वृत्तसंस्था, पुणे
येथे झालेल्या हॉकी इंडियाच्या 16 व्या कनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेचे अजिंक्यपद हरियाणाने पटकाविले. या स्पर्धेतील खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात हरियाणाने झारखंडचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.
हा अंतिम सामना शेवटच्या क्षणापर्यंत रंगतदार झाला. दोन्ही संघांनी खेळाच्या पूर्वाधार्थ आक्रमक आणि वेगवान खेळावर अधिक भर दिला होता. 19 व्या मिनिटाला मुंद्री सरोजने झारखंडचे खाते उघडले. मात्र झारखंडला ही आघाडी अधिक वेळ राखता आली नाही. 23 व्या मिनिटाला भव्याने शानदार मैदानी गोल नोंदवून हरियाणाला बरोबरी साधून दिली. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. खेळाच्या उत्तरार्धाला प्रारंभ झाल्यानंतर सामन्यातील 42 व्या मिनिटाला खुशीने हरियाणाचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. यानंतर शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीत झारखंडने हरियाणाच्या बचावफळीवर वारंवार हल्ले चढविले. पण त्यांच्या भक्कम बचावामुळे झारखंडला हा सामना जिंकता आला नाही.
या स्पर्धेमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात मध्यप्रदेशने छत्तीसगडचा 3-1 अशा गोलफरकाने पराभव करत कांस्यपदक मिळविले. सामन्यातील 35 व्या मिनिटाला काजलने मध्यप्रदेशचे खाते उघडले. त्यानंतर काजलने मध्यप्रदेशचा आणि वैयक्तिक दुसरा गोल 37 व्या मिनिटाला नोंदविला. 42 व्या मिनिटाला तन्वीने मध्यप्रदेशचा तिसरा गोल केला. 54 व्या मिनिटाला शितल यादवने छत्तीसगडतर्फे एकमेव गोल केला. या सामन्यात मध्यंतरापर्यंत गोलफरक कोराच होता. तर खेळाच्या उत्तराधार्थ चार गोल नोंदविले गेले.
