशमन दलानेही कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खाली आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवली होती. सुमारे एक तास हा ‘हाय-व्होल्टेज ड्रामा’ सुरू होता. अखेर पोलिस आणि बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी तरुणाची समजूत काढण्यात यश मिळवले आणि त्याला अतिशय शिताफीने व सुरक्षितपणे खाली उतरवले. तरुण सुखरूप खाली आल्यानंतर उपस्थित नागरिकांनी आणि पोलिसांनी मोठा सुटकेचा निश्वास टाकला. घटनेचा व्हिडिओ व्हायरल या थरारक घटनेचे मोबाईलमध्ये चित्रण करण्यात आले असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण टॉवरच्या वरच्या भागात उभा असल्याचे आणि बचाव पथक त्याला खाली आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून, त्याची समजूत काढण्याचे काम सुरू आहे. कौटुंबिक वादातून नैराश्यापोटी उचललेल्या या पावलामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे शहरात एक मोठी जीवितहानी टळली आहे. हेही वाचा.. छत्रपती संभाजीनगरातील खवड्या डोंगर प्रकरण:आयफोनचा वाद नव्हे, कौटुंबिक तणावातून संपूर्ण कुटुंबाचा दुर्दैवी अंत तिसगाव परिसरातील खवड्या डोंगर प्रकरणातील चांदगुडे परिवाराचा दुर्दैवी अंत झाला. यात कुणाल व मुरलीधर यांचा पडतानाचा स्पष्ट व्हिडिओ यापूर्वीच समोर आला होता, तर काही वेळाने संगीता खाली पडल्याचे समोर आले होते. मात्र तसा पुरावा समोर आला नव्हता. आता समाज माध्यमांवर नवा व्हिडिओ समोर आला आहे. यात संगीता ह्या खाली पडताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे त्या खाली बघताना घसरल्या की त्यांनी उडी घेतली ही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे मुलगा कुणालने आयफोनसाठी आत्महत्या केल्याची चर्चा सुरुवातीला रंगली होती; मात्र, कुणालची मावशी पल्लवी यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्या म्हणाल्या की, ही घटना मोबाईल फोनशी संबंधित नव्हती. लोकांनी अशा अफवा पसरवू नयेत. मूळ परिस्थितीबाबत लोकांना कोणतीही खरी माहिती नाही. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगरातील खवड्या डोंगराच्या घटनेनंतर शहरात पुन्हा थरार!:घरातील वादातून तरुण चढला टॉवरवर; पोलिस-अग्निशमन दलाच्या प्रयत्नांनी टळला अनर्थ
